शेवटी भाषेत काय ठेवलेय हो?

मला कायम प्रश्न पडतो कि लिखाण शुद्ध अशुद्ध असू शकते .भाषा शुद्ध किंवा अशुद्ध कशी असू शकेल . भाषेचा बाज ,बोलण्याचा ढंग हे ते त्या त्या ठिकाणच्या लोकांचा आत्मा असतो ओळख असते उलट.
लहानपणी २ नंबर जास्त जर मला कुठल्या विषयावरून चिडवले गेले असेल तर ती माझी भाषा किंवा बोलण्याची पद्धत (जी periodically rather geographically बदलत होती).२ नंबर यासाठी कारण नंबर १ विषय ज्यावरून मला सर्वात जास्त चिडवले जायचे,जाते तो म्हणजे माझे पु. लं. सारखे पुढे असलेले cute दोन दात. असो जळतात काही लोक पु. ल. आणि माझ्यावर 🙂 😉
बाबांच्या बँकेच्या नोकरीमुळे शाळा सुरु झाल्यावर विदर्भात बदली झाली.वैदर्भी भाषा माझ्या अगदी नसानसात लगेच भिनली.आई बाबाना नाशिक हुन अमरावती ला गेल्यावर भाषेच्या च्या अडचणी आल्या, त्या मला व माझ्या भावाला तेवढ्या आल्या नव्हत्या . भाजी घ्यायला आई बरोबर गेले कि आई कोथिंबीर मागायची , भाजीवाली बाई आ करून बघायची मग मी हळूच म्हणायची सांबार द्या ना मावशी.बटाटे वडा मागताना त्याला आलू बोन्डा म्हणतात कळल्यावर आमचाच वडा झाला होता.दादा एकदम चालीत काऊन बे ,काह्यला बे बोलायला लागला होता तर मी ”आई , मी ठाकरेंच्या बालीबरोबर जाऊन राह्यलो ग ”(आईचा हात कपाळावर)! सुट्टीमध्ये मामा मावशी आणि भावंडे तर मिमिक्री बघताय असे हसायचे आमचे बोलणे ऐकून
५ वर्षात वऱ्हाडी वडा भात,आंबील ,डाळ भाजी सात्म्य होते ना होते तोच बाबांची परत बदली झाली ती थेट खान्देशात. शाळेमध्ये माझे बोलणे म्हणजे सर बाईं मुलींपासून पासून सगळ्यांच्या मनोरंजनाचा विषय झाला होता. आता आई बाबांची हि गत अशीच झाली होती. पण खान्देशी झणझणीत खिचडी व कच्चे तेल , काळ्या मसाल्याची रसई आणि बरोबर पुरणाचे मांडे ,शेव भाजी,वांगी भरीत च्या चवीने ”मी आलो , मी गेलो”चे कधी “मी आली, मी गेली” झाले ते माझ्या धी धृती स्मुतीना अजून उमजले नाही.खरी गम्मत तर अजून वाट बघत होती.खान्देशाने वऱ्हाडी गिळून टाकली होती पण पुणेरी तिकडे आ करून कधी गिळू हिला अशी वाट बघत होती.
६ वर्षात पुरेपूर खान्देशी बाज घेऊन (थोडी फार अहिराणी हि यायला लागली होती ) मी १२ वी नंतर पुण्यात प्रवेश केला(चुकला ना काळजाचा ठोका हाहाहाहा) . काही दिवसात माझे नाव च माझ्या पुणेरी नातेवाईकांत आणि कॉलेजच्या काही लोकल मुलामुलींमध्ये “मी आली मी गेली रुपाली” पडले होते .’न’ चा ‘ण’ आणि ‘ण’ चा ‘न’ असे गंभीर असांस्कृतिक सुरुंग हि खान्देशी गाठोड्यात होते .पण म्हणतात ना पुणे तिथे सगळे च भारी. पुणेरी पाण्याला वेळ नाही लागला मला पुणेरी बनवायला.आणि ‘मी आली, मी गेली’ चे ‘मी आले, मी गेले’ झाले.
पण माझा प्रॉब्लेम काही सुटला नव्हता कारण आता पुण्याहून घरी खान्देशात सुट्टीत गेले कि माझ्या मैत्रिणी खूप हसायच्या माझे बोलणे ऐकून.म्हणायच्या किती वेगळे बोलतेस ग हेल काढून लाड लाड नाटकी ………..अगदी पुणेरी ! झालं म्हणजे आता काय हिब्रू शिकावी कि काय ?
असो परंतु क्वचित प्रसंगी अरे ला तुरे कारे करायची वेळ आली कि माझ्यातली वऱ्हाडी,खान्देशी कम पुणेरी कॉकटेल भाषेने समोरच्याला फेसयुक्त चक्कर येईल इतके विदर्भाने ,खान्देशाने आणि पुण्याने मला वाचिक सक्षम बनवलय हे निश्चित !
रुपाली पानसे
Share this :

Leave a Comment

Shopping Cart