(ह्या valentine डे पासून आहाराबरोबरच मनाचे आरोग्य आणि आयुर्वेद यावर लिखाण सुरु केले. पहिले दोन लेख इंग्रजीत पोस्ट झालेत. मराठी त लेख नाही म्हणून बरेच जणांनी नाराजी दर्शविली. इंग्रजी बरोबर मराठीत लिहण्याचा आग्रह झाला .हा पहिला लेख मराठीत आणायला उशीर होतोय. दुसरा लेख देखील अनुवाद करून लवकर आणीनच)
हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा !!
आज बरेच दिवसांनी मॉल मध्ये गेले तर गुलाबी लाल रंगाची सगळीकडे उधळण दिसत होती. शेकडो गुलाबी फुले, फुगे, भले मोठाले टेडी बेअर, इतरही नको नको त्या गोष्टी गुलाबी लाल रंगात नटून थाटून मांडल्या गेल्या होत्या. सर्व जग प्रेमी हृदयांना आकर्षित करायला सज्ज होते. प्रेम व्यक्त करण्यासाठी महागडे गिफ्ट्स ,अजून काय काय कल्पनांची नुसती चढाओढ होणार होती. असायला च हवे. प्रेम ,काळजी , लाड ह्या भावना वेळोवेळी व्यक्त व्हायलाच हव्यात. जिव्हाळा आणि प्रेमाचा ओलावा नसेल तर जगणे रुक्षच. परंतु ह्या गोड गुलाबी चित्रामागे गडद कुरूप खणखणीत सत्य देखील असते. कित्येक जणांचे गुलाब आज ट्रॅश मध्ये गेले असतील. हृदय शब्द नीट लिहता न येणारे गुलाबापेक्षाही नाजूक कोवळे जीव आज वॅलेंटाईने नाही मला\’\’ म्हणून कॉम्प्लेक्स घेतील. काही जणांना न विसरणारे कटू अनुभव येतील,काही जण भेटवस्तू मध्ये प्रेमाची मोजणी करतील ,देवाणघेवाणी मध्ये मने हृदये जुळतील च असे नाही आणि बरेच काही. शेवटी हे सुखद बुडबुडे आहेत .खरे आयुष्य वेगळे काही असते. अर्रेच्या आज आहाराविषयी न लिहता मी बजरंग दलाची भाषा का बोलतेय असे वाटतेय ना. नाही माझा ह्या डे ला अजिबातच विरोध नाही परंतु काही आठवडे खूप वेगळ्या विषयावरचे लिखाण संपवण्याच्या मागे होते. त्यामुळे सतत त्या वरचे लिखाण वाचून, लिहून मन अजूनही त्या विषयातील गल्लीत वळतेय. गेले काही दिवस psychology आणि आयर्वेद यावरील एका अमेरिकेतील project साठी लिखाण सुरु होते. लिहताना जाणवले हा विषय किती आवश्यक आहे. आहार विषयक लिखाणातून जे जागरण गेल्या ५ वर्षांपासून सात्यताने करतेय त्या बरोबरच मानसिक आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय आपण का वगळला?असे वाटले.covid सारख्या फ्लू पसरवणाऱ्या विषाणू ने सर्वच बाबतीत मनुष्याला नामोहरम केले. मनुष्यहानी ,बेकारी ,ढासळलेली अर्थव्यवस्था,अस्थिरता, वैयत्तिक असुरक्षितता, नात्यातील अडचणी अशा सर्व बाबतीत सर्वात जास्त घात झाला तो मनाच्या आरोग्याचा ! आज मानसिक रोगांचा आलेख भूतो न भविष्यती वर गेला आहे .
डाएट, स्किन , वजन या गोष्टी आपण खूप लगेच सिरिअसली घेतो त्यावर वाचतो ,सल्ला घेतो परंतु मनाला वाळीत टाकतो. मनाच्या व्यथा मनालाच सहन करायला लावून सगळे आलबेल असल्याचा आव आणतो. या मनाचा आणि शरीराच्या व्याधीचा खूप जवळचा संबंध मात्र विसरतो आणि आजारावर वेगवगेळे औषधे घेत राहतो. असे म्हणतात कि येणारे दशक हे मानसिक आजारांचे दशक आहे. मागील काही दशकातच मानसिक आजार आपला विळखा समाजात घट्ट करत चाललंय. शारीरिक आजार दिसतात, साथीचे आजार आटोक्यात आणता येतात पण मनाच्या आजारावर लस नाही, ते संसर्गाने पसरत नाही. अदृश्य राहून त्या मनुष्याचा आणि त्याच्या स्वकीयांचा घात मात्र करते. आयुर्वेद हे मनाचा विचार करणारे पहिले वैद्यकीय शास्त्र आहे असे म्हंटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. आयुर्वेदात मनाच्या आजाराचा , ते होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आणि झाल्यास त्यावरील उपचार सखोल नमूद आहेत. समाजात आज मानसिक आजारावरील औषधाची परिस्थती भीक नको पण कुत्रा आवर अशी आहे ह्यावर कुणाचे दुमत निश्चित नसेल. मनाच्या आजारावरील औषधे शरीरावर अतिशय गंभीर परिणाम करणारी असतात. ती औषधे सरसकट देणे घेणे शक्य नसते. आयुर्वेद आणि आयुर्वेदातील वनस्पतीजन्य औषधे, आहारपद्धती आणि इतर जीवनशैली विषयक ज्ञान मानसिक आरोग्य राखण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. इथे परदेशात ह्यावर अभ्यास संशोधन सुरु असून त्याची उपयुक्तता देखील सिद्ध होतेय.
मानसिक आजारावरील सामान्य ज्ञान आणि शास्त्रीय पद्धतीने प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे जेणे करून अशा आजारांची करणे लक्षणे आणि योग्य मदत वेळेत मिळणे शक्य होईल.
ह्या लेखात आपण मानसिक आजार किती प्रमाणात वाढले आहेत ते जाणून घेऊ. काही मनाचे आजार बिजार नाही हो श्रीमंत लोकांची थेर दुसरे काय असे म्हणणार्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आकडेमोड देखील ह्या लेखात बघू. वय,लिंग, शैक्षणिक-आर्थिक स्तर, शहरे खेडेगाव, जीवनमानाचा स्तर अशा अनेक सीमा ओलांडून आज मानसिक आजार सर्वच वयातील मनुष्याने कधीही केंव्हाहि होण्याची शक्यता खुयप जास्त वाढली आहे. मी तुम्ही अगदी कुणीही मानसिक आजारांना हे असे बघता बघता बळी जाऊ शकतो.

खालील नोंदी बघून आपण नक्कीच मनाला सिरिअसली घ्याल अशी अपेक्षा
१ जगात दर ५ लहान मुलांमागे १ मुलगा हा मानसिक आरोग्याच्या बाबतीत एक अथवा अनेक लक्षणे दाखवतो
२ .अमेरिकेमध्ये वर्तनसमस्या असणाऱ्या मुलांची संख्या ४५ लाख एवढी जास्त असून त्यातील बहुतांश मुले हि ३ ते १७ या वयोगटातील आहे. (भारत हि चढाओढीत सामील व्हायला सज्ज आहे )
३. अमेरिकेत डिप्रेशन निदान झालेल्या मुलांची संख्या १९ लाख होय. Depression हा गंभीर गटातील मानसिक आजार होय हे वेगळे सांगायची गरज नाही
४ .कुटुंबामध्ये एक अथवा अधिक कुटुंबियांना मनाचा आजार असेल तर तुम्हाला तो होण्याची शक्यता ५० % नि वाढते.
५ .संपूर्ण जगात आज डिप्रेशन चे निदान झालेल्यांची संख्या २ करोड ६५ लाख एवढी आहे. हे हिमनगाचे टोक आहे कारण बहुतांश मानसिक आजाराच्या नोंदी होतच नाही तेंव्हा कल्पना करा हि संख्या किती असू शकते.
६ .जगात दर ३० मुलांमागे १ मुलगा/मुलगी तीव्र नैराश्याची(डिप्रेशन) लक्षणे दाखवतो. यात वेगवेगळे भास होणे यासारखे लक्षणे असू शकतात. बहुतांश लहान मुलांचे मानसिक आजार हे लक्षात येत नाही , नोंदी होत नाहीत हे कटू सत्य होय.
७ अर्ध्याधिक मानसिक आजार हे वयाच्या १0 ते १७ या वयोगटातील मुलांना होतात
८ .जगात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते आणि त्यातील बहुतांश लोक हे मानासिक दृष्ट्या निरोगी नसतात.
९ .मानसिक अस्वास्थ्य , मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचे आयुष्य इतर मनुष्याच्या तुलनेने 10- १२ वर्ष कमी असते असे एक सर्वे सांगतो.
१०. मानसिक अस्वाथ्याचा जगाच्या अर्थकारणावर देखील अबब भर पडतो. मानसिक अनारोग्यामुळे कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे दर वर्षी जगाच्या अर्थकारणाचे जवळजवळ १ लाख करोड रुपयांनी नुकसान होते.
हि १० ची संख्या १०० मध्ये आरामात जाईल परंतु हि आकडेमोड या ब्लॉग पुरती पुरेशी आहे. मानसिक आरोग्य मनाची काळजी या विषयावर ह्या लेखमालेत दरवेळेस नवीन देण्याचा प्रयत्न असेल. आपण वाचलेली माहिती आपल्या परिचितांना देखील पाठवणे आवश्यक आहे हे आपल्या एव्हाना लक्षात आले असेल. ती जरूर पाठवा. काही शंका प्रश्न अनुभव असतील तर मेसेज अथवा ई-मेल करू शकता.
जबरदस्त लेख… 👍👍👏👏