धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार

पावसाळा म्हणजे टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरमागरम कांदा भजे ! पावसाळा म्हणजे हातात लाडके पुस्तक,कॉफीचा कप आणि खिडकीचा एक छोटासा कोपरा. पावसाळा म्हणजे मुद्दाम छत्री रेनकोट दप्तरातच ठेवून भिजत भिजत घरी येऊन वळत टाकलेली पुस्तक वह्या आणि ओरडा खाल्लेला बाळू किंवा बाळी .पावसाळा म्हणजे अखंड कोसळत्या धारा झेलत सर केलेले दुर्ग .पावसाळा म्हणजे रद्द झालेली लोकल आणि जॅम झालेली ट्रॅफिक! प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या छटा दाखवणाऱ्या पावसाळ्यात सगळ्यांचा आहार कसा असावा ते या लेखातून बघू.

“श्रावण आणि भाद्रपद म्हणजे जुलै शेवट ते सप्टेंबर सुरुवातीचा ऋतू हा वर्षा ऋतू होय.”
वर्षा ऋतूत अग्निबल कमी असते. तसेच ह्या ऋतू मधील पाणी हे आम्ल विपाक असणारे म्हणजे पचायला जड आणि आंबटपणा उत्पन्न करणारे असते ह्या पाण्याचा फळे आणि भाज्यांवर परिणाम होतो.
शरीरातील वात दोष स्वभावतःच वाढलेला असतो म्हणूनच ह्या ऋतूंमध्ये हाडांचे दुखणे डोके वर काढते.जुने कधीतरी लागलेले ,आघात झालेले सांधे अथवा जखमेचे ठिकाण हि या मुळेच दुखते. आयुर्वेदातील बस्ती हा वातावरील सर्वोत्तम उपाय ह्याच ऋतू योजला जातो.

rain diet image

 • पावसाळ्यात पाणी हे पचायला जड असते म्हणून ते उकळवून प्यावे असा संकेत आहे. निर्जंतुकीकरण हा एक मुद्दा तर आहेच परंतु असे उकळलेले पाणी पचनसंस्थेवर चांगले काम करत असते .
 • अन्न पदार्थ नीट शिजवून उकडून मगच खावे.
  पावसाळ्यात पालेभाज्या खाल्ल्यास त्या पटकन बाधतात ,पोट बिघडवतात असे दिसते. याकरिता त्या वापरताना स्वच्छ धुवून नीट शिजवून मगच वापराव्या . कच्च्या शक्यतो या ऋतूत वापरू नयें. तसेच वेगवेगळ्या व्यंजनात त्या थोड्या प्रमाणात वापरणे चांगले.
  त्यातही पालक हि भाजी हमखास पित्त वाढवताना तसेच पोट बिघडवताना दिसते.
  राजगिरा ,लाल माठ, तांदुळजा मेथी ,चाकवत,अळू,अंबाडी अशा भाज्या खाव्यात.
 • सहज उपलब्ध फळे स्वच्छ करून खावीत .त्यातही डाळिंब,मोसंबी,केळी इत्यादी .
 • या ऋतूत जन्माष्टमी हा खास उत्सव असतो. त्यात प्रसादा करिता बनवला जाणारा गोपाळकाला एरवी संध्याकाळी खाण्यासाठी बनवला तरी उत्तम आहे.
  साळीच्या लाह्या,पोहे,काकडी,ओले नारळ आणि गोड़ दही वापरून बनवून अवश्य खावा. गोड आंबट तिखट रुचकर चवीचा हा आयुर्वेदिक कृष्णा स्पेशल आहार नक्की खावा असाच
 • रव्याच्या गूळ आणि खजुराच्या सारणाचा तुपावर भाजलेल्या सांजोऱ्या अथवा साठोऱ्या हा पदार्थ गोड़ व्यंजनामध्ये निवडणे हितकर.
 • ह्याच ऋतूत येणारी नारळी पौर्णिमा म्हणजे ओल्या नारळाचे ऋतूतील महत्व परत अधोरेखित करणारी.
  मधुर म्हणजे गोड़ चवीचे ओले नारळ पित्त आणि वाताचे छान शमन करते.
  बेदाणे केशर ओला नारळ घातलेला तुपातील नारळी भात ,नारळाच्या वड्या हि तर पर्वणीच.
 • ह्या ऋतूत मधुर (गोड़),लवण(खारट) आणि किंचित आम्ल(आंबट) चवी हितकर असतात.
  सैंधवाचा वापर ह्या ऋतूत आणि एरवीही अवश्य करावा.
 • गरम फळभाज्यांचे सूप, नॉन व्हेज सूप ह्या ऋतूत आवश्यक होय.परंतु मांसाहार अतिशय जपून अथवा टाळणे उत्तम
  लवंग दालचिनी,आले,सुंठ,गवती चहा, तुळस,ओवा,कढीपत्ता,हिंग यांचा विशेष वापर भूक वाढवी ,पचनशक्ती नीट ठेवणे या करता करून घ्यावा.
 • जुने साठे साळीचे तांदूळ, गहू आणि मूग मसूर डाळी ह्या ऋतूत उत्तम.
 • उसळीचा अतिरेक ह्या ऋतूत नकोच.
 • गौरी गणपतीला असणारा बेत, चव आणि आरोग्य सांभाळणारा असतो परंतु खाण्याचा अतिरेक आणि पचवण्याची ताकत नसेल तर सण समारंभात पोट बिघडणारच. तेंव्हा चवीला छान म्हणून प्रमाणाबाहेर खाणे टाळावे . परंतु स्वर्गीय अशा या पक्वांनांना न्याय आणि दाद द्यावीच.
  खोबरे खसखस गूळ,आणि साजूक तूप घालून उकडीचे किंवा तळणीचे मोदक हे कुठल्याही बाहेरच्या तयार मिठाईला उत्तम पर्याय होय आणि कायम च असावा.
  गौरी मध्ये केली जाणारी आदल्या दिवशीची मेथी , दुसऱ्या दिवशीची सोळा एकत्र भाज्यांची भाजी,अळूभाजी, कटाची आमटी किंवा सार ,अळूवडी ,वाटली डाळ, हिरवी चटणी,कोशिंबीर,साधे वरण भात पापड कुरडया आणि खमंग गुळाची तुपात भिजलेली पुरणपोळी हि खाद्यसंस्कृतीचा परमोच्च कळस साधत असते.
  त्या ऋतूत मिळणारया सगळ्या भाज्या वापरून आणि सर्व दोषांची काळजी घेऊन तयार झालेले हे ताट एक उत्तम आरोग्यदायी खाद्य परंपराच असते. गौरीच्या नैवैद्याला वऱ्हाडात ताक वापरून तयार केलेला ज्वारी बाजरी पिठाचा पातळसर आंबील हा पदार्थ सुद्धा ऋतूनुसार आंबट आणि गोड़ ह्याचा समतोल साधत असतो. असे आंबील एरवी खायला देखील रुचकर असते.
  सण,निसर्ग ,पदार्थांची रेलचेल यांमध्ये शरीराची स्थिती जाणून घेऊन खाणे आवश्यक हा अधोरेखित मुद्दा होय.
 • वर्षा ऋतूचे वर्णन कांदाभजी,बटाटा भजी शिवाय पूर्ण कसे होईल.अवश्य खा परंतु प्रमाणात खा. वारंवार आणि पोटास तडस लागेपर्यंत खाऊ नयें. तळणीचे तेल वारंवार गरम करून तेच सारखे वापरू नयें.
 • भजी करताना ओव्याचे पान ,ओवा घालून करावे.
 • वर्षासहल आणि भजे जोडी सलामत ठेवाच पण त्याबरोबर इतरही सात्म्य आणि उपकारक पदार्थ खा.

अर्थातच पाऊस धोधो हवा आणि आहार रिमझिम. आहार धो धो आणि पाऊस रिमझिम असून कसे चालेल ? हॅपी मॉन्सून !

7 thoughts on “धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार

 1. खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  Like

 2. तुम्ही दिलेली महिती ही आमच्या साठी नेहेमीच छान असते , 🙏🙏🙏

  Like

 3. खूपच छान माहिती दिलीत आपण.. मनापासून धन्यवाद🙏आपल्याला खूप खूप शुभेच्छा🌹🌹

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s