Super food for Super Little Heros

images (5)लहान सुपरहिरो आणि सुपर फूड सवयी :

राष्ट्रीय पोषण सप्ताह

लेख क्रमांक .७

लहान मुले झपाट्याने वाढत असतात.त्यांची पोषणमूल्ये निकड अर्थातच वृद्ध लोकांपेक्षा जास्त असते.वाढ, निर्मिती आणि स्थैर्य ह्या बाबी शरीरात प्रकर्षाने कार्यरत असतात. हे सर्व कफ दोषाचे गूण होत. लहान मुलांमध्ये कफ दोषाचे नैसर्गिक रीत्याच आधिक्य असते.हा कफ दोष, मुलांच्या शारीरिक वाढीस कारणीभूत असतो. बालकांना लागणारी गाढ झोप ,प्रसन्नता ,खळखळून हसणे,बाळसे, हि सर्व कफ दोषाचीच देणगी होय .

हा नैसर्गिक आणि उपकारक कफ दोष चुकीच्या आहारामुळे फाजील वाढून त्रास देणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते.

एक वर्षावरील बालकांना ,सर्व प्रकारच्या चवींचे अन्न खाण्याची सवय लावणे खूप महत्वाचे असते.नेमके लहान मुलांना कधी कधी आपण पालक तर कधी इतर आप्त वारंवार चॉकलेट,मिठाया ,आईस्क्रिम,कोल्ड ड्रिंक्स,केक असे अतिगोड पदार्थ खाण्याची सवय लावण्यास कारणीभूत ठरू शकतो.

वरील पदार्थानी अतिरिक्त गोडं चव आणि साखर पोटात जाते ,पोषणाच्या दृष्टीने हे पदार्थ म्हणजे एकंदरीत आनंदच असतो.या पदार्थांची पटकन सवय लागते हि वेगळीच एक समस्या असते जी मुलांच्या पुढील हट्टीपणा या एका अजून नवीन समस्येला खतपाणी घालते.

स्वभावतःच लहान मुलांना गोडं चव आवडत असते. परंतु गोडं पदार्थांमधील कुठले पदार्थ दिले म्हणजे पोषण हि होईल आणि त्या गोडं चवीचा त्रासही मुलांना होणार नाही हा विचार बरेचदा पालक,डॉक्टर करताना कमी पडतात का?ह्याच मुद्द्यांवर लिहिण्याचा प्रयत्न केलाय.

 • लहान मुलांच्या या वयात विशेषतः हाडांची, मेंदूची ,बुद्धीची आणि मांस पेशींची झपाट्याने वाढ होत असते. तेव्हा या सगळ्याला मदत करणारे अन्नपदार्थ योग्य रित्या दिली जाणे आवश्यक असते.जीवनसत्वे,खनिजे,प्रथिने,तेल तूप यांची आवश्यकता या वयात सर्वात जास्त असते.त्या त्या कुटुंबातील पद्धतीप्रमाणे घरचा ताजा आहार हा सर्वात पोषक आहार होय. सर्व प्रकारच्या भाज्या,चटण्या,कोशिंबिरी,नाश्त्याचे पदार्थ ,पारंपरिक गोडं पदार्थ खाण्यात असावे.

  खास वेगळे पोषक तत्वे बाहेरून देण्याची फारशी गरज सर्वसाधारणपणे पडत नाही.दुधात घालायची बाहेरची सो कॉल्ड चॉकलेट प्रोटीन पावडर पेक्षा घरचा खारीक बदामाचा लाडू किंवा पूड दहा पट पौष्टिक ठरते.

 • लहान मुलांना छोट्या छोट्या चांगल्या सवयी घरातून च लागतात.घरी फरसाण शेवेचे डबे भरून ठेवले तर तशीच चव वाढीस लागेल. अर्थात शेव फरसाण वाईट नाही परंतु नेहमी आणि जास्त प्रमाणात खाणे वाईट असते. कधीतरी अथवा मिसळीवर वरून पेरून थोडी खाणे इतपतच प्रमाण ठेवणे चांगले .डिशच्या डिश भरून जर संध्याकाळी तसे खाल्ले तर अर्थातच पचनावर विपरीत परिणाम होतो.
 • हल्ली दवाखान्यात येणाऱ्या ४० ते ५०% लहान पेशंट्समध्ये मलबद्धता हे मूळ कारण बऱ्याच रोगांचे आढळून येते. मूळ रोगाचं कारण पोटात दडले असते आणि औषधांपेक्षाही आधी खाण्याच्या सवयींबाबत पालकांशी बोलावे लागते.नाहीतर औषंधाचा भडीमार चालूच राहतो व पचन अजूनच बिघडत राहते.

मला एक जुनी केस अजूनही कायम आठवते. टॉन्सिल सारख्याच ऍडिनॉइड्स नावाच्या गळ्यातील गाठींनी त्रस्त १० वर्षाचा मुलगा एका बालरोग तज्ज्ञांनी आयुर्वेदिक चिकित्सा व सल्ल्यासाठी माझ्याकडे पाठवला होता.वारंवार एन्टीबीओटीक देणे त्या डॉक्टरांना पटत नव्हते. केस घेतल्यावर माझे निदान मात्र मलबद्धता आणि पोटातील कृमी असे झाले. तुम्ही आधी त्याचा घास आणि गाठी ची ट्रीटमेंट करा हो असा खूप आग्रह पालकांनी करूनही सुरुवातीचा एक महिना त्याची मलप्रवृत्ती नीट होणे आणि पोटातील जंतांवर दीर्घ काळासाठी औषध आणि आहार योजना यावरच मी भर दिला.

पचन सुधारल्यावर तसेच खाण्याच्या सवयी बदलल्यावर अपेक्षित परिणाम दिसून आले.

 • बिस्किट्स, शेव फरसाण, खाकरे,कॉर्न फ्लेक्स ,ओट्स,नूडल हे तसे पहिले तर अतिशय कोरडे आणि शिळे पदार्थ या गटातच मोडतात.त्यामुळे प्रवासात, जेंव्हा ताजे पदार्थ बनवून खाणे शक्य नाही अथवा कधीतरी चवबदल म्हणून एवढीच परवानगी या पदार्थाना द्यावी.त्या ऐवजी मका, राजगिरा,नाचणी,ज्वारी बाजरीच्या ,साळीच्या लाह्या घरी तुपाची खमंग फोडणी देऊन मीठ साखर घालून चिवड्यासारखे खाणे कधीही चांगले.

  मुलांपेक्षा मुलांच्या आई वडिलांना या गोष्टी समजावून सांगणे बरेचदा अवघड जाते. त्यांची असे पदार्थ मुलांना देण्याची सवय सोडवणे हे कठीण काम असते.कारण ह्या गोष्टी आज घराघरात पारंपरिक अन्न म्हणून ठाण मारून बसतात.

  मीडिया, मोहक विज्ञापने आणि त्यातली सुंदर आई व गोंडस मुले आपला त्या पदार्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतात आणि ते पदार्थ दुकानातील शेल्फ वरून घरी कपाटात कधी येतात ते आपल्याही कळत नाही.

  मग मुलांनी काय खाणे चांगले ?

  सगळ्यात आधी डब्याचा प्रश्न सोडवा असा आग्रह नक्कीच हे प्रकरण वाचताना सर्व आयांच्या मनात आला असेल. तोच प्रश्न आधी निकालात लावू तर.

तुझ्या डब्यात आज काय ए ?

 • खाऊचा छोटा डबा आणि मधल्या मोठ्या सुट्टीचा जेवणाचा डब्बा हे दोन्ही डब्बे म्हणजे लहान मुलांच्या दिवसभरातील पोषणमूल्यांची लाईफलाईन च असते.
 • डब्यतील पदार्थ ताजे, पचायला सोपे आणि चवीला रुचकर असावे.
 • बाहेरचा खाऊ खाण्यासाठी डब्याऐवजी पैसे देणे टाळावे.
 • फास्ट फूड किंवा प्रिझर्व्हडं फूड डब्यात देणे टाळावे.शिळे पदार्थ डब्यात मुळीच देऊ नये.
 • सॉस जॅम प्रमाण कमी करून साखरआंबा ,मुरंबा,मोरावळा ,हिरवी पुदिना कोथिंबिरीची,चिंच खजुराची गोडं आंबट चटणी अशा चटण्या वापराव्यात.
 • ऋतूनुसार उपलब्ध सर्व फळे आणि भाज्या आणि इतर केली जाणारी व्यंजने द्यावी.
 • उन्हाळ्यात लिंबूसरबत,कोकम सरबत,ताक, जलजिरा,कैरीचे पन्हे अशी ताजी पेये
 • डब्यासॊबत छोट्या बाटलीत भरून अवश्य द्यावीत.
 • पावसाळ्यात किंवा खूप उन्हात खूप आंबट ,चिकट आणि आंबवलेले पदार्थ देणे नक्कीच टाळावे.
 • डब्यामध्ये ऋतूनुसार काकडी ,बीट ,गाजर ,मुळा यांची छान आकारात कापलेले ४ ते ५ काप छोट्या डबीत द्यावे.डब्बा खाल्यावर दातात अडकले अन्नकण हे सलाड चावून खाताना निघून जातात आणि सलाड चे फायदे मिळतात ते वेगळेच.
 • मोठ्या सुट्टीतील डब्यात पोळी भाजी, पराठे,पुरी भाजी,असे पदार्थ द्यावे.वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे धिरडे नाचणी उकड ,पौष्टिक लाडू असे पारंपरिक पदार्थ आवर्जून द्यावेत.

  (पुस्तकाच्या पुढील प्रकरणामध्ये सविस्तर दिलेल्या सर्व रेसिपी या डब्यात द्यायला उत्कृष्ट आहेत. त्यामुळे डब्यासाठी वेगळे आणि घरच्या नाश्त्यासाठी वेगळे हा खूप नाजूक प्रश्नही आपोआप निकालात निघतो.)

 • डबा शक्यतो स्टील चा वापरावा प्लास्टिक वापरणे टाळा अथवा उत्तम दर्जाचे प्लास्टिक असल्याची खात्री करून ते डबे वापरा.

दुपारी घरी आल्यावर मऊ वरण भात तूप अथवा भाजी पोळी किंवा भाकरी दूध कुस्करून असे जेवणच द्यावे.

परत सुरु होते संध्याकाळची भुकेची प्रश्न चिन्हे.

 • संध्याकाळी ताजी फळे चिरून देणे उत्तम.
 • याखेरीज राजगिरा लाडू दूध, चिक्की, दुधात भिजवून साखर पोहे किंवा ताकातले फोडणीचे पोहे.
 • दाण्याचा लाडू,चिवडा देखील चालू शकतो.
 • एग फ्राय,उकडलेले अंडे आणि दूध हाही उत्तम पर्याय होय.
 • वेळ असेल तेंव्हा कधीतरी गरम गरम भजी असे सरप्राईज मुलांना किती आवडेल बघा.

सोडा कोल्ड ड्रिंक्स कॅन मधले फ्रुट ज्यूस हे आरोग्यदायी नसून यातून शून्य पोषण मूल्ये मिळतात त्यामुळे यापासून मुलांना लांबच ठेवा

ह्या लेखमालेतून पोषणासंबंधी गर्भिणी, सूतिका,नुकतेच खायला लागलेले बाळ ते शाळेतून डब्यातून मिळणारे पोषण असे मुद्दे सात लेखांतून समजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आपल्याला या लेखमालेतून निश्चित थोडातरी फायदा झाला असेल हि खात्री. परत नियमित ब्लॉगद्वारे भेटत राहूच

उत्तम खा निरोगी राहा !

लेखिका:डॉ.रुपाली पानसे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s