skip to content

मेंदूचे अपहरण होतेय ! सावधान !

मोबाईल आणि माणूस म्हणून आपण दाखवत असलेली पदोपदोची भयानक असंवेदनशीलता यावरील एक विडिओ बघण्यात आला. अंगावर काटा उभा राहिला आणि याच जमातीचा मीही एक भाग आहेच लक्षात आल्यावर स्वतःची चीड वाटली लाजही वाटली.
स्क्रीन साठीची हि आपली अधीनता भयावह आहे हे नक्कीच.
यापूर्वी पोस्ट केलेला ब्लॉग हा व्यसन या शब्दाची ओळख करून देणारा होता.त्या पुढील लेखांमध्ये आपण विविध व्यसनांबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी खाडकन डोळे उघडतील असे काही सत्य शोधुयात.
पहिला लेख आपण माझ्या वर्डप्रेस साईट वर कधीही वाचू शकता.

“चरस गांजा चे हजार पेशंट बरे करायला जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास एका इंटरनेट,मोबाईल किंवा स्क्रीन ऍडिक्शन चे व्यसन सोडवायला होतो.’ ‘ एका प्रसिद्ध व्यसनमुक्ती मानसोपचार तद्न्य डॉ.निकोलस करदार यांची हि कबुली ह्या लेखाचे गांभीर्य अधोरेखित करायला पुरेशी आहे.

हे स्क्रीन ऍडिक्शन म्हणजे नक्की काय?
दुर्दैवाने असे काही व्यसन /ऍडिक्शन असते हेच मुळी अनेक सुजाण,अजाण ,शिक्षित,सुशिक्षित ,अशिक्षित थोडक्यात आपणास माहित नसते किंबहुना आपण ते मान्य करावयास तयार नाही.
मोबाईल वरील सततचे गुंतणे,विडिओ गेम,इंटरनेट चा सतत वापर (जुगार,खरेदी,फेसबुक,व्हाट्स अँप,चॅटरूम,इंस्टाग्राम,इत्यादी),टेलिव्हिजन चा सतत वापर, हे सर्व स्क्रीन चे प्रकार आहेत.स्वतःवर नियंत्रण न ठेवता या गोष्टी वैक्तिक आयुष्यास ,आरोग्यास व सामाजिक जीवनात जेंव्हा हानिकारक ठरू लागतात आणि तरीदेखील ह्या गोष्टींती ची सवय मोडता येत नाही तेंव्हा ती व्यक्ती स्क्रीन अडिक्टेड आहे असे आपण म्हणू शकतो.

मी स्क्रीन एडिक्ट आहे का ? कसे ओळखावे?

  • तुम्ही सतत मोबाईल,इंटरनेट किंवा लॅपटॉप वर असतात आणि नसतात तेंव्हा देखील त्याविषयीचे विचार मनात घोळत असतात का?
  • पूर्वीपेक्षा तुमचा इंटरनेट किंवा इतर कुठल्या स्क्रीन वरचा वेळ वाढतच चालला आहे का?
  • मी इंटरनेट कमी वापरणार किंवा व्हाटस अँप बंद ठेवणार इत्यादी संकल्प सतत वारंवार करून देखील तसे करण्यात तुम्ही अयशस्वी होताय का?
  • स्क्रीन (मोबाइलला/लॅपटॉप/TV) पासून दूर असाल तर चिडचिड होणे अस्वस्थ वाटणे,मूड खाली वर होणे असे अनुभव येतात का?
  • ठरवलेल्या वेळेपेक्षा तुमचा ऑनलाईन राहण्याचा किंवा गेम खेळण्याचा किंवा TV बघण्याचा वेळ नेहमी जास्तच होतो का?तुम्ही स्वतः ठरवली ती आणि तेवढी वेळ पाळायला असमर्थ ठरता का?
  • इंटरनेट करीता शिक्षण,अभ्यास,नोकरी,नातेसंबंध आणि जबाबदाऱ्या यांच्याशी देखील तुम्ही प्रसंगी तडजोड करता का? इंटरनेट समोर या गोष्टींची देखील तुम्हाला पर्वा नसते का?
  • इंटरनेट, गेमिम्ग किंवा तत्सम गोष्टींकरिता अथवा अशा गोष्टी लपवण्याकरिता, जोडीदाराशी कुटुंबाशी खोटे बोलणे टाळाटाळ करणे इत्यादी तुम्ही करता का?
  • मूड चांगला व्हायला ,टेन्शन विसरायला, अडचण टाळायला तुम्ही इंटरनेट \’सुखाची गोळी\’ ( प्लेजर पिल)म्हणून वापरता का? (तात्पुरती नशा)
    वरील ३ किंवा ३ पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे आपण हो देत असाल तर सावधान ! तुम्ही स्क्रीन/इंटरनेट ऍडिक्शन चे बळी आहात!

इंटरनेट /स्क्रीन ऍडिक्शन चा धोका नक्की आहे तरी काय?

  • वरील व्यसन असलेली व्यक्ती हे व्यसन वेळेत न सुटल्यास भविष्यात डिप्रेशन,अति टोकाचा ताणतणाव,गंभीर मानसिक विकार अशा सर्व आजारांना बळी ठरू शकते.
  • याउलट देखील तेवढेच खरे आहे. मानसिक दृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती लवकर इंटरनेट/स्क्रीन ऍडिक्शन च्या आहारी जाऊ शकतात.
  • इंटरनेट /गेम ऍडिक्शन असलेली मुलं भावनिक दृष्ट्या स्वस्थ नसतात.अतिआक्रमकता, वर्तन संबंधित समस्या, शाळेतील गैरवर्तन आणि अभ्यासासंबंधीची अधोगती तसेच सामाजिक दृष्ट्या अव्यवहार्य किंवा अस्वीकार्य वर्तन अशा अनेक गंभीर समस्या ह्या व्यसनापायी उद्भवतात. गम्मत म्हणजे त्यांच्या अशा वागणुकीचे मूळ हे तुम्ही त्यांना भेट दिलेल्या महागड्या गॅजेट्स मध्ये असेल अशी पुसटशी कल्पना देखील तुम्हाला नसते. दुर्दैवाने मार,धाक अशा पद्धतीने अशी मुलं हाताळली जातात आणि समस्या अधिक गंभीर होते.
  • सततच्या इंटरनेट/मोबाईल वापराने शारीरिक आरोग्य देखील ढासळते.भूक न लागणे, अन्न नीट न पचणे, झोप नीट न लागणे, ओबेसिटी ,डोळ्यांचे खूप प्रकारचे आजार आणि बोटांच्या सततच्या विशिष्ट हालचालींमुळे कार्पेल टनेल सिंड्रोम सारखे वेदनादायी व्याधी देखील होतात.
  • स्क्रीन ऍडिक्शन मुळे मेंदूत ऍड्रेनॅलीन आणि डोपामिन हि संप्रेरके अनावश्यक आणि अतिप्रमाणात स्रवली जातात.ह्या संप्रेर्कामुळे अनावश्यक संवेदना चेतवले जाणे, (ओव्हरस्टीम्युलेशन ऑफ सेन्सेस),रक्तदाबात चढ उतार, विचित्र वागणूक आणि प्रतिक्रिया, मन अशांत एकाग्रतेचा अभाव आणि सदैव ताणाखाली असणे असे गंभीर परिणाम दिसून येतात. सततच्या स्क्रीन वापराने लहान मुलांच्या मेंदूच्या फ्रॉन्टल कॉर्टेक्स ह्या भागाचा विकास आणि वाढ अपूर्ण राहते असे संशोधनाने सिद्ध झाले आहे.
  • डोपामिन हॉर्मोन इंटरनेट किंवा गेमिंग मध्ये जेंव्हा मेंदू स्त्रवतो तेंव्हा तो क्षणिक अत्यानंद किंवा थ्रिलची भावना मनात उत्पन्न करतो . हि भावना पुढे जाऊन त्या लहान मुलाची किंवा मोठ्या व्यक्तीची देखील गरज बनते.ह्या भावनेपोटी पूर्वी पेक्षा अधिक तीव्रतेने, अधिक वेळ आणि अधिक थ्रिल साठी इंटरनेट किंवा गेम खेळाला जातो.दुर्दैवाने ह्या फेऱ्यात अलगद ओढले जाऊन आपल्या चिमुरड्याला व्यसन लागलेय हि जाण असण्याइतपत माहितीही आपल्याला नसते.आणि आता मुलं स्क्रीन शिवाय राहू शकत नाही. ओरडा मार यांचा उपयोग होत नाही आणि परिस्थिती गंभीर होते.म्हणूनच ड्रग पेक्षाही स्क्रीन ऍडिक्शन अधिक भयानक आहे.
  • ब्लू व्हेल,पॉड च्यालेंज किंवा इतरही अनेक ऑनलाईन गेम ,कार्टून,मोबाईल गेम ह्याचे ढळढळीत उदाहरण होय.
  • स्क्रीन वरील कार्टून, विडिओ गेम सतत भराभर बदलत जाणारे चित्र व आवाज यांचा मेंदूवर दूरगामी वाईट परिणाम होऊन आकलन संबंधी समस्या आणि अतिआक्रमकता असे दुष्परिणाम मुलांवर दिसून येतात.
  • विश्वास बसणार नाही परंतु १० वर्षे इतके कमी वय असलेल्या मुलं मुलींचे फेसबुक व इतर सोशल साईट्स वर अकाउंट्स आहेत.इंटरनेट द्वारे बाल लैंगिक छळ,शारीरिक मानसिक छळ, ब्लॅकमेलिंग होते अथवा होऊ शकते.आणि अशा घटनांची संख्या पालकांची काळजी वाढावी इतपत जास्त आहे.बाहेरदेशात च नव्हे तर असे पेडोफाईल ग्रुप्स आणि गुन्हेगार ऑरगनाईज्ड पद्धतीने अशी कामे करत असतात.

(मध्ये समुपदेशनादरम्यान एका अल्पवयीन पेशंट कडूनच मला अशा चाट ग्रुप्स किंवा चाट साईट्स ची माहिती मिळाली जी सुरुवातीला गप्पा मारून मैत्री करवून नंतर गुप्ततेत ड्रग्स पुरवतात.)
लहान मुलांच्या वयाला अयोग्य माहिती (जसे पॉर्न, गुन्हेगारी विश्व ,ड्रुग्स कुठे मिळतात कशी घ्यावी तसेच अशा लोकांचे नंबर) अजाणत्या वयात त्यांना मिळू शकते.

आत्महत्या,वेगवगेळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यात अडकले जाणे,आर्थिक फसवणूक,भावनिक फसवणूक,अयोग्य माहिती सहजासहजी मिळून मनावर आणि वर्तणुकीवर होणारे परिणाम ह्या आणि इतर अनेक गंभीर अडचणी इंटरनेट आणि अति वापर यांच्या हातात हात घालून च घरात येऊ शकतात नव्हे येतात.

उपाययोजना:

  • ह्या व्यसनाविषयी चे भान, जागरूकता आणि गंभीरता ओळखता येणे हि खूप महत्वाची पहिली पायरी होय.
    वर्तमानपत्र,जाहिरात क्षेत्रे, सिनेमे ,शाळेतील समारंभ, विविध वर्कशॉप्स यांचे जागरूकता वाढविण्यासाठी महत्वाचे योगदान आवश्यक होय.(दुर्दैवाने मीडिया चा सहभाग यात नगण्य च दिसतो).
  • पालकांची ठाम भूमिका आणि त्या भूमिकेवर स्थिर राहणे आवश्यक होय. गरज पुरवणे आणि अतिलाड यातील फरक ओळखून आपल्याच पाल्याचे नुकसान टाळणे महत्वाचे.(खाऊ भरवताना विडिओ बघायची लावलेली सवय पुढे आपल्याला महागात पडू शकते ती अशी ..स्क्रीन ऍडिक्शन च्या रूपात!)
  • गरज असेल तेंव्हा योग्य तज्ज्ञाची .थेरपिस्ट ची मदत घ्या.
  • मैदानी खेळ,पुस्तके,छंद वर्ग,अभ्यास यात मुलांचा जास्तीत जास्त वेळ अडकवा जेणे करून स्क्रीन चा सहारा त्यांना आवश्यक वाटणार नाही.
  • इंटरनेट सेफ्टी विषयी जाणून घेऊन आवश्यक असेल तर इंटरनेट ऑटो disable अँप सारखे अँप ची मदत घ्या.घरातील वायफाय ला पासवर्ड अवश्य ठेवा.
  • वाढत्या वयातील काही गोष्टींवर पूर्ण बंधन आणणे योग्य नाही. परंतु delaying ग्रॅटिफिकेशन हि उपाययोजना ठरू शकते.
  • मोकाट सोडणे आणि जाणीवपूर्वक तुमच्या सोबतीने त्यांना हळू हळू हवे तेवढेच ह्या अशा गोष्टी वापरायची मुभा देणे यातला फरक निश्चित मुलांवर मोठ्या प्रमाणात चांगलाच होईल.
  • सगळे जण वापरतात, मित्र मैत्रिणीनं कडे आहे म्हणून , स्टेटस सिम्बल म्हणून किंवा काय फरक पडतो जे व्हायचे ते होणारच काळच असा आहे अशी भूमिका काळजीप्रद आहे हे निश्चित.

इंटरनेट /स्क्रीन व्यसनासंबंधित काही गंभीर बाबी!

  • मोबाईल आणि टॅबलेट तसेच इतर इंटरनेट साधनांची विक्री दार वर्षी ११२% या दराने वाढतेय.
    १८ ते २४ या वयोगातील जवळजवळ ७७%मुले हि नोमोफोबिया( मोबाईल जवळ नसण्याचे भय हा मानसिक गंभीर विकार होय) ह्या आजाराने ग्रस्त आहेत.
  • जगातील ७१% लोक हे कामाच्या वेळात,कार्यालयीन जागेत सोशल मीडिया,चाट,ऑनलाईन खरेदी, वैयक्तिक कामे, इंटरनेट गेमिंग,youtube , ऑनलाईन ट्रेडिंग आणि पोर्नोग्राफी इत्यादी विविध तर्हेच्या इंटरनेट संबंधित गोष्टींमध्ये क्रियाशील असतात असा एक अहवाल होय.
  • लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगातील इंटरनेट,मोबाईल वापरणाऱ्या देशांमध्ये अव्वल क्रमांकावर होय.मी टाईप करत असताना हि संख्या वाढत आहे याची मला खात्री आहे आणि खेद देखील.
  • अलीकडेच दक्षिण कोरिया हादरला ते इंटरनेट कॅफे मध्ये गेम आणि त्यासंबंधित वादांमुळे तरारून वयातील १० मुलांच्या मृत्यूंमुळे!(त्यातील काही मृत्यू गूढ रित्या अचानकपणे जागच्या जागी झाले होते.प्रचंड ताणामुळे कार्डियाक अरेस्ट असे निदान होते. )
  • OCt२००५ मधील एक इंटरनेट मूळे झालेल्या आत्महत्येमुळे प्रसिद्ध तंत्रनिकेतन विद्यालयाने कॉलेज आणि वसतिगृहातील जागांमध्ये इंटरनेट बंदी घातली.महाविद्यालयातील ८४% मानसोपचार तद्न्य किंवा समुपदेशक मेनी करतात कि इंटरनेट ऍडिक्शन हे धोकादायक पातळीवर वाढलेय.आणि अजून गंभीर बाब म्हणजे त्यातील ९४% समुपदेशकांना इंटरनेट ऍडिक्शन कसे हाताळावे याचे प्रक्षिक्षण अथवा माहिती नाही.

किशोरवयात पदार्पण करणाऱ्या एका मुलीची आणि मुलाची आई म्हणून हि काळजी मला देखील कायम असतेच. आपल्या पेक्षा पिढी ४ पावले पुढे राहणारच. परंतु मुलांना योग्य भाषेत योग्य गोष्टी पोचवणे आपल्या हातात.चांगले वाईट ओळखून त्यातून कमीत कमी नुकसान होईल इतपत योग्य मार्गावर मुले चालली तरी लेख सार्थ होईल.
आपला मेंदू आपल्या कह्यात राहो, त्याचे अपहरण होऊन आपला मेंदूच आपल्याला ब्लॅकमेल न करो हि सदिच्छा!
पुढील लेखात व्यसनाविषयी अधिक माहिती जाणून घेऊच .लेखिकेचे इतर सगळे ब्लॉग्स drrupalipanse.wordpress.com ह्या लिंक वर वाचू शकता

डॉ.रुपाली पानसे ,
आद्यं आयुर्वेद क्लीनिक ,पुणे
९६२३४४८७९८
(कृपया लेख मूळ लेखात फेरफार न करता तसेच लेखिकेच्या नावा-माहितीसह तसाच शेअर करणे.आपल्या या कृतीने लेख लिहिण्यासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान लेखिकेस मिळेल)

Share this :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart