Are we becoming walking zombies?

चालते फिरते झॉम्बी आणि आयुर्वेदाचा उतारा !


“रुपाली तू पुण्यात येशील ना, तुला तू सोडून गेलेले पुणे दिसणार नाही! ह्या करोनाने समाजाचे सर्वांगाने खच्चीकरण केलेय ग. खिरापत वाटावी ना तसे शंखपुष्पी, ब्राह्मी वाटण्याची आज गरज आहे, इतके मानसिक आरोग्य ढासळलेले दिसते पेशंट्स आणि आजूबाजूच्या लोकांचे. चालते फिरते झॉम्बी बनू कि काय आपण, अशी भीती वाटतेय” परवा फोन वर एक मैत्रीण कळकळीने बोलत होती. खरंच ह्या covid ने जगातील समाजाची मूळे कमकुवत करायला घेतलीये जणू . आर्थिकहानी ,जीवितहानी , शैक्षणिक संभ्रम ,ठप्प पडलेली औद्योगिक घौडदौड ,शारीरिक आरोग्य ,सामाजिक आरोग्या बरोबर, वैयक्तिक मानसिक आरोग्य देखील बळी पडले आहे.


मानसिक आरोग्य आणि आयुर्वेद असे लिखाण काही आठवड्यापासून सुरु केले आहे. आहारावर अनेक वर्षे लिहतेच आहे. परंतु इथे खूप जणांना कदाचित माहिती नसेल कि आहाराचा आणि मनाच्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. आणि आयुर्वेदाने तो हजारो वर्षांपूर्वी ओळखला आणि त्या अनुषंगाने आहार नियम, दिनचर्या ऋतुचर्या मांडली गेली. आयुर्वेदात स्पष्ट उल्लेख आहे कि आहारामुळे फक्त शरीराचे नव्हे तर मनाचे देखील पोषण होते. मनाचे पोषण हा खूप महत्वाचा मुद्दा अनेक दशके आधुनिक वैद्यक शास्त्र दुर्लक्षित करत होते. सुदैवाने गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या संशोधनाने आहाराचे मानसिक आरोग्यामधील महत्व पटल्याने आहारावर देखील आता भर दिला जातोय. परंतु परत एकदा आधुनिक आहारशास्त्राच्या मर्यादा मनोरुग्णांमध्ये दिसून येताय. याला कारण प्रत्यके व्यक्ती हि वेगळी, आहे युनिक आहे आणि त्या व्यक्तीचा आहार व आजार देखील .सर्व सामान्य नसणार, युनिक च असणार. one size fits all हे सरसकट समीकरण म्हणूनच डाएट आणि चिकित्सेच्या च्या बाबतीत लागू पडत नाही आणि मग हवे तसे results देखील पेशंट मध्ये दिसत नाही.
आज ‘गट हेल्थ – गट हेल्थ ‘ चा उदो उदो चाललाय, आतड्याचे आरोग्य जपायला जे फॅन्सी नंवनवीन उत्पादन बाजारात येताय ते गट हेल्थ आयुर्वेदाने आधीच नमूद केले होते आणि त्याचे प्रत्येक शारीरिक आणि मानसिक आजारामधील महत्व देखील बोल्ड लेटर मध्ये सॉरी श्लोकामध्ये मांडले आहे. एक साधे उदाहरण बघुयात. जुनी पुराणी बापडी परंपरा आहे बुवा कि घरात मृत्यू झाल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये साधा भात तूप घालून खायचा असतो. एरवी पांढऱ्या भातावर नुसते तूप घालून बघा घरातले ज्येष्ठ कसे अंगावर धावून येतील. ते असो परंतु भरपूर तूप घातलेला भात का. आयुर्वेदात तूप मनासाठी शामक असणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये उत्कृष्ट आहारीय पदार्थ सांगितले आहे. ते जाऊ द्या हो रिसर्च चे बोला. गायीचे तूप हे DHL , essential fatty acids चा सर्वोत्कृष्ट सोर्स असल्याचे विज्ञान सांगते. नर्व्ह हेल्थ साठी असे फॅटी ऍसिडस् अत्यावश्यक असतात त्यांच्या कमतरतेने Parkinsons , Dementia , Mood swings , डिप्रेशन असे अनेक मनाच्या व्याधी शी निगडित क्रिया शरीरात होऊ शकतात. त्यामुळे तूप किंवा इतर उत्तम फॅटी ऍसिडस् अत्यावश्यक. म्हणूनच आयुर्वेदातील मनावर काम करणारी अनेक औषधे हि तुपाच्या स्वरूपात असतात. औषधी तुपाचा वापर मानसिक आरोग्यासाठी केला जातो. आज जे functional फूड आणि neutraceutical म्हणून चकाचक स्वरूपात मार्केट मध्ये आणले जातेय ,तेच तसेच.


आहाराच्या चुकीच्या सवयी देखील मानसिक आजार निर्माण करू शकतात. पडला ना बुचकळ्यात. “जेवणाने लोक वेडे होतात ?काय पण हाआई” आहाराविषयी बोलताना अशीच निरागस प्रतिक्रिया माझ्या मुलाची देखील आली होती सो इट्स ok . हो आहाराचा , आहारसवयीचा आणि वर्षानुवर्षे केलेल्या आहारातील चुकांचा नक्कीच शरीरासारखा मनाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. म्हणूनच तर मोठ्या आतड्याला शरीराचा दुसरा मेंदू म्हणतात. मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे सेरोटोनिन हे संप्रेरक मेंदू पेक्षा आतड्यातून जास्त प्रमाणात स्रवले जाते. त्यामुळे आतड्यामधील अनारोग्य मानसिक आरोग्यावर निश्चित परिणाम करते.
त्यामुळेच तर अनेक शारीरिक व्याधींचे मूळ हे मनाच्या बिघडलेल्या आरोग्यामध्ये सापडते आणि मनाच्या रोगाचे मूळ आतड्यात. आहे ना गुंतागुंत. हीच गुंतागुंत आयुर्वेदामध्ये मात्र खूप साध्या सोप्या पद्धतीने सोड्वलेली आहे. मुळात मनाचे आरोग्य बिघडूच नाही हा आयुर्वेदाचा अप्रोच असल्याने, जीवनशैली कशी असावी, वर्तन कसे असावे , आहार कसा असावा यावर सखोल माहिती आयुर्वेद देते. मानसिक आरोग्य जपण्यासाठी चे प्रेव्हेंटिव्ह मेजर्स हे आयुर्वेदाकडून आज समाजात योग्य भाषेत स्वरूपात पोचण्याची प्रचंड निकड आहे.
अँटीसायकॉटिक, सिडेटिव्ह, अँटिडिप्रेससेन्ट हे म्हणजे कोंबडा झाकण्याचा प्रकार आहे. केवळ लाक्षणिक चिकित्सा आणि अतिशय भयावह दुष्परिणाम यामुळे मूळ मानसिक आजार बरा न होता रुग्णाची ससेहोलपट मात्र होत राहते. आज आधुनिक शास्त्रातील अत्यावश्यक औषधे व सेवा आणि आयुर्वेदातील तत्वे आणि औषधे आहार जीवनशैली यांचे इंटीग्रेशन होणे अति आवश्यक गोष्ट होय.
अगदी सात्विक, राजसिक तामसिक ह्या गीतेमध्ये वर्णन केलेल्या आहार प्रकारांचा देखील शरीर व मनावर होणार चांगला वाईट परिणाम व्यवहारात पेशंट बघताना जसाच्या तास होताना किंवा झालेला दिसतो. डाएट कन्सल्टिंग च्या वेळेस मग हि कॅटेगरी का विचारात घेऊ नये. आज मॉडर्न फूड चे प्रकार जसे कॉकटेल्स, मल्टिकुसीन फूड, प्रोसेस्ड फूड, रेडी तो इट फूड ह्या त्रिगुणात्मक आहारामध्ये क्लासिफाय करता येतील का. जरूर करता येतील. पेशंट तपासताना, आहारसल्ला देताना मी आणि माझ्यासारखे वैद्य हे आधुनिक बाबींचा नक्कीच विचार करतात आणि त्या प्रमाणेच सल्ला देतात.
हे झाले आहाराबद्दल याखेरीज मनाच्या आरोग्यावर परिणाम करतात त्या आपल्या शारीरिक आणि मानसिक सवयी. आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरात आणि मनात उत्पन्न होणाऱ्या काही urges म्हणजे नीड्स चा उल्ल्लेख केलाय. त्यातील काही उत्पन्न होणाऱ्या शारीरिक भावना ह्या रोख्याच्या नसतात त्या नैसर्गिक असतात. जसे तहान भूक, झोप, शिंक ,खोकला,अश्रू आणि इतर. त्या उत्पन्न झाल्यावर जर वारंवार रोखल्या तर त्या शारीरिक व्याधी उत्पन्न करतात. अगदी असेच मनाच्या पण काही नैसर्गिक भावना प्रकट होत असतात त्या मात्र मनुष्याने प्रयत्नांनी वळण लावून व्यक्त कराव्यात किंवा रोखाव्यात असे आयुर्वेद म्हणते. राग ,द्वेष ,मत्सर ,हिंसा अशा त्या काही भावना होत ज्यांना नीट हाताळून त्या नष्ट कराव्या. असे केले नाही तर मनुष्याचा मनाचा संयम ढळतो आरोग्य ढासळते. अशी व्यक्ती मग वर्तनामध्ये चुका करते. स्वतःला आणि इतरांना हानिकारक ठरू शकते. किती पूर्णागाने वर्तनशैलीचा हा विचार केला गेलाय, त्या साठी ची सद्वृत्त हि थेरी तर आज जी वर्तनचिकित्सा म्हणून ओळखली जाते तीच थेरपी होय, नाही का?
एकंदरीत आयुर्वेदामध्ये मानसिक आरोग्याचा खूप सखोल आणि परिपूर्ण विचार केला गेला आहे.
आज नमूद केलेले सर्वच मुद्दे सविस्तर पुढील लेखांमध्ये एक एक करून आपण बघणार आहोत. जसे आपण मुलांना शाळेपासूनच स्वचतेच्या सवयी, manners , dos -dont शिकवतो तसेच मनाच्या आरोग्याशी निगडित छोट्या छोट्या शिकवणुकी देखील अगदी लहान वयापासून देणे खूप आवश्यक आहे असे नाही वाटत? हा पैलू देखील आपण लेखांमधून बघणार आहोत.
लेख वाचत राहा आणि स्वतःपुरता मर्यादित न ठेवता जरूर अनेकानेक लोकांपर्यंत पोचवा. शेवटी स्वतःच्या मानसिक आरोग्या बरोबर आपण राहतो त्या समाजाचे देखील मानसिक आरोग्य आपणास पूरक हवे. बरोबर ना ?
यापूर्वीचे लेख आपण rupalipanse.com वर वाचू शकाल.

Share this :

Leave a Comment

Shopping Cart