“Ayurveda: Next big thing investors will chase after!”

आधुनिक वैद्यक,जागतिकीकरण आणि शाश्वत आयुर्वेद सिद्धांत
आधुनिक वैद्यक क्षेत्रात झालेली आणि होत असलेली अफाट प्रगती हा आरोग्य सेवेतील अवश्यमभावी भाग होय. सतत भर आणि सुधारणा हा कुठल्याही प्रांतातील यशाची एक ओळीतील गुरुकिल्ली होय.आधुनिक वैद्यकातील शोध,संशोधने हि चिकित्साशास्त्राला अनुकूल ठरावी अशी खरे तर अपेक्षा .परंतु शास्त्राची प्रगती आणि चिकित्सा परिणाम बरेचदा समतोल साधत नाही.
वैद्यकीय प्रांतातील अबब प्रगतीला आणि संशोधनाला कुठेतरी काही व्याधी,काही असाध्य आजार हे दुर्दैवाने वेसण घालताना दिसतात.प्रत्यक्ष प्रमाणावर तंतोतंत सिद्ध झालेल्या गोष्टी बरेचदा कृतीतून मात्र हवे ते परिणाम साधत नाही.जीवनशैली ,आहारशैली यामुळे होणारे व्याधी याचे चपखल उदाहरण म्हणता येईल.आजमितीला जगभरात सर्वात जास्त संशोधन,प्रयोग आणि पैसे कुठे गुंतवले जात असतील तर ते अयोग्य जीवनशैली ,आहारशैली मुळे होणारे लाइफस्टाइल डिसीस,स्वतःच्या शरीरावरच उलटलेली रोग प्रतिकारक शक्ती ज्याला इंग्रजीत ओटॉइम्म्युन व्याधी म्हणतात आणि अनुवांशिक व्याधी यांमध्ये होय.

यावरून आरोग्य आणि व्याधी चा विचार करताना फक्त जिवाणू विषाणू,इन्फेकशन आणि वेदनाशमन याही पलीकडे जाऊन मनुषय शरीरातील बऱ्याच शरीर रचना आणि शरीर क्रियांचा व्यापक अंगाने विचार करणे क्रमप्राप्त होते.
भारतात पाश्चिमात्य वैद्यकीय शास्त्राबरोबर शेकडो वर्षे आधीच अस्तित्वात असलेली आयुर्वेद हि वैद्यकीय शाखा हि आज जगमान्य आहे.आयुर्वेद शास्त्रातील औषधी,पंचकर्म आणि इतर चिकित्सातत्वे आजच्या घडीला कसोटीस उतरताय.आणि वैद्यकीय क्षेत्रात आधी न झालेली गोष्ट आता घडतेय. ती म्हणजे प्राचीन वैद्यक शास्त्रातील थेरी किंवा सिद्धांत पुन्हा अभ्यासले जाऊन त्याचा वर्तमानातील वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक वापर कसा करता येईल यासाठी बौद्धिक गुंतवणूक!
आयुर्वेद शास्त्र हजारो वर्षांपूर्वी अभ्यासले गेले, प्रत्यक्ष प्रमाणावरील अनुभवातून, आप्तवचन तसेच कार्यकारणभाव सिध्दांतातून विकसित होऊन चरकादि विविध ग्रंथात परिणत झाले.
आयुर्वेदाचा पाया फक्त व्याधी आणि चिकित्सा यावर उभा नाही हे आयुर्वेदाचे खरे यश आहे.मनुष्य आणि त्याच्या शरीर मानस भावांशी निगडित सर्व सजीव निर्जीव तत्वांची खोल दखल,त्यांचा मनुष्य आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आणि या सगळ्यातून मनुष्य शरीर आणि मानस आरोग्यासाठीचे एकत्रित सिद्धांत आणि चिकित्साप्रणाली असे आयुर्वेदाचे स्वरूप आहे.

आयुर्वेद शास्त्राने आधुनिक वैद्यक शास्त्राला काय दिले?
मनुष्य जिवाच्या किंबहुना त्याही मागे जाऊन सृष्टीच्या उत्पत्तीपासून आयुर्वेद शास्त्रात विवेचनाला सुरुवात आहे.ज्या मनुष्य प्राण्याच्या आरोग्यासाठी हे शास्त्र आहे तो मनुष्य प्राणी ज्या पृथ्वीवर ज्या पंचमहाभूतांच्या सानिध्यात प्रत्येक मिनिट असतो ,ज्या पंचमहाभूतांपासूनच बनलेल्या अन्नाने त्याचे पोषण होते,ज्या दिनचर्येमुळे त्या मनुष्याचा जेनेटिक प्रोफाइल प्रवाभीत होऊ शकतो ,ज्या ऋतुचर्येमुळे भौगोलिक बदलांचा शरीरावरील परिणामांचा समतोल साधला जातो अशा सर्व लहानमोठ्या बाबींचा अभ्यास या आरोग्य शास्त्रात केला जातो.
आयुर्वेद शास्त्र हे अगणित सिद्धांत आणि परीक्षणांवर आधारित शास्त्र होय .त्यातील काही मुख्य सिद्धांत जे आज हि आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या वैद्यकशास्त्राच्या जन्मापूर्वीच मांडले गेले होते आणि आज हजारो वर्षांनंतर ते जसेच्या तसे आधुनिक वैद्यकशास्त्रात देखील मान्य आहेत ते बघुयात.

१. आरोग्य संकल्पना:
जागतिक आरोग्यसंघटनेने आरोग्याची व्याख्या करण्यापूर्वी हजारो वर्षे आधी आयुर्वेदाने सर्वांगाने निकोप अशी आरोग्य संकल्पना मांडली आहे.
शरीर इंद्रिय आणि मन यांचे प्रसन्न असणे म्हणजेच निरोगी असणे हेच मनुष्य निरोगी असण्याचे लक्षण होय. अशी आरोग्याची व्याख्या आयुर्वेदात केली आहे. शरीर व्याधी मुक्त आहे परंतु मानसिक स्थिती अयोग्य आहे असे असल्यास ती व्यक्ती निरोगी आहे असे म्हणता येत नाही. तसेच मनाने प्रसन्न परंतु शारीरिक व्याधींनी व्यथित असा हि मनुष्य स्वस्थ नसतो. किंबहुना शारीरिक स्थितीचा मनावर आणि मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम हि मुख्य बाब आयुर्वेदात आरोग्याची व्याख्या करताना मांडली गेलीय. सायकॉलॉजि शब्दाचा जन्म व्हायच्या आधी कितीतरी शतके मानसिक आरोग्य हि संकल्पना आयुर्वेदात मांडली गेली.
आजमितीला मानसशास्त्र आणि मानस व्याधी हे सर्वात मोठे आव्हान वैद्यकीय क्षेत्रात दिसून येते.मानसिक विकारांचा वाढता आलेख मानसिक आरोग्याचे महत्व अधोरेखित करतो आहेच .
मानसिक आरोग्यासाठी आयुर्वेदात वर्णन केलेले दिनचर्या आणि सद्वृत्त वर्णन हे आज सायकॉलॉजि विषयाला खूप पूरक होय.

२.प्रकृती:
पृथीवरील प्रत्येक सजीव मनुष्य हा एकमेव,अद्वितीय ‘स्वतःसारखा स्वतःच’ असा नमुना असतो.बोटांचे ठसे, स्वतंत्र आणि युनिक असा आवाज,डोळ्यांच्या बुबुळांची आतील संरचना,मेंदूवरील वळ्या,जेनेटिक संरचना आणि मनाचा कारभार हे सगळे ओरडून ओरडून सिद्ध करतात कि माझ्या सारखा मीच बरं का ! कॉपी पेस्ट होणे नाही!
वात पित्त आणि कफ या तीन कार्यकारी आणि आवश्यक दोषांच्या कॉम्बीनॅशन चा मनुष्याची शरीराची ठेवणं,रंग,उंची,केस,हाडे,त्वचा,स्वभाव,खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी,छंद,शारीरिक मानसिक आरोग्य,झोप,प्रजनन क्षमता,होऊ शकणारे व्याधी किंवा शारीरिक तक्रारी,भौगोलिकतेचा यांच्यावर होणार परिणाम या सर्वावर प्रभाव असतो.थोडक्यता सुक्षम स्तरावर जेनेटिक प्रोफाइल च हे दोष तयार करत असतात. असे अद्वितीय असणे म्हणजेच त्या व्यक्तीची प्रकृती होय. ढोबळमानाने वात पित्त आणि कफ तसेच मिश्र प्रकृती असे गट केले तरी मनुष्याचे स्वतःचे वेगळेपण त्याच्या जीन्स मध्ये जपले जाते. दोषांच्या या तारतम्याने महत्व व्याधी आणि चिकित्सेमध्ये अनन्यसाधारण होय हे सांगायची गरज च नाही. तर बॉडी कॉन्स्टिट्युएंट या नावाखाली उदोउदो होत असलेला प्रकार म्हणजे प्रकृती हि आयुर्वेदाची खूप मोठी देणगी होय.प्रकृतीशी निगडित व्याधी आणि त्यावरील उपायांचे संशोधन हा आधुनिक शास्त्रातील जेनेटिक सायन्स साठी मोलाचे योगदान भविष्यात ठरू शकते.

३.दिनचर्या ,ऋतुचर्या,सद्वृत्त वर्णन :
“लाइफस्टाइल”, ‘प्रेव्हेंटिव्ह मेडिसिन’ “जिऑग्राफिकल इम्पॅक्ट ऑन हेल्थ” “रॅशनल इमोटीव्ह बेहेविअरल थेरपी(REBT ) हे आज आधुनिक वैद्यकशास्त्रात परवलीचे शब्द आहेत ज्यावर खूप संशोधने आणि पेपर लिहल्या जाताय.दिनचर्या आणि ऋतुचर्या म्हणजेच मनुष्याची लाइफस्टाइल होय.
सामान्य व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करणारे प्रकृती,व्यवसाय,बल,आहार,व्यायाम,समाजातील वागणे,निद्रा संभोग इत्यादी सर्व लहान मोठ्या बाबींचा विचार दिनचर्येत आणि ऋतुचर्येत केला जातो. रोज नित्यनियमाने पाळल्या जाणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींच्या सातत्याचा शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यावर परिणाम हि महत्वाची बाब आहे. उत्तम दिनचर्येच्या मार्गदर्शनातून व्याधींचे प्रतिबंधत्व किंवा प्रेवेन्शन म्हणजेच प्रेव्हेंटिव्ह हेल्थ सायन्स नव्हे काय?
आज मानस रोगांमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी REBT हा चिकित्साप्रकर म्हणजे मानला वळण लावून सद्सद्विवेक बुद्धीला जागृत करून वर्तनात आणलेला सकारात्मक बदल होय. अगदी हेच शिक्षण सद्वृत्त (चांगले वर्तन) प्रकरणात चरकसंहिता सांगते. आधुनिक शास्त्रासाठी हा केवढा मोठा मार्गदर्शक प्रबंध ठरू शकतो.

४लिखित स्वरूपातील पहिले साहित्य ज्यात पचनक्रिया(डायजेशन) ,चयापचय(मेटाबोलिसम) ,रोगप्रतिकारक क्षमता(इम्म्युनिटी) यांचा सर्वप्रथम उल्लेख तसेच विस्तृत वर्णन.
खाल्लेल्या अन्नाचे पोटात गेल्यावर काय होते ,शरीरभावात त्या अन्नाची परिणती कशी होते असे सिद्धांत मांडणारे आयुर्वेद हे सर्वप्रथम शास्त्र होय.त्याच प्रमाणे शरीरभावाची वृद्धी म्हणजे चय आणि त्यांचाच ऱ्हास म्हणजे अपचय याचाही सर्वप्रथम उल्लेख आणि चिकित्सेकरिता दाखल आयुर्वेद शास्त्रात घेतली गेली होय.
रोगप्रतिकारता या वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या बाबीचा गर्भावस्थेपासूनच विचार आयुर्वेद शास्त्रात आहे.

५.वनस्पतिज,प्राणिज,खनिज आणि जलीय पदार्थांचे वर्गीकरण आणि गुण विवेचन:(क्लासिफिकेशन ऑफ लिविंग अँड नोंलिविंग एलेमेंट्स):
वैद्यकीय शास्त्रात अन्न किंवा औषधी स्वरूपात वापरता येतील अशा त्या काळी अस्तित्वात जवळ जवळ सर्व पदार्थांचे अतिशय सूक्ष्म विवेचन आयुर्वेदात आहे.उदाहरण द्यायचे झाल्यास वेगवगेळ्या वनस्पतींपासून ते प्राणिज मांसाचे गुणधर्म आणि त्यांचा मनुषय शरीरावर परिणाम. तसेच शिलाजीत,अभ्रक,लोह,सुवर्ण,रजत,जास्त यासारखे खनिज तर समुद्रफेन,प्रवाळ ,कस्तुरी,मृगशिन्ग असे काही प्राणिज वैशिट्यपूर्ण पदार्थांचे इटक्के अचूक गुणधर्म वर्णन आयुर्वेदात आहे कि आज आधुनिक वैद्यकशास्त्राच्या आधुनिक परिमाणावर हि ते खरे उतरते.
या शेकडो पदार्थांचे वर्णन संहितांमध्ये वेगवेगळेया अध्यायात केले आहे. त्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष उपयोग आणि व्याधींवरील करमुक्त देखील योग्य त्या व्याधी किंवा संदर्भाच्या अनुषंगाने संहितेमध्ये येते.
वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या स्नातकास हे एलेमेंटल सायन्स शिकणे देखील किती आवश्यक होते किंवा आहे हे यातून दिसते.हा रोग त्यावर हे औषध असे हे शास्त्र नव्हेच.

६.आहार विषयाचा आरोग्य संदर्भात सखोल विचार.
आहार हा साक्षात प्राणाचे धारण करत असतो .योग्य आहार मनुष्याचे पोषण वृद्धी करतो तर अयोग्य आहार व्याधी आणि आयुष्याचा नाश करतो या तत्वावर आहार प्रकरणे आधारित आहेत.
आहारीय, खाल्या जाणाऱ्या,खाण्याजोग्या सर्व वनस्पतिज ,प्राणिज,खनिज द्रव्याचा सूक्ष्म अभ्यास करणारे आयुर्वेद हे आद्य शास्त्र आहे.
याही पलीकडे आहारविधिविधान (एटीकेट्स ऑफ डाएट , हेल्दी डाएट प्रॅक्टिस), संस्कार (वे ऑफ कुकिंग) ,देश /क्वांटम (प्रदेशानुसार असणारे वेगवगेळे अन्न पदार्थांचे गुणधर्म ) प्रकृतिपरत्वे आहार (कस्टमाइज्ड डाएट),पथ्य अन्न (आजारपणात अन्न ), सात्म्य असात्म्यता (फूड ऍलर्जी ), विरुद्धान्न (इन्कॉपॅटिबल डाएट ), पात्र (युटेन्सिल्स फॉर कुकिंग) इतका मोठा आवाका आयुर्वेदात आहार या विषयाचा आहे .
व्याधी ,औषधी ,चिकित्साशास्त्राच्या शास्त्रात आहाराचा इतका सखोल विचार हि किती दूरदृष्टी दर्शवितो.आज आपण पहिले तर डाएट क्षेत्र सर्वात अधिक विकसित होत असणारे क्षेत्र होय.
कारण आरोग्याचा पाया आहारावरच अवलंबून असतो हा पंच आयुर्वेदानेच जगाला दिलाय.

७. रोगनिदान (डायग्नोसिस) ते प्रतिबंध (प्रेव्हेंशन) :
रोगाची कारणे (हेतू),संप्राप्ती( पॅथॉलॉजि), पूर्वरूपे(अर्ली सिम्प्टम्स),रूपे(रोग झाल्यावर प्रत्यक्ष उशिरा दिसणारे लक्षणं),उपद्रव(व्याधी मुले होणारे इतर कॉम्प्लिकेशन्स) ,चिकित्सा(उपचार),पथ्य(योग्य आहार आणि जीवनशैली),अपुनर्भव(प्रेवेन्शन) अशा व्याधी च्या आणि चिकित्सेच्या अवस्था असे वर्णन सर्व व्याधींच्या प्रकरणात आले होय.आयुर्वेदातील हे सर्व मुद्दे अचूकतेने जशाच्या तश्या आजही आधुनिक चिकित्सा वापरते.केवढे मोठे ये योगदान.
एक आदर्श जीवनप्रणाली आणि चिकत्साप्रणालीचे याहून चांगले काय उदाहरण असेल.

८.ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे आरोग्य आणि व्याधीत कार्यकारण भाव :
नाक,कान,डोळे,जीभ,त्वचा या ज्ञानेंद्रियाचे शरीरातील कार्य योग्य असेल तर आरोग्य उत्तम तसेच हात,पाय,
ज्ञानेंद्रियाने विविध दृक श्राव्य आणि चावी चे ज्ञान होते आणि त्या ज्ञानाचा वापर मेंदू चांगल्या वाईट गोष्टी करण्यासाठी करत असतो.ह्या ज्ञानेन्द्रीचा दुरुपयोग (अति उपयोग तसेच चुकीचा उपयोग)झाला असता मेंदूत साठवले जाणारे अयोग्य ज्ञान हे पुढे जाऊन चुकीच्या वर्तवणुकीत परिणत होते. सतत पाहिलेल्या बीभत्स ,भीतीदायक,क्षोभक गोष्टी ह्या मानसिक स्वास्थ्य बिघडवतात कारण चक्षु ह्या ज्ञानेंद्रियांचा दुपयोग होऊन मेंदूत साठवलेले ज्ञान हे चुकीच्या पद्धतीने वर्तुणीकी परिणत होते. डोळ्याचा अतिवापर(खूप अंधारात,खूप उजेडात, सतत ताण येणे ) झाला असता डोळ्याचे विकार होतात हे तर सर्वज्ञात होय.
तर अशाच सर्व ज्ञानेंद्रियांचा मनुष्याकडून अति किंवा दुपयोग झाला तर त्या त्या ज्ञानेंद्रियाचे आणि शरीराचे व मनाचे इतर व्याधी होतात हा संबंध आयुर्वेदाने अधोरेखित केलाय.
जिभेचे चोचले अति व चुकीचे पोसल्याने होणारे आहारजन्य विकार,अयोग्य दृक श्राव्य माध्यमाचा होणारा लहान मोठ्या माणसावर होणारा मानसिक परिणाम आणि त्यःतून निर्माण होणारे वर्तनदोष आणि मानसरोग हे खणखणीत आणि साधे सोपे उदाहरण ह्या मुद्ययला पुरेसे आहे.ह्याला आयुर्वेदाने खूप मार्मिक नाव दिले ते म्हणजे प्रज्ञापराध. प्रज्ञेने म्हणजे सारासार विवेक बुद्धीने ज्ञानेन्द्री वापरताना केलेला अपराध शारीरिक आणि मानसिक व्याधींना कारणीभूत होतो असा त्याचा अर्थ .

९.स्वस्थ वृत्त (कम्युनिटी हेल्थ ) आणि साथीचे आजार(एपिडेमिक डीसीस) :
पर्यावरणात आणि त्यामुळे होणाऱ्या हवेतील ,पाण्यातील बदलांमुळे तसेच इतर कारणामुळे होणाऱ्या साथीच्या रोगांचा स्पष्ट उल्लेख आयुर्वेदात येतो.जनपदोध्वंस (एकावेळी खूप मोठ्या प्रमाणात मनुष्य जीवाची व्याधीमुळे हानी होणे) हा एक महत्वाचा मुद्दा आयुर्वेदात वर्णन आहे.जो अर्थातच आजही कसोटीस उतरतो. स्वस्थवृत्त म्हणजे समाजाचे एकत्रितरित्या स्वास्थ्य हा समाजस्वास्थ्याचा बहुमोल मुद्दा आणि योगदान आयुर्वेदाने आधुनिक वैद्यकशास्त्राला दिले आहे.
आज समाजस्वास्थ्य किंवा कम्म्युनीटी हेल्थ हा बरेच जणांच्या स्पेशलाईझशन चा विषय असतो ,हजारो रिसर्च पेपर फक्त या विषयावर सापडू शकतील.

१०.रसायन चिकित्सा आणि पंचकर्म :
आजमितीला आरोग्यशास्त्रात जेरियाट्रिक मेडिसिन अँड हेल्थ (वृद्ध व्यक्तीच्या औषधी आणि आहाराचे शास्त्र) यामध्ये खूप संशोधन होतेय आणि वेगवगळे औषधी बाजारात येताय. आयुर्वेदात रसायन ज्याला सोप्या भाषेत आपण टॉनिक म्हणू शकू अशा चिकित्साप्रणालीचा वृद्धत्व आणि आजार या विषयासाठी वापर केला जात असे. रसायन चिकीत्सेसाठी वापरली जाणारी वनौषधी ह्या आधुनिक शास्त्रांच्या निकषांवर आज उत्तम अँटिऑक्सिडंट्स,रेस्टोरटिव्ह मोलेक्युल असल्याचे वैद्यकशास्त्र सांगतेय. रसायन चिकीत्सा हि वृद्धवस्थेती पेशींची झीज,दौर्बल्य आणि जरावस्थेतील व्याधींसाठी प्रतिबंध म्हणून वापरली जात असे.
आयुर्वेदातील रसायन ह्या शाखेचा आज आधुनिक वैद्यकाला खूप उपयोग होऊ शकतो. दुर्दैवाने संशोधन कमी पडतेय.परंतु वैद्य लोक ह्या रसायन शाखेचा उत्तम वापर आजही पेशंट करीत करताना दिसतात.
रसायनाप्रमाणेच पाच अतिशय वेगळ्या आणि अद्वितीय चिकित्सा म्हणजे पंचकर्म हे तर आयुर्वेदाचे सर्वात मोठे योगदान वैद्यकशात्राला आहे.
जीवनशैलीमुळे होणाऱ्या जीर्ण व्याधींवर जसे सोरायसिस सारखे त्वचारोग,प्रमेह,स्थौल्य,इन्फर्टिलिटी,आमवात,कोलायटिस,आणि इतर अनेक विकारावर चिकित्सा म्हणून,प्रतिबंध म्हणून पंचकर्माचा लीलया वापर केला जातो.
११.बीजदोष आणि अनुवांशिक व्याधी :
ज्या काळात सूक्ष्मदर्शक यंत्र,डीएनए आणि जीन्स यांचा मागमूस हि नव्हता त्या काळात आयुर्वेदाने स्त्रीबीज आणि पुरुषबीज दोषांचे वर्णन केले आहे. स्त्री किंवा पुरुष यांच्या बीजात गर्भात विविध अवयव निर्माण करणारे उपभाग असतात. त्या उपभागांपैकी ज्या अवयवांच्या उपभागांमध्ये दोष असतात ते अवयव गर्भामध्ये विकृत निर्माण होतात.एम्ब्रयोलॉजी चा सगळ्यात खबळजनक सिद्धांत हाच तर होता. हे बीजभाग आणि अनुवंशिकता याचे खूप विस्तृत वर्णन संहितांमध्ये आहे. शारीरस्थान हा भाग च मुळी शरीररचना शास्त्र आणि गर्भशास्त्र (एम्ब्रियोलॉजी) चा सार आहे.

वरील ११ उदाहरणे हि प्रातिनिधिक आणि वैद्यशात्राव्यतिरिक्त चा वाचकवर्ग यांचा विचार करून घेतली आहे. खोलात जाऊन किचकट वैद्यकीय सिद्धांत आणि त्याची आजच्या काळात त्यांची परिणामकारकता या निकषावर अजून खूप मुद्दे इथे मांडता येतील. तूर्तास लेख मर्यादा पाळून इतकेच मुद्दे मांडणे रास्त होय.

जागतिकीकरण आणि आयुर्वेदिक सिद्धांताची शाश्वतता:
आज जग बदलले, अफाट अचाट विकसित झाले तरी हजारो वर्षापूर्वीचे आयुर्वेदिक सिद्धांत टिकून आहेत. कारण शरीरक्रियाशास्त्र ,शरीररचना शास्त्र,रोगनिदान शास्त्र आणि चिकित्सा शास्त्र यातील मूळ गाभा तोच आहे. मनुष्याच्या शरीरात मेंदू मेंदूच्याच ठिकाणी तर हाडे हि मनुष्याप्रमाणेच तेवढीच आणि तिथेच आहेत.
भाषा,निदानासाठीचे आधुनिक यंत्र आणि तंत्रज्ञान ,शस्त्रक्रिया यासारख्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले.वैद्यकीय क्षेत्र सर्वांगाने उन्नत झाले. मनुष्य आणि त्याच्या शारीरिक मानसिक आरोग्याचे मूळ तेच आहे.
जागतिकीकरणामुळे आलेल्या आहारक्रांतीत आहाराचे मूळ स्वरूपच बदलेले. परंतु आयुर्वेद संहितांमध्ये अशा आहाराचे आधीच वर्णन केले गेले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास आज प्रगत समजल्या जाणाऱ्या आहार औद्योगिक क्षेत्रात खारवलेले,(सॉल्टी),टिकवलेले (थोडक्यात शिळे),संकरित (देश,प्रकृती निसर्ग विरुद्ध) असे अन्न सर्वात जास्त खाल्ल्या जातेय. अशा आहारापासून होणारे व्याधीचे वर्णन आहार विषयीचे वर्णन करताना आलेले आहे. आज परत आधुनिक आहारशास्त्र तेच सांगतेय कि असे पदार्थ हे आहारजनीत व्याधीचे मूळ आहे. रेट्रीस्पेक्टिव्ह जर्नी दुसरे काय.
तसेच रेड मीट मध्ये असलेल्या Neug5c ह्या विशिष्ट साखरेच्या रेणू मूळे ती साखर पचवला जात नाही ,तसेच रेड मीट च्या अतिसेवनाने कँसर,ओबेसिटी,डायबेटीस,इम्म्युनिटी चे इतर आजार होतात असे सिद्ध झालेय.
आयुर्वेदात नेहमी टाळावे असे पदार्थांचे वर्णन करताना वराह,गाय,म्हैस असे लाल मांस असलेले पदार्थ टाळावे किंवा ते सगळ्यांनाच पचवता येत नाही म्हणून जपून खावे असा स्पष्ट उल्लेख आहे.
हि उदाहरणे परत प्रातिनिधिक होत. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
जागतिकीकरणाने पर्यावरणातील बदल हि व्याधींना कारणीभूत होताय. अशा वेळेस आयुर्वेदातील दिनचर्या,ऋतुचर्या पालन हे खूप आवश्यक ठरते.
आयुर्वेदीय मूळ सिद्धांतांचा उलट जास्त उपयोग जागतिकीकरणानंतर करता येतोय.कारण व्याधींचे स्वरूप वेगळे असले तर शरीरातील मूळ दोष धातू सिद्धांत ह्या नवीन व्याधींचे निदान आणि चिकित्सा करायला उपयोगी ठरतात.
त्यामुळे आधुनिकीकरण आणि सिद्धांत हे दोन वेगवेगळी टोक आहे. आजचे प्रगत हे उद्याचे प्राचीन होणार यात शंका नाही.परंतु शरीर,आहार आणि चित्साशास्त्राचे हे सिद्धांत शाश्वतच राहणार हे निश्चित!

Share this :

3 thoughts on ““Ayurveda: Next big thing investors will chase after!””

  1. As always there is something to learn and improve upon by reading your articles. Thank you Doctor.
    One question came to my mind. Do you think Pitta/Kapha/Vaata based personality check can be used in selecting spouse from overall compatibility point of view?
    Ravi

Leave a Reply to Ravi Tetambe Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart