छोटी मूठ ,मोठी भूक :बाळाचा आहार!

छोटी मूठ ,मोठी भूक :बाळाचा आहार!

राष्ट्रीय पोषण सप्ताह
लेख क्रमांक ५ .
सुरुवातीचे ३ ते ४ महिने आईचे स्तन्य बाळाचे पोषण आणि वाढ यासाठी समर्थ असतात.बाळाचे वजन उत्तम वाढत असेल आईला दूध उत्तम येत असेल तर सहा महिने पूर्ण होईस्तोवर केवळ आईचे दूध देणे अतिशय आदर्श होय.जोवर बाळाला पहिले दात येत नाही तोवर अर्थातच कुठलेही घन खाद्यपदार्थ खाण्यास बाळ असमर्थ आहे असेच समजावे.
परंतु जर आईला नीट दुध येत नसेल, बाळाची भूक न भागल्यामुळे वजन वाढत नसेल तर अर्थातच बाळाला पर्यायी अन्न सुरु करणे आवश्यक असते.५ ते ६ व्या महिन्यात सामान्यतः असे वरचे अन्न सुरु केले जाते. असे अन्न सुरु करताना नवीन मातांच्या मनात आणि कुटुंबीयांमध्ये खूप शंका अडचणी असतात.काय देऊ किती देऊ किती वेळेस देऊ काय नको देऊ इत्यादी. ह्या लेखातून त्या सोप्या भाषेत सोडवण्याचा प्रयत्न करू.

*बाळास वरचे अन्न सुरु करताना आईचे दूध पूर्ण बंद करू नये.आईच्या दुधाबरोबर पूरक म्हणून अन्न सुरु करावे.अर्थातच सुरुवातीस पातळ स्वरूपातील पदार्थानी आरंभ करावा.पातळ पदार्थ गिळण्यास सोपे हवे,खूप घट्ट,चिकट नको. एक वेळेस एकच नवीन पदार्थ सुरु करावा. एकाच वेळेस एकाच दिवशी वेगवगेळे नवीन पदार्थ बाळास पचणार नाही.हळू हळू बाळाचे पोट वेगवगेळ्या चवींना आणि वेगवगेळ्या पदार्थाना सरावत जाईन. कुठला पदार्थ नीट पाचतोय किंवा कुठल्या पदार्थाने त्रास होतो हे देखील कळायला यामुळे मदत होते.तसेच बालक आजारी असताना कुठलाही नवीन पदार्थ सुरु करण्याचे टाळा.बाळ स्वस्थ असतानाच नवीन पदार्थ पहिल्यान्दा देणे इष्ट.
* बाळास द्यायचे पदार्थ ताजे असावे ,शक्यतॊ पाकिटबंद आणि तयार करून साठवून,फ्रिज मध्ये ठेवून वेळेवर गरम करून देणे असे निश्चित टाळावे.सुरुवातीस दिलेले वरचे अन्न एकदम खूप देऊ नये.लहानशी प्रसादाची वाटी हे प्रमाण मानून सुरुवातीला सुरु करावे.हळू हळू बाळाच्या भुकेचा आणि पचनाचा अंदाज येतो.यासाठी मोजमाप निश्चित देता येत नाही. सुरुवातीला दिवसातून २ वेळा सकाळ सायंकाळ आणि नंतर दिवसातून ३ ते ४ वेळा हे प्रमाण सामान्यतः असावे. याबरोबरच स्तन्यपान सुरु असणे आवश्यक होय.
*स्तन्यपानानंतर अगदी लगेच वरचे अन्न खायला देऊ नये.मध्ये काही काळ निश्चित जाऊ द्यावा. स्तन्यपानाची आणि वरच्या अन्नाची वेगवेगळी वेळ नीट ठरवून तशीच पाळावी. रात्री खूप उशिरा वरचे अन्न देऊ नये. बाळाची वाटी चमचा हि प्लास्टिक चे नसावे. बाळाला तिरपे आधार देऊन टेकवून भरवावे आडवे झोपवून नव्हे.
*खायला काय द्यावे? तर धुवून स्वच्छ वाळवून भाजून दळून बारीक केलेल्या तांदूळ/मुगडाळ यांची पातळ पेजेपासून सुरुवात करावी. वरणाचे पाणी, नाचणी ची पेज, नाचणीची खीर,गव्हाची पातळ खीर,शिजवून मऊ केलेला भोपळा,लाल भोपळा, किंचित मीठ,जिरे पूड टाकून द्यावे. फळांचे रस आणि साराचे सुपाचे प्रकार थोडे थोडे द्यावे.दात यायला सुरुवात झाल्यावर पातळ लापशी,मऊ शिरा, मऊ वरण भात , कुस्करून पोळी भाकरी वरण, कुस्करून फळे असे देण्यास सुरुवात करावी. काश्यपसंहिता या आयुर्वेदातील बालकांशी संबंधित ग्रंथात \’प्रीणन मोदक\’ म्हणजे चविष्ट लाडू ह्या एक विशीत पदार्थच उल्लेख आहे. चारोळ्या, साळीच्या भाजलेल्या लाह्या, ज्येष्ठमध, खडीसाखर हे सगळे नीट बारीक करून साजूक तुपात वेलची जायफळ टाकून त्याचे छोटे छोटे लाडू हे बाळांसाठी अतिशय उत्तम होत.
*खरेतर घरी केलेले ताजे, सात्विक, खूप गोड/तिखट/मसालेदार नसलेले सर्वच पदार्थ बारीक मऊ स्वरूपात आठव्या महिन्यानंतर देण्यास हरकत नसते.याचाच अर्थ याच्या विरुद्ध म्हणजे बाहेरचे,तीव्र वासाचे ,चवीचे, पाकिटबंद, फास्ट फूड टाळावे.
दात आल्यावर बाळ अन्न नीट चावायला शिकत असते त्याला ती शिकायची संधी दयावी. बरेचसे पालक बाळ वर्ष दीड वर्षाचे झाल्यावर देखील पोळी भाकरी मिक्सर मधून काढून पातळ करून देणे. नवीन पदार्थ चाखायची संधी न देता एकाच प्रकारचा आहार देत राहणे असे काळजीपोटी करतात. ते करू नये.चावणे उत्तम असेल तरच दातांची नीट वाढ,निगा तसेच पचनही उत्तम होते. मुले स्वावलंबी होतात आणि लवकरच हाताने स्वतः खायला शिकतात.अतिकाळजीने आपण पालकच चुकीच्या आहारसवयी लावू शकतो.
किती जरी हट्ट केला , गोड आवडते , भाज्या नाही आवडत असे असले तरी मुलांना चांगल्या आहारसवयी पालकांनी या वयातच लावायलाच हव्या.
एक दीड वर्षापर्यंत असा आहार बाळाचा पोषक खाऊ होय.
उद्याच्या लेखात मुले,पोषण आणि आहारसवयी यावर आपण बोलू. उद्याचा लेख नक्की वाचा.

लेखिका:डॉ.रुपाली पानसे
आद्यं आयुर्वेद क्लीनिक ,पुणे
९६२३४४८७९८

[email protected]
(कृपया लेख लेखिकेच्या नावासकट आणि लेखात फेरफार न करता शेअर करावा)

Share this :

Leave a Comment

Shopping Cart