skip to content

कॅलरी विरुद्ध पोषण :कॅलरी महत्वाची कि पोषण ?

कॅलरी विरुद्ध पोषण :कॅलरी महत्वाची कि पोषण ?

“पुणे विद्यापीठाच्या आहारशास्त्र विभागात मी आणि तेथील आहारतज्द्न्य मॅम पारंपरिक पदार्थां वर चर्चा करत होतो. बोलता बोलता आयुर्वेदातील पथ्य पदार्थांविषयी मी बोलू लागले. त्यांनी लगेचच आधुनिक निकष लावून तुलना करायला सुरुवात केली. “रुपाली, त्या काळी वर्णन केलेले पदार्थ किती चपखल पणे रोगी व्यक्तीच्या पोषण गरजा पूर्ण करू शकताय. this is fantastic. “.सदैव उत्साहाने ओतप्रोत त्यांच्या डोळ्यात अजूनच चमक दिसली. आणि पुढील प्रॅक्टिकल आपण पथ्य पदार्थांचे घ्यायचे असे ठरले.”

भाताची पेज,आटवल, मुगाचे कुळीथाचे कढण,खजूर मनुका डाळिंबापासून केले जाणारे खर्जुरादि मंथ,सातूचे पीठ, अतिशय पथ्य आणि औषधी मांसाहारी सूप असे एकापेक्षा एक चविष्ट सरस पथ्य पदार्थ बघता बघता मुलांनी तयार केले आणि त्यांचा आजारपणात,व्यवहारात योग्य वापर यावर उत्तम चर्चा रंगली.
निव्वळ प्रोटीन ची गरज भागावी म्हणून अन्ननलिकेत ट्यूब असलेल्या पेशंट ला एक वेळेस ६ -६ अंडी दुधाची पावडर मिक्स करून नळीत पुश करणे या प्रचलीत पद्धतीवर हि चर्चा झाली. त्यावर पर्याय हि सुचवले गेले.

प्रत्येक शास्त्राचा एक पाया असतो ,काही सिद्धांत असतात. त्या सिद्धांतावरच त्या शास्त्रातील बाबी अभ्यासल्या जातात,अवलंबल्या जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच सिध्दांताच्या आधारे संशोधनही होत असते.कुठलेच शास्त्र परिपूर्ण नसते काळानुसार त्यात बदल होतात,सिद्धांताची भर पडत जाते ,क्वचित काही सिद्धांत बदलले जातात.

आधुनिक आहारशास्त्रामध्ये आहाराचे कर्बोदके(कार्बोहैड्रेट),प्रथिने(प्रोटीन) आणि तैलद्रव्ये (फॅट) असे मुख्य गट केले आहे.पदार्थातील वेगवेगळी जीवनसत्वे (व्हिटॅमिन),खनिजे(मिनरल) असे सूक्ष्म घटक अभ्यासले जातात.
शरीराच्या पोषणासाठी आणि वाढीसाठी वरील सर्व घटक आवश्यक असतात. योग्य त्या मात्रेत ते शरीरात जाणे आवश्यकच असते. कमी मिळाले तर कुपोषण आणि जास्त मिळाले तरी शरीराचे कुपोषणच होते. फरक फक्त असा कि पहिल्या बाबतीत शरीराचे कमी पोषण तर दुसऱ्या बाबतीत शरीराचे फाजील आणि नको ते पोषण होते. पण होते मात्र ‘कू’ अर्थात वाईट असे पोषण म्हणजे कुपोषणचं!
आयुर्वेदामध्ये पदार्थांच्या अंगभूत गुणांना असेच महत्व दिले गेलेय. एखादा पदार्थ चवीने काम करेल कि त्याच्या उष्ण अथवा शीत गुणाने कि जड हलके पणाने कि अजून कुठल्या गुणांनी तो शरीराचे पोषण करेल ? योग्य प्रमाणात जसे प्रोटीन व्हिटॅमिन हवे अगदी तसेच सगळे रस म्हणजे चवी जसे गोड, तुरट,खारट ,कडू इत्यादी अन्नातून शरीराला मिळणे आवश्यक होय. फार गोड च गोड किंवा फारच तिखट, खारट किंवा अजिबातच तुरट अथवा कडू रस अन्नातून शरीराला न मिळणे स्वास्थ्यासाठी हानिकारक होय.अगदी असेच अन्नपदार्थानी आवश्यक कफ पित्त आणि वात दोष नीट राहणे अपेक्षित असते. जास्त वातूळ किंवा पित्तकर खाल्ले तर पोषण बिघडते. अगदी बिना तेलातुपाचे अन्न रुक्षता निर्माण करते तर अति तेलकट तळलेले अन्न पचनशक्तीची आणि चयापचयाची वाट लावते.पचायला जड कमी प्रमाणात खाणे तर पचायला हलके पदार्थ कायम खाण्यात असणे असे काही सर्व सामान्य नियम तर सर्वानाच ठाऊक आहेत.या बाबत मागे एक सविस्तर लेख देखील लिहिलाय.
थोडक्यात काय तर आधुनिक आणि आयुर्वेद आहार शास्त्राचा स्वतःचा एक वेगवेगळा पाया आहे ,सिद्धांत आहे.

” रुपाली आम्हाला हिशेब लागतो. पेशंट चे वजन उंची आणि इतर बाबींचा अभ्यास करून किती ग्राम प्रोटीन किती कार्ब्स आणि फॅट किती, ह्याचा ताळमेळ बसवला कि आमचे काम संपते. परंतु प्रकृती ,पचनशक्ती(अग्नी) ,व्यक्तिपरत्वे बदलणारे पदार्थांचे गुणधर्म, विरुद्धान्न अशा आयुर्वेदातील संकल्पना ऐकुन वाटते कि अरे हा विचार किती महत्वाचा आहे. मोजून मापून दिलेले प्रोटीन फॅट हे शेवटी अन्न आहे ते नीट पचले ,शोषले नाही गेले तर कसलाच उपयोग नाही.आम्ही पनीर हे प्रोटीन म्हणून मारा करतो पण पनीर सूट न होणाऱ्या ला पर्याय आणि कॅलरी च्या हि पलीकडे जाऊन पोषणाचा विचार जो आयुर्वेदात केलाय तो भन्नाट आहे.” आहारशास्त्रातील वर्गातच केस डिस्कशन सेशन ला दुसऱ्या एका आहारतज्ज्ञांची हि उस्फुर्त प्रतिक्रिया होती.
सरसकट रिकाम्या जागा भरणे किंवा ठरवून दिलेल्या सॉफ्टवेर मध्ये आपोआप गोष्टी जागच्या जागी भरल्या जाणे इतके सोपे अन्न ,आहार आणि पोषण नाही.
आहाराचा विचार करताना म्हणूनच त्या पदार्थांच्या अंगीभूत गुणांचा जसे वातकर ,कफकर,मधुर ,कडू इत्यादी,उष्ण थंड , रक्त रस धातू अथवा अस्थी पोषक किंवा शरीरात फाजील चिकटपणा निर्माण करणारे, शरीरात दाह निर्माण करणे अशा कित्येक गुणधर्मांचा अभ्यास करावा लागतो.खाणाऱ्या व्यक्तीच्या वय,प्रकृती सात्म्य असात्म्य,राहण्याचे ठिकाण ,ऋतू ,दिनचर्या या बाबींकडे दुर्लक्ष करून देखील चालत नाही. तसेच तो पदार्थ कसा बनवला गेलाय ती पद्धत ज्याला अन्नसंस्कार म्हणतात तीदेखील आहाराचे गुणधर्म सकारात्मक रित्या अथवा नकारात्मक रित्या बदलू शकते.
आयुर्वेदिक आहार सल्ला देताना वैद्य या आणि याखेरीज अजून कित्येक बाबींचा सखोल विचार करतात. एका ब्लॉग मध्ये या संबंधी उहापोह निव्वळ अशक्य.
थोडक्यात साचेबद्ध कॅल्क्युलेटीव्ह पद्धतीने आहाराचा विचार न करता एक संपूर्ण आणि संयुक्त विचार आयुर्वेदात केला जातो.
आधुनिक आहारशास्त्रातील उपलब्ध माहिती आणि संशोधनाचा उपयोग आयुर्वेदातील परिपूर्ण आणि बावनकशी सिद्धांताबरोबर करून एक आदर्श आचरणात आणायला सोपी आणि आजमितीच्या जगात अप्लिकेबल अशी आहारशैली या विषयावर लिहवे तेवढे थोडकेच! प्रॅक्टिस मध्ये कायम हाच प्रयत्न असतो.अशी आहारशैली पेशंट ला आवडते ते पाळतातही.पारंपरिक पदार्थ उत्तम परिणाम देतातच.
कॅलरी च्या पल्याड जाऊन शरीरातील सर्व पेशींचे धातूंचे सुजाण पोषण होणे महत्वाचे. प्रोटीन ची हिशेबी गरज भागवताना उदरस्थ अग्नीवर अन्याय होऊन अजीर्णाचे ‘आम’ बंड करणार नाही याची काळजी घेणे आवश्यक. लेस फॅट करता करता सांध्यांचे खुळखुळे होणार हे नक्की.नवनवीन डाएट आणि त्यांचे शरीरावर प्रयोग शरीराची प्रयोगशाळाच करणार यात शंका नाही.

आजच्या या ब्लॉग चा उद्देश आयुर्वेद आहारशास्त्र कोण कोणत्या निकषांवर काम करते ह्याची अगदी पुसटशी ओळख वाचकांना करून देण्याचा होय. आयुर्वेद आहारशास्त्र विषयी आपण नियमित जाणून घेत राहूच.

Share this :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart