दिवाळीचे दिवस आहे पाहुणे ,भेटीगाठी आणि गोड़ पदार्थ हि देखील आगळीवेगळी पर्वणीच! याच धर्तीवर
एका पेशंटच्या सहज विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आज ब्लॉग म्हणून पोस्ट करतेय.
“डॉक्टर ,बाहेरील गोड व्यंजने विशेषतः खव्याची व्यंजने टाळावी असे तुम्ही कायम सुचवता. काही सहज सोप्या पारंपरिक गोड व्यंजनांची यादी देऊ शकाल का? थोडे आधी प्लॅन करून वेळ असेल तेंव्हा करता येतील असे काही पारंपरिक वेगळ्या पदार्थांची यादी द्याल का ? दिवाळीत मेजवान्या होतच असतात नक्की करून बघीन”
उत्तर: बाहेरील भेसळीचा खवा,कृत्रिम रंग,रसायने चव आणि सुगंध यामुळे शक्यतो बाहेरची व्यंजने टाळावीत. अगदी खात्रीशीर ठिकाणाहून च आणणे चांगले.इतर वेळी शक्यतो खालील वेगळी आणि साधी व्यंजने घरी करणे उत्तम.त्यातल्या त्यात सोपी,माहित असलेली परंतु कमी केल्या जाणारी पारंपरिक व्यंजने आवर्जून देतेय. ह्या व्यंजनामध्ये पौष्टिकता अर्थातच जमेची बाजू आहेच.
मिठाई गुलाबजाम आणि इतर व्यंजनांपेक्षा काहीतरी वेगळे .
१.कुस्करून एकजीव केलेल्या काळ्या खजुराची सुका मेवा घातलेली वडी (घरी उत्तम बनवता येते)
२.मनुका सुकामेवा खजूर अंजीर ओले नारळ टाकून लोहयुक्त आणि चविष्ट पाकातील भात(नारळी भात)
३.पंचखाद्य (खोबरे,सुकामेवा,खारीक,मनुका वेलची जायफळ केशर ) घालून सुवासिक तांदूळ भिजवून,बारीक वाटून दुधात शिजवलेली तांदुळाची खीर किंवा फिरनी.
४.रवाळ दळलेल्या गव्हाच्या कणकेचा साजूक तुपातील गूळ घालून शिरा.
५.परतताना भरपूर साय टाकून ओल्या खोबऱ्याची वडी( यात रंगाकरता बिटरसाचे ४ थेम्ब , गुलाबपाकळ्या,केशर,गवती चहाच्या पानाचा २ थेम्ब रस असे वैविध्य ठेवू शकतो)
६.रवा गुळाच्या खमंग साठोऱ्या किंवा सांजोऱ्या तुपाबरोबर.
७.ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याची करंजी
८.गव्हाच्या दलियाची गूळ,जायफळ वेलची बडीशेप घालून खमंग खीर किंवा लापशी.वरून फेटलेले क्रिम आणि सुका मेवा घालून मातीच्या भांड्यात सेट करून सर्व्ह केली तर अपिलिंग होणारच
९.मुगाचे पीठ खमंग भाजून ठेवावे. हवे तेंव्हा पटकन भरपूर तुपात थोडे भाजून गरम पाणी ओतून शिजवून साखर टाकली कि चविष्ट मूग हलवा तयार.
१०.ओल्या नारळाची खीर घट्ट साय अथवा दूध घालून थंड वाढावी उत्तम पित्तनाशक आणि चविष्ट डेझर्ट देखील होय.
११.कणिक,तांदूळ पीठ दुधात भिजवून त्यापासून पाकातील मालपुवा (हा सुद्धा पटकन होऊ शकतो बरका)
१२.लाल भोपळा आणि गुळाच्या गोड पुऱ्या अथवा घारगे.
१३.उकडीचे गुळाच्या सारणाचे मोदक(वेळ असेल तेंव्हा कराच.हे डेसर्ट नक्कीच भाव खाऊन जाते)
१४.गुळाच्या पाण्यात भिजवून केलेले कणकेचे उकडलेले दिवे छान फेटलेले क्रीम अथवा सुक्या मेव्याचे सारण भरून सर्व्ह केले तर निश्चित वेगळे पण असणारे व्यंजन ठरेल.
१५.पंचखाद्य(खोबरे,सुकामेवा,खारीक,मनुका वेलची जायफळ केशर )घट्ट दुधातील शेवयाची खीर
१६.गुळाच्या पुरणाचे काठोकाठ भरलेले कणकेचे दिंड तव्यावर तुपावर भाजून अतिशय उत्तम लागतात आणि वेगळे व्यंजन हवे ते आकर्षक नाव देऊन वाढा
हमखास आवडतील.
१७.मिश्र डाळीचे पीठ तुपावर भाजून त्यापासून गोड़ पाकातल्या अथवा साध्या वड्या खोबरं किसात घोळवून सर्व्ह करा
१८. पांढरा शुभ्र पाकातील मजबूत वेलची जायफळ घातलेला नारळी रवा लाडू तर मला विशेष प्रिय .
मला वाटते भरपूर पर्याय झालेत. अर्थातच थोडे आधी प्लॅन केले तर ह्या पदार्थाना तशी खूप पूर्वतयारी लागत नसल्याने ते निश्चित करायला जमतील. वाचक आणि पेशंट स्वतःहून आहारशैलीत सकारात्मक बदल करावयास उत्सुक दिसले कि अर्थातच लिखाणाचे सार्थक झाल्याचा आनंद मिळतोच.
वरील सर्व व्यंजने हि बाहेरील विकतच्या मिठाईला पर्याय म्हणून होत, जी बरेचदा भेसळी मुळे अपायकारक ठरत असते. अर्थातच यातील पदार्थ तब्येतीचा अंदाज घेऊन कमी वेळा आणि व्यंजनांच्या मात्रेत च खाणे कधीही हितावह.
(स्वतःच्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन यंदा दिवाळीत मोजकेच आणि स्वाथ्याला उपकारक तेवढेच आणि तेच खा. या संबंधी अधिक माहिती आपण माझ्या उदरस्थ या आहारविषयक पुस्तकात वाचू शकाल.)
वेगवेगळ्या पदार्थाची घरगुती साहीत्यातुन बनवलेली रेसिपी खुपच छान आहे
thank you