skip to content

नकोसा गुटगुटीतपणा: चाईल्ड ओबेसिटी

राष्ट्रीय पोषण सप्ताह
लेख क्रमांक ६
दिनांक ६/९/१८
पोषणसप्ताहातील लेखांमध्ये एक लेख तरी बालकांमधील स्थूलता म्हणजे चाईल्ड ओबेसिटी वर लिहा असे खूप मेसेज आलेत म्हणून आजचा हा लेख बालकातील फाजील पोषण आणि स्थौल्य यावर लिहतेय.

मागील लेखात आपण बाळ सहा महिन्याचे झाल्यावर साधारण २ वर्षाचे होईस्तोवर आहार कसा असावा हे पाहिलें.बाळ आता मोठे होऊ लागलेले असते.बाळाचा मानसिक आणि शारीरिक आकलनाचा आवाका वाढत असतो. अशातच आवडीनिवडी आणि चवी विकसित होत असतात. बाळ हे उत्तम ब्लॅकमेलर असते हे पालकांना सांगायला नको. त्यामुळे हव्या त्या पदार्थांसाठी हट्ट करणे, उपाशी राहिले कि आई चा इवलासा चेहरा मग आरामात फसतो आणि पोटात काहीतरी तर हवे ना म्हणून बाळाचा हट्ट पुरवला जातो. हि पहिली सुरुवात असते आहाराच्या चुकीच्या दिशेने निघालेल्या सवयीची.
भारतामध्ये जून २०१७ च्या सर्वेक्षणात १४० लाख म्हणजे १.४ करोड लहान मुले स्थूल असल्याचे आढळले.२०२५ पर्यंत हा आकडा १.८ करोड हा एकदा गाठणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. गेल्या दहा वर्षात ह्या आकड्यात झपाट्याने वाढ झाल्याचेही नमूद होय.यावरून या विषयाची गंभीरता लक्षात आली असेलच.तसेच १८४ देशांच्या यादीत चीन आणि भारत हातात हात घालून स्थूल मुलांचा देश या यादीत अमेरिकेनंतर चे द्वितीय स्थान पटकवतील अशीही भीती आहे.
बालकांतील स्थौल्य का वाढले असावे.याचे काही कारण बघू
@@ स्थूल पालकांचे स्थूल मुले: पालकांचीच जीवनशैली आणि आहारशैली बदलामुळे (बिघडल्यामुळे) आनुवंशिक स्थौल्य असणाऱ्या मुलांची संख्या झपाट्याने वाढत जातेय.अशा मुलांमध्ये दुर्दैवाने स्थूलता कमी करणे खूप अवघड जाते.कारण चयापचयाचा मूळ साचाच शरीरात बिघडला असतो. अशा स्थूल मुलांमध्ये इतर मेटाबोलिक व्याधी हि होण्याचे प्रमाण वाढते.

चुकीच्या जीवनशैली आणि आहारशैलीमुळे येणारे लहान मुलांमधील स्थौल्य: या प्रकारामध्ये लहानपणापासून मुलांमध्ये अतिगोड, अतिपौष्टिक,अति साखर असलेले,तळलेले पदार्थ सतत आणि जास्त प्रमाणात येत राहिले तर स्थूलता येण्याचे प्रमाण वाढते.अशा आहारशैली बरोबर जर शारीरिक व्यायाम, खेळ आणि हालचाल यांची कमतरता असेल तर स्थूलतेचे प्रमाण आणि शक्यता दुपटीने वाढते. एकदा स्थूलता आली कि त्या बरोबर आळस,अजून च शारीरिक निष्क्रियता, खाण्याचे प्रमाण वाढणे, नैराश्य आणि त्या नैराश्यात पण खाण्यातच सुख शोधणे असे एक ना दोन वीषचक्रात चिमुकले मुले अडकतात.
आहारसवयी बिघडण्यात खूप वेगवगेळ्या बाबी समाविष्ट आहे.
वेगवगेळ्या फॅन्सी पदार्थांची सहजासहजी असलेली उपलब्धता
बाहेरून विकत आणून खाण्याचे वाढलेले प्रमाण.
चुकीच्या पदार्थांबद्दल पालकांना माहितीच नसणे किंवा माहित असून निव्वळ सोयी पोटी, किंवा हलगर्जीपणामुळे असे पदार्थ मुलांना सतत पुरवत राहणे.
मुलांना बिझी ठेवण्याकरता वेगवेगळे मंचिन्ग चे पदार्थ आणि सोबत तासन्तास tv किंवा मोबाईल किंवा व्हिडीओ गेम उपलब्ध करून देणे.
शारीरिक व्यायाम, मैदानी खेळ, पोहणे धावणे चालणे ह्या क्रियांकरिता मुलांना पालकांकडूनच प्रोत्साहन वेळीच न दिले जाणे. नंतर लक्षात आल्यावर उशीर झालेला असतो.
मुलांकरिता अतिशय कमी वेळ दिला जाणे, खाण्याच्या सवयी नियमित नसणे,अतिकाळजी पोटी मुलांना कोंबून कोंबून भरवले जाते,मानसिक रित्या मुले जर प्रसन्न नसतील कुटुंबातील अडचणी देखील नैराश्य आणि नंतर स्थूलता असे परिवर्तित होऊ शकतात.
फळफळावळ,अंडी,दूध दुभत्याच्या पदार्थांच्या किमती वाढल्या तर अनारोग्यकारक पदार्थ अगदी सहज ५ ते १० रुपयात मिळायला लागले. हे आज दुर्दैवच म्हणावे लागेल.जाहिराती,आजूबाजूच्यांचे अनुकरण आणि भ्रामक कल्पनांनी याला खतपाणीच घातले आहे.
सोडा,कोल्डड्रिंक, केक,पेस्ट्री, बिस्किट्स,पाकीट बंद चिप्स,सूप्स, नूडल्स ,गोड ज्यूस ,चॉकलेट्स,प्रोसेस्ड मीट आईस्क्रिम,बर्गर पिझ्झा,वडा ,सामोसा असे जंक किंवा फास्ट फूड जर नियमित किंवा वरचेवर दिले जात असतील तर स्थौल्य आणि इतर अनेक गंभीर आजार आपल्या मुलासाठी पुढच्याच वळणावर टपून बसले आहेत ह्याची पालकांनी नम्र नोंद घ्यावी.
हे सगळे फाजील पोषण होय.आपण मुलाचे लाड पुरवत नसून त्यांना अनारोग्याच्या खाईत ढकलत आहोत हे सुद्न्य पालकांना सांगायला लागतेय. अर्थातच तसे करण्याचा त्यांना अधिकार नाही.असे मुले मग दातांच्या दवाखान्यात , अस्थिरोगतज्ज्ञांच्या, घशाच्या तक्रारींसाठी, allergy साठी, डायबिटीस हृदयरोग अशा गंभीर आजारांकरिता डॉक्टरांच्या कडे दिसली तर त्यात आश्यर्य वाटायला नको.

घरचे वरण भात भाजी कोशिंबीर फळे आणि इतर सर्व साधे घरगुती पदार्थ हे रोज खाण्यात असलेच पाहिजे. दररोज १ ते २ तास मैदानी खेळ खेळले गेलेच पाहिजे.कशाला पोटाचा घेर वाढेल आणि कशाला पळताही हि न येणारी बिचारी स्थूल मुले दिसतील?.
या विषयावर एक स्वतंत्र लेखमाला देखील होऊ शकेल इतका या विषयाचा आवाका आहे. या लेखात विषयाचे गाम्भीर्य ध्यानात आले तरी लेखाचा उद्देश सफल होय.
उद्या पोषण सप्ताह लेखमालेतील शेवटचा लेख नक्की वाचा. एरवी ब्लॉग्स मधून आपण भेटत असतोच आणि पुढेही भेटत राहू .
लेखिका; डॉ.रुपाली पानसे
आद्यं आयुर्वेद क्लिनिक,पुणे
९६२३४४८७९८

Share this :

1 thought on “नकोसा गुटगुटीतपणा: चाईल्ड ओबेसिटी”

  1. Pingback: नकोसा गुटगुटीतपणा : चाइल्ड ओबेसिटी – SwamiAyurved

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart