skip to content

Diet etiquette

“आहाराची बाराखडी”

“आहारात् सर्वभूतानि संभवन्ति महीपते/ आहारेन् विवर्धन्ते तेन जीवन्ति जन्तवः//” (महाभारत)
आहार हा प्रत्यक्ष प्राणाचे धारण करणारा घटक आहे.आहारापासूनच मनुष्याची आणि इतर जीवांची उत्पत्ती होते,आहारामुळेच त्या जीवांची वाढ आणि पोषण होते तर आहारामुळेच(चुकीच्या) त्यांचा नाश होतो.

वेद,काव्य आणि पुराण लिखाणातून आहाराबाबाबत खूप मार्मिक दाखले वाचायला मिळतात.
आहाराबाबत काही साधे सोपे नियम मार्गदर्शन आहेत का? वैद्य लोक खोलात आहाराबद्दल ,पथ्याबद्दल सांगत असतातच. परंतु आहाराची बाराखडी काय असे एक पेशंट ने सहज विचारले. सर्वानाच त्यातून काहीतरी फायदा मिळेल म्हणून हि पोस्ट !

  1. सर्वदा मिताहारी असावे.मिताहार पाचक अग्नी प्रदीप्त करतो. (मिताहार याचा अर्थ पोटाला पुरेसा हलका आहार होय)
  2. आहार हा सहा रसांनी (गोड़,तिखट,कडू,खारट,आंबट,तुरट)युक्त असावा . फक्त गोड़ , फक्त तिखट असे एक रस प्रधान अन्न खाल्याने शरीराचे पोषण होत नाही.आहारात वैविध्य असावे ते याचकरता.
  3. अन्न जड असेल (उदा.मिष्टान्न,मांसाहार,इत्यादी)तर पोट अर्धे भरेस्तोवरच खावे.पचायला हलके अन्न देखील पोटात किंचित जागा ठेवून पोट भरेल एवढेच खावे .
  4. सहजपणे पचवता येईल इतका आहार म्हणजे आहाराची योग्य मात्रा आहे.पोटाचे चार भाग करून चवथा भाग रिकामा राहील एवढे अन्नसेवन हे आहारसेवनाचे योग्य प्रमाण होय.
  5. शरीराला हवे त्यापेक्षा कमी(उदा. अति उपास करणे, डाएट करणे इत्यादी)आहार घेतल्यास शरीराला बळ,तेज पुष्टी मिळत नाही तसेच वात दोष निर्माण होऊन वातव्याधी होऊ शकतात
  6. अति आहार सेवन केल्यास तर लगेच तिन्ही दोषांचा विशेषतः कफ दोषाचा प्रकोप होऊन अजीर्ण आणि पचनाचे विविध व्याधी उत्पन्न होतात.
  7. केवळ अति अन्न झाल्यानेच अजीर्ण इत्यादी आजार होतात असे नव्हे. न आवडणारे अन्न बळजबरी खाल्याने,करपलेले,वातूळ,खूप कोरडे,खूप थंड,शिळे, नासलेले अन्न देखील विविध विकार उत्पन्न करते.
    पूर्वी खाल्लेले अन्न पूर्ण पंचायच्या आत परत आहार घेऊ नये.
  8. पचायला जड ,गोड़ तसेच घट्ट किंवा कोरडे पदार्थ जेवण्याच्या सुरुवातीला खावे आणि त्यानंतर पचायला हलके, आंबट,मीठ घातलेले तसेच पातळ पदार्थ खावे. असा विशेष उल्लेख पचनाच्या दृष्टीने आयुर्वेदात आढळतो. प्रत्यक्षात मात्र आपण गोड़ पदार्थ भरपूर प्रमाणात आहाराच्या शेवटी खातो. त्यामुळे अन्न नीट न पचणे आणि तत्सम त्रास होतात.
  9. भोजनानंतर घटाघट पाणी पिऊ नये. भोजनामध्ये थोडे घोट घोट प्यावे .पोटात अंदाजाने २ भाग अन्नासाठी एक भाग पाण्यासाठी आणि एक भाग रिकामा ठेवणे अपेक्षित असते. पचनाच्या क्रियेत निर्माण होणाऱ्या वातासाठी हि जागा ठेवली नाही तर अन्न पचताना आमाशयावर या वातामुळे ताण येतो.यामुळे उचकी लागणे किंवा छातीत,पोटात दुखणे असे त्रास होतात
  10. भोजनानंतर लगेच शारीरिक कष्ट जसे जोरात चालणे ,पळणे ,तसेच झोपणे ,खूप बोलणे, उष्णेतच्या जवळ जाणे अथवा उन्हात जाणे,स्नान करणे या गोष्टी वर्ज्य आहेत.निदान ४५ मिनिटे ते १ तास या गोष्टी अवश्य टाळाव्या याने पचन क्रियेत बाधा येत नाही. या कालावधीत शरीरातील अग्नी किंवा सोप्या भाषेत रक्तपुरवठा हा पचनसंस्थेकडे असणे आवश्यक असतो.परंतु शारीरिक कष्टाच्या क्रिया केल्यास तोच अर्थातच हात पाय आणि हृदयाकडे वाढतो. त्यामुळे हृदयावर तर ताण येतोच शिवाय पचन क्रियेत हि बाधा येते. असे वारंवार झाले तर अनेक पचनाच्या व इतरही व्याधी जडतात.
    जेवणानंतर लगेच झोपल्याने कफदोष वाढतो आणि हृदयाचा रक्ताभिसरण वेग कमी झाल्यामुळे ,अन्न पचन क्रिया मंदावते.
  11. जेवताना चिंता,शोक,क्रोध,भीती,किळस आदी भाव मनात नसावे असा विशेष उल्लेख आयुर्वेदात आहे. मानसिक भावभावनांचा पचनावर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो हे आता सर्वज्ञात आहे. अगदी हेच या विधानातून अभिप्रेत आहे.
  12. विरुद्धान्न ,असात्म्य (सवय नसलेले),प्रकृतीच्या विरुद्ध ,ऋतूला अनुकूल नसलेले अन्नसेवन टाळावे.

(यातील प्रत्येक बाबीवर एक लेख होईल. लिहिण्याचा निश्चित प्रयत्न असेल.)

Share this :

3 thoughts on “Diet etiquette”

  1. how should diabetics adapt these directions to their needs? are they fully applicable to them? some experts say even they should not exclude sweet fully

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart