skip to content

Dystonia needs to be talked !

मनाला चटका लावणारा ‘झटका ‘ !!

हा प्रसंग मध्ये मध्ये आठवला कि त्रास होतो. स्वतःचा राग येतो. घरी काहीतरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असावा आणि माझ्या च एका नवीनच मैत्री झालेल्या मैत्रिणीला मी तिच्या आई ला घेऊन ये असं खूप वेळा आग्रह केला होता.सगळ्या जमल्या कि आम्ही मुली मुली गप्पा टप्पा मज्जा करायला मोकळ्या असायचो. ती नको नको म्हणत होती.पण ती आली ,आवर्जून आईलाही घेऊन आली. आम्ही सगळ्या खुश झालो ती आली म्हणून परंतु ३ च मिनिटाच्या आत असे काहीतरी घडले कि आधी आम्ही चमकलो,दचकलो आणि नंतर लपून लपून फिदी फिदी हसलो.
तिच्या आईला दर ३ -४ मिनिटांनी एक मोठ्या आवाजात उचकी यायची आणि त्यावेळेस तिच्या आईच्या खांद्याचा आणि मानेचा भाग जोरात झटका दिल्यासारखा हलायचा. तो आवाज आणि ते प्रचंड झटका देऊन शरीर हलणे हे अनपेक्षित होते, बालपणी न झेपण्याजोगे होते.

आईने तो प्रसंग नीट निभावून नेला होता. अगदी आपुलकीने कुठलेही वेगळेपण त्यांना जाणवू न देता. परंतु त्यांच्या तश्या सवयीचा नंतर आम्ही मैत्रिणींनी थोडा issue केला होता. आईने रात्री थोडे दटावून आणि समजावून सांगितले होते कि तो एक आजार आहे.
त्यावेळेस त्या आजाराची भीती वाटली होती ,आपण हसलो याची लाजही वाटली,काकूंबद्दल खूप वाईट वाटले होते आणि मत्रिणीबद्दल नंतर विशेष प्रेम कायम वाटले.

वैद्यकीय शिक्षणात कालांतराने ह्या व्याधीबद्दल शिकलो काही पेशंट हि बघितले.आज खास हा विषय लिहायला घेण्याचे कारण माझे एक वाचक आहेत.ते ह्या आजाराने पीडित आहेत.हा आजार अगदी जीवघेणा नसला तरी दररोज पेशंटची सत्वपरीक्षा घेणारा असतो. स्वतःला होणार त्रास आणि त्याहीपेक्षा समाजात मिळणारी विचित्र वागणूक आणि फारशा परिचित नसणाऱ्या ह्या आजाराबद्दल द्यावे लागणारे स्पष्टीकरण ह्यानेच पेशंटची मानसिक दमणूक होते.
ह्या आजाराबद्दल समाजात जागरूकता व्हावी यासाठी तुम्ही लिहा असा आग्रह माझे हे वाचक खूप महिन्यांपासून करत आहे. सर्वप्रथम मी ह्या विषयावर लिहायला खूप वेळ घेतला ह्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. रोग व्याधी,लक्षणे आणि उपाय इतका सोपा असा हा व्याधी नव्हे.
ह्याबद्दल लिहिताना खूप संवेदनशीलता आवश्यक आहे. मी ती पूर्णपणे लिखाणातून दयायचा प्रयत्न करिन.
अशा या दुर्मिळ आणि विचित्र आजाराचे नाव आहे डिस्टोनिया( कंप किंवा आक्षेप).
शरीरातील काही पेशी अथवा काही पेशी समूह यांची इच्छेविरुद्ध होणारी,न थांबवता येणारी तीव्र झटका बसल्यासारखी होणारी हालचाल म्हणजे डिस्टोनिया होय.

ह्या व्याधीची लक्षणे बघुयात :
शरीरातील एखादा अवयव अचानक आकुंचन पावतो आणि त्या अवयवाला झटका बसतो.
उदा. एक पाय मागे ओढल्या जाऊन लंगडल्या जाणे,खांदा हात जोरात हलणे ,पाय, पोटरी त गोळा येणे , डोळा मिचकावले जाणे, मान एका बाजूस वळणे आणि झटका दिल्यासारखी हलणे.
कधी कधी काही लोकांमध्ये एक किंवा अनेक अवयव एका वेळेस असे आकुंचन पावतात.
थोड्या थोड्या वेळाने असे आकुंचन पावण्याची क्रिया होत असते.
ह्या हालचालींवर त्या मनुष्याचे यत्किंचितही नियंत्रण नसते.
अशा तीव्र आणि सतत होणाऱ्या झटक्याने /आकुंचनाने शरीराचा तो भाग आणि त्या भागातील पेशी खूप थकतात.त्या भागात सतत वेदनाही जाणवू शकते.
शरीराबरोबरच अशा क्रियेने मनाची हि दमणूक तेवढीच होते.
अशा पेशंटची मानसिक स्थिती आणि मानसिक हानी देखील समजावून घेणे तेवढेच आवश्यक ठरते.

डिस्टोनिया हा व्याधी कशामुळे होतो?
मेंदूतील basal ganglia ह्या भागातील बिघाडामुळे मुख्यातः पेशींवरील नियंत्रण ह्या कार्यभागाच्या मार्गात गडबड होते. ह्याला कारण अपघाताने झालेली इजा, मेंदूतील गाठीचे ganglia वर दाब,स्ट्रोक,विषबाधेमुळे मेंदूच्या पेशींची होणे, काही कारणास्तव काही वेळ मेंदूचा प्राणवायू पुरवठा खंडित होणे आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींची झालेली हानी असे असू शकतात. काही मेंदूच्या पेशींचे इन्फेकशन तसेच मानसिक विकारांवर वापरले जाणारे औषधी (antipsychotic drugs ) देखील डिस्टोनिया वाढीस कारणीभूत ठरतात.
आनुवंशिकता हे देखील हे व्याधीचे कारण होय.
बरेचदा वरीलपैकी काहीही कारण न सापडता अचानक असे लक्षणे पेशंट मध्ये दिसतात.
आयुर्वेदात असे पेशंट हाताळताना मांस धातू,प्रकृती, वात दोष आणि वात दोषाशी शरीरातील आणि बाह्य सर्व संबंधित कारणे आम्ही वैद्य गृहीत धरतो.
ह्या व्याधींवरील उपाय :
दुर्दैवाने हा व्याधी अगदी पूर्णपणे बारा झाल्याची उदाहरणे नगण्यच होत.
परंतु ह्या व्याधी सोबत जगणे सुसह्य व्हावे याकरिता वैद्यकशास्त्र हमखास मदत करते.
आयुर्वेदात वातनाशक आहार,विहार,पंचकर्म औषधी इत्यादींची योजना केली जाते.
योगसाधना आणि physiotherapy चा यथायोग्य अवलंब सुचवलं जातो.

हा व्याधी आणि समाजाचे आवश्यक भान:
ह्या व्याधींबाबत दुर्दैवाने समाजभान अजिबात बघावयास मिळत नाही.शंभरात एखादी अशी व्यक्ती बघायला मिळते. रोजच्या साध्या सध्या जगण्याच्या प्रवाहात हि लोक किती झगडत असतील याचा एकदा आपण सर्वसामान्य माणसांनी विचार जरूर करायला हवा. काही विचित्र दिसले कि कधी फोटो,काढ विडिओ आणि कर अपलोड अशा असंवेदशील समाजाकडून या लोकांना समजावून घेण्याची माफक अपेक्षा असते.

थोडी केलेली मदत आणि सामान्य म्हणून अशा लोकांना स्वीकारणे एवढी अल्प सुबुद्धी आपण दाखवणे गरजेचे आहेत. बाकी हि लोक त्यांचा हा व्याधी पेलण्यास आणि उत्तम आयुष्य जगण्यास समर्थ असतात. खिजवणे,हसणे, वाळीत टाकणे अथवा मुद्दाम दाखवलेली  दया हे समाज आणि पर्यायाने आपण रोगी असल्याचे लक्षण आहे.

ह्या व्याधीत आहार विहार कसा असावा असा मुख्य प्रश्न त्या वाचकाने विचारला होता. त्यावर सविस्तर लेखाच्या पुढील भागात अवश्य बघू.

Share this :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart