अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा)

अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा)
मागील आठवड्यात ‘उदकगाथा’ ह्या माझ्या जुन्या ब्लॉग वर एक डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली. त्यात सद्या करोना भयापोटी लोक कसे गरम पाण्याच्या गुळण्यावर गुळण्या करताय, गरम पाण्याची घशाला वाफ, मसाल्यांचा काढा ,मसाला चहा याचा कसा अतिरेक करत आहे याचा उल्लेख होता.एक डॉक्टर म्हणून त्यांची कळकळ त्यांनी व्यक्त केली आणि यावर सविस्तर लिहाल का म्हणून विचारणा. आजचा ब्लॉग ह्याच विषयावर.

ज्या वाचकांनी मूळ उदकगाथा हा ब्लॉग वाचला नाही त्यांनी नक्की rupalipanse.com वर तो वाचावा. श्वसनसंस्थेचे स्वास्थ्य राखण्यात कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, कवलधारण(oil pulling), नस्य (नाकात औषधी तेलाचे थेम्ब ) याचे अनन्यसाधारण महत्व आहे. अवाजवी कफ आणि सैराट वात यापासून कायमच फुफुसे आणि श्वसन अवयवांना जपावे लागते. यासाठी विविध तेलाचे, चूर्णाचे नस्य, साध्या पाण्याच्या, औषधी काढ्याच्या,दुधाच्या गुळण्या असे उपाय व्याधीनुसार आणि दोषानुसार योजावे लागतात. मुळात आपल्या श्वसनसंस्थेचा आतील स्तर काय असतो ते समजून घेऊयात. ओठांच्या आतल्या बाजूपासून म्हणजे गालाची आतली बाजू , टाळू आणि घसा मग श्वसननलिका किंवा अन्ननलिका यातल्या आतल्या बाजूला जी असते ती म्हणजे अंतस्त्वचा किंवा सोप्या भाषेत Mucosa .
हि अंतस्त्वचा ओलसर , स्निग्ध , मऊ आणि प्रचंड नाजूक असते. छोट्या छोट्या शेकडो रक्तवाहिन्यांचे आणि संवेदना वाहिन्या (नर्व्ह सेल्स ) जाळे ह्या त्वचेच्या आत असते. ह्या त्वचेचा ओलसरपणा टिकून ठेवणे अतिशय महत्वाचे असते त्याकरिता मुळातच लाळ, नाकातील नैसर्गिक स्त्राव इत्यादींची योजना असते ज्याला mucus म्हणतात . ह्या अंतस्त्वचेची व्याप्ती नाकापासून ते फुफुसांपर्यंत व ओठांपासून ते गुदद्वारापर्यंत असते . या mucosa चे काम फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स सारखे असते. बाहेरून येणारी हवा आणि त्यातील नकोसे सूक्ष्म धूलिकण, जीवजंतू इत्यादी प्रवेशाबरोबरच काही प्रमाणात रोखले जातात आणि निष्क्रिय केले जातात. या कामामध्ये ह्या स्तरांमधील ओलावा चिकटपणा उपयुक्त ठरतो. तसेच प्रत्येक क्षणाला श्वासाबरोबर येणारी हवा सुलभ रित्या आत बाहेर जाण्यास मदत होते. तोंडातील लाळेचा देखील ह्याचप्रमाणे पचनसंस्थेत उपयोग होतो.
आता जेंव्हा ह्या लाळेचा चिकटपणा अवास्तव वाढतो, घशाला सूज, दुखणे ,टॉन्सिलची हानिकारक वाढ इन्फेकशन कफयुक्त खोकला येतो तेंव्हा सहन होईल अश्या गरम (कोमट) पाण्याचा उत्तम उपयोग वरील तक्रारींवर होतो. अवास्तव कफ गरम पाण्याने निश्चित कमी होतो. तसेच सायनस इन्फेकशन, कफाची सर्दी यावर देखील गरम पाण्याची वाफ घेणे अतिशय उत्तम काम करते. थोडक्यात जिथे कफाची वाढ आहे , चिकटपणा आहे, नाकातील स्त्राव घट्ट आहे अश्या ठिकाणी वरील उपाय निश्चित योजता येतात. खूपच घरगुती उदाहरण द्यायचे झाले तर तेलकट चिकट कढई गरम पाण्यात भिजवून घासली तर लख्ख निघते. मला वाटते हि उपमा पुरेशी होय.
याच्या अगदी उलट पित्ताचे अधिक्य असेल घशाची आग, नाकात दाह, तोंडात ulcer असताना यातील काहीही करणे अयोग्य असेल. तसेच वात दोष वाढला असेल तर उष्ण उपचाराबरोबर स्निग्ध( oily ) गोष्टींची देखील उपाययोजना करावी लागते. अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन मगच कुठलीही उपाययोजना करावी लागते.
मूळ मुद्य्यावर येऊ. मग आम्ही रोज गरम पाण्याची वाफ घ्यावी का? आम्ही रोज गरम पाण्याच्या गुळण्या कराव्या का ?
कडक गरम पाण्याने वाफ घेणे हानिकारक ठरेल तसे करणे टाळावे. सहन होईल अश्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्या.
तुम्ही घरातच असाल,बाहेरील वातावरणाचा,लोकांचा संबंध येत नसेल तर रोज वाफ घेणे अथवा गुळण्या करणे निश्चित बंधनकारक नाही. घ्यायचं असेल तर कोमट आणि कमी वेळ हे समीकरण वापरू शकता.
नाकातील पॉलीप(नाकातील लोम्बणाऱ्या mucosa च्या गाठी) ,DNS ( नाकातील हाड वाढणे अथवा सरळ नसणे, घोळणा फुटण्याचा त्रास असणे यांनी आधी वैद्याचा सल्ला घ्यावा.
रोज जर वाफ घेत असाल अथवा गुळण्या करताना त्यात लवंग,ओवा किंवा इतर तीक्ष्ण मसाला जपून योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच टाकावे अथवा टाळलेले उत्तम.
अतिउष्ण गुळण्या अथवा वाफ घेण्याचा अतिरेक झाला तर अंतस्त्वचेचा ओलावा स्निगधपणा नाहीसा होऊ शकतो.
अतिसूक्ष्म रक्तस्त्राव, अतिसूक्ष्म जखमा(तोंड येणे), कोरडेपणा, लाळ कमी स्रवणे, नाकात हळवेपणा आग, दुखणे असे त्रास होऊ शकतात.
हीच गत काढ्याची होय. चूक काढ्याची नाही काढा चुकीच्या पद्धतीने वाटेल तेवढा वाटेल ते मनाप्रमाणे घालून घेणाऱ्यांची होय.
मुळात सर्व औषध स्वरूपांमध्ये वनस्पतीच्या रसानंतर काढ्याचा नंबर लागतो. रस सर्वात जास्त लवकर औषधी कार्य सुरु करते आणि potent असते त्यांनतर काढा मग चूर्ण . त्यामुळे सर्वात कधी लक्षात घ्या काढा लवकर आणि जास्त प्रमाणात लागू पडतो. काढ्याची मात्र हि ३० ml (छोटा अर्धा कप ) पेक्षा जास्त नसावी. जेंव्हा आजार नाही पण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घेताय तेंव्हा दिवसातून एक वेळ काढा पुरेसा होऊ शकतो. काढा खूप दिवस घेणार असाल तर वैद्याचा सल्ला मस्ट आहे. mouth ulcers छातीत जळजळ, पित्ताची प्रकृती, जठराचे विकार, ulcer , रक्ती मूळव्याध यापैकी काहीही असेल तर काढा घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. व्हाट्स अँप वरील माहितीला डॉक्टरांचा शब्द मानून स्वतःच्या जीवाशी खेळू नका. व्हाट्स अँप वरील सर्व पोस्ट्स म्हणजे माकडाच्या हाती कोलीत अशी झालीये. एका क्षणात पोस्ट्स viral करणारे आपण … असो. हे फक्त भारतातच नाही सगळीकडे होते.इथे ओरलँडो मध्ये माझी एक चायनीज मैत्रीण आहे तिने मला अशीच एक तिला आलेली मेल फॉरवर्ड केली आणि तू आयुर्वेदा डॉक आहेस तू नीट वाच आणि सांग हे बरोबर आहे का करू का मी पण . चायना मध्ये माझे रेलॅटिव्ह आणि फ्रेंड्स खूप करताय हे. पोस्ट होती लसणाबद्दल कि लसूण जाळून वाफ घ्या ,लसूण उकळून वाफ घ्या कच्चा लसूण रस नाकात टाकल्याने करोना जातो इत्यादी. तिला नीट समजवावे लागले कि हो लसूण औषधी आहे त्याचा काही अवस्थांमध्ये नाकात लसूण तेल टाकणे, लसूण पोटातून घेणे असा उपयोग असतो. पण सर्रास सारासार विचार न करता असे काहीही करू नको आणि पोस्ट देखील फॉरवर्ड करू नकोस.
प्रतिबंधात्मक उपाय हे उपकारक व्हावे म्हणून व्हाट्स अँप,इंटरनेट पेक्षा वैद्याला विचारा. योग्य सल्ला मिळेल आणि अपाय टळतील. ऑइल पुलिंग हे मॉडर्न नाव देखील आज खूप ट्रेंड मध्ये आहे .आयुर्वेदात कवल ह्या दिनचर्येतील अतिशय अभिनव आणि उपकारक प्रकाराला ऑइल पुलिंग हे सोपे आणि गोंडस नाव मिळालेय. अमेरिकेत देखील ह्या विषयी उत्सुकता बघायला मिळाली आणि कित्येक आर्टिकल्स वाचायला मिळाली .याविषयी देखील अनेक प्रश्न शंका वाचकांकडून आल्या त्यावर इत्यंभूत माहिती पुढील लेखात अवश्य वाचा.

Share this :

7 thoughts on “अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा)”

  1. फारच उद् बोधक.. आणि अतिशय आवश्यक असा लेख.. खरंच विचार पूर्वकच वागायला हवे.. धन्यवाद रुपाली ताई.. 🙏🙏🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart