“उत्क्रांती संस्कृती आणि आहारक्रांती ” !!!!!!!!!!!
निरोगी जीवनशैली,उत्तम सकस आहार, योग्य व्यायाम, ताणतणाव नियोजन,मनाची प्रसन्नता तसेच आरोग्य आणि अध्यात्मिक आरोग्य म्हणजेच स्पिरिच्युअल हेल्थ या वेगवेगळ्या निकषांवर आज आरोग्य संकल्पनेवर काम होतेय. रोग प्रतिबंध यावर विशेष भर दिला जातो जे आयुर्वेद ग्रंथांचे मूळ तत्व होय.
मनुष्य प्राण्याचे जीवन हे शरीर धारणास्तव,म्हणजे फक्त जगावे म्हणून केलेले अन्न भक्षण,मलमूत्र विसर्जन ,संभोग आणि कालयोगाने मृत्यू इतके अप्रगल्भ निश्चित नाही.तसेच आरोग्य ह्या शब्दाची व्याप्ती, शरीरातील काही अवयव त्यांचे बिघाड आणि त्यावरील उपाय एवढी संकुचित किंवा mechanical नाही (सुदैवाने ). कारण अजूनतरी आपण गाडी दुरुस्तीला टाकतो त्याप्रमाणे आपल्या प्रिय व्यक्तीला डॉक्टरकडे सोडून,\” ए बघ रे जरा काय पार्ट बिघडलाय, दोन दिवस झाले कुरकुर चाललीये .उद्या ऑफिसात जाताना घेऊन जातो,तोवर करून ठेव नीट\’\’ असे म्हणत नाही .
पृथ्वीच्या निर्मितीपासून निर्माण झालेल्या अमिबीय जीवापासून मनुष्य अशी अचाट,अकल्पित उत्क्रांती,प्रगती किंवा अजून काही योग्य शब्द असेल तर तोः घ्या,तर हे सगळे निसर्गातील दृश्य ,अदृश्य,सिध्द ,प्रत्यक्ष प्रमाण असलेले,अनुमान प्रमाण सचोटीवर उतरणारे,कलनीय अनाकलनीय बाजू असणारे हजारो प्रमेय च आहेत कि .
maणूस हा \”प्राणी\” या टप्प्यावरच असताना केवळ प्राणीसुलभ शारीरिक विकासाची एक प्रमाणबद्ध चौकट ओलांडून त्याही पलीकडे जाऊन माणूस नावाच्या मनुष्य प्राण्याचा विकास झाला.ह्या मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीचे महत्वाचे टप्पे हे मानसिक विकासावर,मेंदूच्या प्रगतीवर आधारलेले होते.
निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्गाचे,ऋतूंचे,निसर्गातील घडामोडींचे ,आपत्तींचे ,उपलब्धींचे, सौंदर्याचे , सुहृदाचे, सृजनाचे, प्रसंगी क्रौर्याचे , विनाशाचे , संहाराचे धडे हा भविष्यकाळातील महाशक्ती असणारा परंतु त्याकाळी प्राणी ह्या परिभाषेची कात टाकायला निघालेला मनुष्य प्राणी गिरवत होता . हे धडे तो असे गिरवत होता कि त्याची बाराखडी येणाऱ्या हजारो लाखो पिढ्या गिरवणार होत्या.प्रत्येक वेळी पुढे नेताना त्या पिढ्या तो वारसा प्रगत,म्हणजेच अजून अपडेट करत जाणार होत्या.आधुनिक भाषेत जेनेटिक म्युटेशन हो वेगळे काही नाही.हा आता कळले बुवा , इतका वेळ काय बोलताय कळत नव्हते.
तर एका विशिष्ट काळानंतर निसर्गाने जन्माला घातलेले हे मनुष्य बाळ निसर्गावरच राज्य करू लागले .स्वतःचा अभ्यास करू लागले .
गरज , भूक,स्वसंरक्षण इतपत झेप न राहता निर्मिती हि सगळ्यात महत्वाची झेप माणूस घेत होता.अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून अस्तिवात नसलेल्या गोष्टींची निर्मिती हा मनुष्यक्रांतीचा प्रेरणा स्रोत होता म्हणावयास हरकत नाही.
या मानसिक विकासाचा मनुष्याच्या शारीरिक अवयवांइतकाच विकास आणि बदल होत होता . निसर्गाचे शरीरावर होणारे परिणाम माणूस जसा जसा जाणून घेऊ लागला तसतसा त्याच्या जीवनशैलीत बदल झाला.हे प्राथमिक सत्य आपण सगळे जाणतोच .
परंतु यातून जी एक मोठी गोष्ट घडली,ती म्हणजे संस्कृती निर्माण झाली. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या जागी राहणाऱ्या,वेगवेगळी भौगोलिक परिस्थती वेगवेगळे उपलब्धी असणाऱ्या मनुष्य गटांचे एकत्र राहणे ,खाणे आणि एकंदरीत च जीवनशैली नावाचा उदय झाला.
आगीवर प्रभुत्व आणि अन्न शिजवणे ह्या दोन बाबी आजही मनुष्य उत्क्रांतीतील सर्वात महत्वाच्या बाबी मानल्या जातात.
जीवन शैलीचा असा उदय होणे हि आरोग्य या संकल्पनेची नांदी होती .कृपया मागील वाक्य नीट परत परत वाचा.सजीव सुलभ, स्वतःचे शरीर धारण करणे , स्वतःचा बचाव करणे आणि स्वतःची जात प्रजनन करून वाढवणे ह्या मूळ हेतुंमध्ये उत्तमोत्तम बदल या जीवन आणि आहारशैली मुळे घडून आले .जात म्हणजे मनुष्य जात असा येथे अर्थ घ्यावा.मनुष्य जीवाचा वंश वाढवणे आणि त्याकरता त्याची निसर्गात टिकून राहण्याची क्षमता म्हणजेच आरोग्य वाढवणे असा मूळ हेतू दिसून येतो.
म्हणून जीवन शैली आणि संस्कृती हे दोन खूप महत्वाचे मुद्दे येथे अधोरेखित करावेसे वाटतात .कारण हि जीवन शैली आणि संस्कृती ते ते विशिष्ट ठिकाण आणि काळ ह्या कसोटीवर उतरत असते .तसेच पिढ्यान पिढ्या आहार , विहार आणि जगण्याची एक विशिष्ट पद्धत ज्याला आपण आचार म्हणतो ते ,हि संस्कृती जपत असते. या जीवनशैली आणि आहार संस्कृतीनुसार च त्या त्या प्रदेशातील लोकांच्या जनुकीय रचनेतही अनुकूल किंवा प्रतिकूल बदल होत असतात.तर मुद्दा असा आहे आरोग्य हि संकल्पना हे संस्कृतीच्या उगमापासून असावी.अश्या वेगवेगळ्या संस्कृती पृथ्वीतलावर वेगवेगळे अलिखित, अफाट साहित्य च निर्माण करत होत्या.शरीरा बरोबरच मनाचा पसारा आणि महत्व हळू हळू उलगडत होते .माणसाच्या अन्न ,वस्त्र आणि निवारा या तीन गरंजा चा वेगवेगळ्या शाखां मध्ये विस्तार झाला.
असा विस्तार होत असताना मूळ उद्देश मात्र अबाधित होता.माणूस त्याचे जगणे,टिकणे आणि सुप्रजनन . या गरजांच्या आजू बाजू च वेगवगेळ्या शाखा विस्तारित होत होत्या अभ्यासल्या जात होत्या.
थोडक्यात जीवन शैलीला,ज्या काळात विज्ञान ,शास्त्र ,सिद्धांत असे शब्द अस्तित्वात पण नव्हते ,त्या काळात स्व प्रामाण्याचा अनुभव होता.स्व प्रामाण्य याचा अर्थ स्वतःला तसेच विशिष्ट गटाला वारंवार आलेल्या अनुभवातून त्या गोष्टीची खात्री पटणे ती गोष्ट सिद्ध होणे होय .ह्या विशिष्ट काळानंतर मनुष्य प्राण्याची सर्व शास्त्रातली प्रगती हि झपाट्याने होतच राहिली.
मूळ हेतू अबाधित होता आणि आहे .मनुष्य प्राण्याचे या पृथी ग्रहावर अस्तित्व टिकवून ठेवणे.
आज जागतिकीकरणाच्या युगात संस्कृती ह्या कल्पनेचे चे सगळे खांब च गळून पडतात .जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या भौगोलिक वातावरणात राहणारे पामर जीव कुठल्याही संस्कृतींची जीवन शैली आपल्या हवी तशी हव्या त्या पद्धतीने अमलात आणतोय . आपण वर्षानुवर्षे ,पिढ्यान पिढया राहतोय त्या आजूबाजूचे निसर्गाचे प्रदेशाचे आणि आपल्या शरीरातले अणू रेणूंचे करार आपल्याला माहित नसतात .पण ते असतात हे १००% सत्य .
करार मोडला कि दंड भरावा लागणारच . करार मोडण्याचे माध्यम काय ? तर ,मी काय ,कसा, केंव्हा, किती खातो(खाद्यशैली) ,मी कसा राहतो (जीवनशैली) आणि मी कसा वागतो (मानसिक आणि शारीरिक नियम )म्हणजे च संस्कृती.
आज वैद्यकीय शास्त्रात इतर कुठल्याही कारणांमुळे होणाऱ्या व्याधींपेक्षा, आहारशैली आणि जीवनशैली मुळे होणारे व्याधी सर्वात जास्त आहे.करारभंगाचे आणि दंडाचे ह्या चपखल उदाहरण दुर्दैवाने हेच आहे.
संस्कृती हि कुठल्याही जाती अथवा धर्माची नसते.संस्कृती आणि धर्म या खूप वेगळ्या गोष्टी आहेत असे सुजाण वाचक जाणतातच.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी शरीर आणि शरीर कारभार, लागणारी भूक, होणारे व्याधी थोडे फार सारखेच राहणार .परंतु त्या भौगोलिक वातावरणाचा,तापमान ,उपलब्ध अन्न , ऋतू प्रकार,समुद्र सपाटी पासूनची उंची,यानुसार शरीराचा आणि निसर्गाचा करार झालेला असतो.शरीर भावात निसर्गाला अनुसरून बदल होतात.मनुष्याचा धर्म आणि जात बघून निसर्ग शरीरात बदल नाही करत.
त्यानुसार खाण्या पिण्याचे आणि इतर जीवन शैलीचे नियम संस्कृतीत आपोआप च आत्मसात होतात .
एकदा मला एका पेशंट ने इमेल मध्ये विचारले होते,\” मला शन्का पडते कि तुमच्या भारतीयांच्या प्रमाणेच आमच्या युरोपियन लोकांमध्ये पण वात पित्त आणि कफ असते का?\”(प्रश्न अर्थातच इंग्रजीत होता)
एक विशिष्ट प्रकारची संस्कृती ग्लोबल असेल किंवा नसेल ,परतू आयुर्वेद ग्लोबल आहे निश्चित . कारण आयुर्वेदात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांनुसार मनुष्य शरीतातील प्रकृती , दोष ,धातू ,आहार,विहार,आचार, व्याधी त्यावरील उपाय आणि व्याधी च होऊ नयेत म्हणून पालन करायची संस्कृती ह्याचे विवेचन आहे
अहो कुठल्या वैद्यकीय शास्त्रामध्ये उल्लेख असेल का, कि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आरोग्याशी निगडीत रोज संबंध येणाऱ्या गोष्टी यथोचित कशा कराव्यात .बाराखडी च कच्ची असेल तर शब्दकोश आणि ग्रंथ काय लिहणार.असे महत्व दिनचर्ये चे आहे म्हणून आयुर्वेदातील प्रत्येक ग्रंथात सुरुवात दिनचार्येपासून च आहे .ऋतूनुसार,स्थानिक प्रदेशानुसार आपला आहार,आचरण आणि व्याधी प्रतिबंध इत्यादी सर्वंकष विचार आयुर्वेदात केला जातो.
रोज खाण्यात असणार्या भाज्या,फळं, इतर व्यंजने यांचे गुणधर्म आणि व्याधीवर त्यांची उपयुक्तता याचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात आहे.पृथ्वीवरील त्या काळी माहित असणाऱ्या वनस्पती, प्राणिज,खनिज,सागरीय तसेच विविध धातू आणि इतर खाण्याजोग्या शेकडो गोष्टींचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात मनुष्य आरोग्य या अनुषंगाने अभ्यासले जाते.मला आयुर्वेद हा सर्वांग सुंदर अत्त्युत्तम कलेचा नमुना वाटतो तो याचकरिता.
मनुष्य गटांची जगण्याची स्पर्धा,सर्वायवल ऑफ फिटेस्ट,समूहप्रियता,आप्त प्रेमासारख्या मानसिक भावनांमधूनच च पुढे वेगवगेळे धर्म निर्माण झाले असावे. पण तरीही परत धर्माचे आचरण हे निसर्ग, आरोग्य याना अनुकूल असेच बरेचदा बघावयास मिळते. सण वारांमध्ये केले जाणारे व्यंजने हे त्या त्या ऋतूतील स्थानिक प्रदेशातील,बदलाप्रमाणे शरीरास योग्य असतील उपकारक ठरतील अशीच रचना विविध धार्मिक सणांची देखील आहे.
ज्यावेळेस आपण आहाराविषयी सगळे काही असे म्हणतो तेंव्हा हा उत्क्रांतीचा आणि आहारक्रांतीचा मुद्दा सोडून कसे चालेल?
अश्मकालीन युगातील प्राण्यांचे कच्चे मांस अथवा झाडपाला खाणे ते जेवताना रुमालाची कल्पक घडी ते काटा चमचा कसा ठेवावा अशी एक भन्नाट आहारक्रांती झाली आहे.
ह्या आहारक्रांतीला वरील सगळे मुद्दे पूरक होते आणि आहेत. म्हणून हे प्रकरण खोलात लिहिण्याचा खटाटोप!
सविस्तर माहिती साठी मनःपुर्वक धन्यवाद.🙏. वेद संस्कृती आणि आहार याचा असणारा संबंध सुरेखरित्या उल्लेख केला आहे.
रुपाली ताई,
Link दिलेली आहे. आॅनलाईन वाचण्याच्या फंदात कोणी पडत नाही. शक्य असल्यास यापुढे पुर्ण लेख अपलोड करावा.
🙏
(सत्यम् शिवम् सुंदरम् या ग्रुपच्या वतीने मी साहेबराव माने. पुणे. 9028261973)
Nice & ultimate useful post, Doctor