माझ्या गोडाच्या सवयीची सोय !
गरज आणि कुतूहल हि शोधाची जननी आहे असे म्हणतात. अगदी असेच माझ्या जवळजवळ सगळ्या पोस्ट्स ची जननी माझे पेशंट आहेत असे मी म्हंटले तर त्यात काही अतिशयोक्ती नक्कीच नाही.त्यांच्या मेंदूचा कायम ऑन असणारा अँटेना पुढचा ब्लॉग कशावर लिहावा असा प्रश्न पडूच देत नाही कारण त्यांचे प्रश्न कायम तयार असतात. पेशंट च्या अशाच अनुभवातून आणि प्रश्नातून आजची पोस्ट देखील सगळ्यांनाच उपयोगी होईल.
“हम्म बाहेरील गोड व्यंजने विशेषतः खव्याची व्यंजने टाळावी असे तुम्ही कायम सुचवता. बरोबर आहे तुमचे म्हणणे. पण कोपऱ्यावरच्या राजस्थानच्या मिठायांना पर्याय आहे का ? शिरा खीरीशिवाय दुसरे काय करणार ना म्हणून मिठाई घ्यावी लागते.तिने हळूच चोरून वर माझ्याकडे बघितले आणि स्वतःच म्हंटली हा द्या लिस्ट गोडाच्या पदार्थांची. तुमच्या डोक्यात असेलच तयार नाही का?
दोघी पोटभरून हसलो आणि मग हळूच लिस्ट ची पुडी तिच्यासमोर सोडली
बाहेरील भेसळीचा खवा,कृत्रिम रंग,रसायने चव आणि सुगंध यामुळे शक्यतो बाहेरची व्यंजने टाळावीत. अगदी खात्रीशीर ठिकाणाहून च आणणे चांगले.इतर वेळी शक्यतो खालील वेगळी आणि साधी व्यंजने घरी करणे उत्तम.त्यातल्या त्यात सोपी आणि पौष्टिक व्यंजने देतेय.
- कुस्करून एकजीव केलेल्या काळ्या खजुराची सुका मेवा घातलेली वडी (घरी उत्तम बनवता येते)
- .मनुका सुकामेवा खजूर अंजीर ओले नारळ टाकून लोहयुक्त आणि चविष्ट पाकातील भात(नारळी भात)
- पंचखाद्य (खोबरे,सुकामेवा,खारीक,मनुका वेलची जायफळ केशर ) घालून घट्ट दुधातील शेवयाची खीर
- सुवासिक तांदूळ भिजवून,बारीक वाटून दुधात शिजवलेली तांदुळाची खीर किंवा फिरनी.
- रवाळ दळलेल्या गव्हाच्या कणकेचा साजूक तुपातील गूळ घालून शिरा.
- परतताना भरपूर साय टाकून ओल्या खोबऱ्याची वडी( यात रंगाकरता बिटरसाचे थेम्ब, गुलाबपाकळ्या,केशर,गवती चहाच्या पानाचा रस असे वैविध्य ठेवू शकतो)
- रवा गुळाच्या खमंग साठोऱ्या किंवा सांजोऱ्या
- ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याची करंजी
- गव्हाच्या दलियाची गूळ,जायफळ वेलची बडीशेप घालून खमंग खीर किंवा लापशी.
- मुगाचे पीठ खमंग भाजून ठेवावे. हवे तेंव्हा पटकन भरपूर तुपात थोडे भाजून गरम पाणी ओतून शिजवून साखर टाकली कि चविष्ट मूग हलवा तयार.
- ओल्या नारळाची खीर
- पातळ अलवार नाजूक पानगी आणि रव्याची किंवा गव्हाची खीर
- पुरण भरून केलेले खमंग दिंड आणि वरून साजूक तुपाची धार
- सांज्याच्या गोड पोळ्या (मिनी रोटी)
- सोनेरी भाजलेल्या बेसनाच्या डायमंड शेप वड्या
खरेतर हि झलक आहे. खरे पारंपरिक पदार्थांची यादी हि याच्या हि दुप्पट होईल. परंतु आपली स्वयंपाकातली आवड ,उरक आणि वेळ यांचा ताळमेळ बसवायला हे १५ च पुरेसे आहेत.