abstract, angel, bass-1238660.jpg

Frozen walk in aisles !

गोठवणाऱ्या गल्ल्या ,सुन्न मन आणि अन्नाची पाकिटे !

नाही नाही लेखाचे शीर्षक एखाद्या suspense कादंबरीचे किंवा अस्वस्थ समाजाचे वाटत असले तरी अजून पण मी आहारावरच लिहिते आहे. पुण्याहून अमेरिकेत येऊन तब्बल ८ महिने होताहेत पण अजूनही इथल्या काही गोष्टी झेपत नाहीएत. इथल्या अनेक गोष्टींनी मला प्रेमात पाडलंय, कित्येक वेळा जीव हुरहुरतो कि अरे यार आपण असे का नाही आहोत आपल्या देशात. असंख्य गोष्टी नखशिखांत अनुकरण कराव्या अशा लाखमोलाच्या देखील आहेत. पण काही गोष्टी अक्षरशः पटत नाही,गोंधळात घालतात. त्यातली टॉप वर असणारी गोष्ट म्हणजे इथला फूड ट्रेंड.
जगातील सर्व खंडांचे देशाचे ,वर्णाचे, वंशाचे लोक अमेरिकेने पोटात घेतले आहे पण हि अमेरिका रोज पोटात काय घालते हा मुद्दा थोडासा बुचकळ्यात टाकतो. एखाद्या बाळंतिणीला पोस्ट बाळंत डिप्रेशन यावे अगदी तसे पोस्ट इम्मीग्रेशन डिप्रेशन मला कित्येक महिने आले होते. तो अंमल अजूनही पुरता गेलेला नाही. याचे मुख्य कारण अजस्त्र स्टोअर्स मधील हवाबंद गोठवलेलं अन्नाची पाकिटे आणि २० २० फुटाच्या उंचीच्या टिशू रोल च्या आणि वॉटर बॉटल्स च्या भिंती होत. शिजवून गोठवून पाकीट बंद करून मोठा मोठाल्या रॅक च्या गल्ल्यातून फिरताना माझी ”हे काय आहे? कोण है ये लोग? कहासे आते है ?” अशी काहीशी मनस्थिती असायची ! ऐकलेले असणे आणि पाहणे, प्रत्यक्ष जगणे यातला ढळढळीत फरक खणखणीत जिव्हारी बसला होता(आहे).
इथली जीवनशैली म्हणा तुम्हाला न ठेवली चॉईस म्हणा तुम्ही ट्रॅप होतातच.
लेख लिहताना अनेक गोष्टींची सरमिसळ होणार ए . काय कसे मांडावे कळत नाहीए. परंतु ह्या गोष्टी लिहणे आवश्यक वाटतेय कारण आज आहाराच्या बाबतीत भारत अजूनही एवढा खाईत ढकलला गेलेला नाहीए . टोकावर येऊन उभा आहे नक्कीच (कारण हो अनुकरण ). भारतात काय आहे जे अमेरिकेत दुर्मिळ झाल्यामुळे अमेरिका पाकिटातले ‘अन्न नसलेले अन्न’ खातेय.

वेळ आणि व्यस्त जीवनशैलीची ओढाताण आज दोन्ही देशात आहे. पण भारतात अजून तरी छोट्या बाजारपेठा जसे छोटी किराणा दुकाने, भाजी मंडई , घरगुती पोळी भाजी केंद्रे, लोकल बेकरींज, घरगुती साठवणीचे अन्नपदार्थ उद्योग यामुळे अजूनतरी बहुतांश भारतीयांवर पाकिटातील असे गोठवलेले अन्न खायची वेळ येत नाही. पाकिटातले खाल्ले तरी ते ताजे असेल ,फ्रोझन मात्र दुर्मिळच खाल्ले जाते( खाल्ले जातेच काही प्रमाणात) . इथे फार्मर्स मार्केट मध्ये ताजे द्यायचा प्रयत्न असतो परंतु तो खूपच जास्त तोकडा ठरतो.
अशा वेळेस भारतातील दणदणीत लोकसंख्या कधी कधी दिलासा वाटते. कोपर्या कोपऱ्यावरील भाजी फळे, ताजे मांस मिळतील अशा टपऱ्या,ताजा नाश्ता आणि इतर हि ताजे तयार अन्न मिळेल अशी सोय. आणि याही उपर स्वीगी, उबर अगदी देवदूताप्रमाणे गरम भाकरी देखील डिलिव्हर करतील याची खात्री. (इथे होम डिलिव्हरी प्रेव्हिलेज आहे सोय नाही ) छोटे गाव ,शहरांमध्ये पोळ्यांच्या काकू अथवा स्वैपाकवाली मावशी आपली आहारसंस्कृती लीलया पेलते ते वेगळेच.
इकडे पर्याय नाहीच.
अमेरिकेत छोटे गाव असो अथवा महाकाय शहर सर्व बाजारपेठ हि अजस्त्र ब्रँड नी गिळंकृत केलीये. वर्षानु वर्षे consumerism पोसला गेलाय आणि अनेक पिढ्यांच्या आहार सवयी पूर्ण बदलल्या गेल्या ,अगदी नियोजितरित्या . एक विशिष्ट मर्यादेपर्यंत च मनुष्य समाजातील प्रमुख (चांगल्या वाईट) गोष्टींपासून स्वतःला अलिप्त ठेवू शकतो नंतर तो त्या सिस्टिम चा एक भाग बनतो याचे अजून चांगले काय उदाहरण असेल. माझ्या हि घरात मनाविरुद्ध,चोरवाटेने का होईना बऱ्याच गोष्टी येताय. emergency, सोय म्हणून काही वेळा फ्रोझन पराठ्या ची पाकीट मी थरथरत्या हाताने का होईना पण उघडतेय आणि खातेय,खाऊ घालतेय. फ्रोझन चिकन ज्यात अक्षरशहा चिकन आहे कि नाही शंका यावी असे एकसारखे गुलाबी तंतोतंत एकाच आकाराचे जे काही आहे त्याची नवरा करी करतोच. मुलेही आवडीने खाताय.
इथे काय रेडी टू ईट व फ्रोझन मिळत नाही ते विचारा.उकडलेले अंडे देखील इथे साल काढून कापून ब्रेड सोबत फ्रोझन मिल म्हणून मिळते.
सगळ्यात अस्वथ झाले ती एक गोष्ट बघून. दात येण्याच्या वयातील बाळांसाठी चावता येतील असे कृत्रिम चव रंग आणि इतर भरपूर केमिकल्स ने युक्त पाकीट बंद टीदर्स (मग त्यात ऑरगॅनिक हि मिळतात ह).थोडक्यात ह्या गोष्टींना वयाच्या अवघ्या काही महिन्यात आपण एक्सपोस होतोय. दुधाचे पंधरा प्रकार fatless,व्हिटॅमिन डी वाले, partially homogenized , pasteurized, whole milk, ग्रास फेड cow मिल्क, दह्याचे पंधरा प्रकार वेगळेच. हि न संपणारी यादी नंतर खास ब्लॉग म्हणून लिहता येईल.
कमी लोकसंख्या, दूर दूर ची अंतरे ,राजकीय, कॉर्पोरेट पॉलिसी ,कॉंसुमेरिसम याव्यतिरिक्त लोकांची या बाबतीतली उदासीनता हे देखील मुख्य कारण आहे.
शाळेत बरीच मुले जेवण म्हणून झिप लॉक पिशवी मध्ये cookies, चिप्स , चोकोलेट्स आणतात . जवळजवळ सर्वच मुले सोडा पितात. शाळेतील कॅन्टीन मध्ये देखील तो उपलब्ध असतो. कॅन्टीन मध्ये मिल प्लेट मधील फ्रुट पोर्शन बरेचदा तसाच्या तसा डस्टबिन मध्ये जातो. उपलब्ध असणारे सर्व बरेचदा न विचार करता खरेदी केले जाते आणि खाल्ले जाते असे खूपच बोल्ड विधान मी करतेय कारण मी ते बघतेय.
एक लॉजिकल सेन्स असतो आहाराच्या बाबतीत तो नक्कीच missing वाटतो. इतर खंडातील आहारसंस्कृती प्रमाणे आहारसंस्कृती आणि विविधता नसल्याने अशास्त्रीय पद्धतीने नवनवीन कुजीन चा अट्टाहास हि दिसतो. स्टीक अँड शेक प्रकार त्यातीलच असावा ( गोमांस आणि मिल्कशेक असे कॉम्बिनेशन) ..बफेलो विंग्स cooked विथ हनी हाही त्यातीलच एक प्रकार .असे असंख्य वेगवगळे कॉम्बिनेशन्स मेनू कार्ड मध्ये वाचलेत . मध्यंतरी एक शेजाऱ्या कडून विचित्र पदार्थ ऐकला . मंद आचेवर दुधामध्ये बीफ शिजऊन तयार केलेली डिश. (अर्थात पिझा डोसा, चॉकोलेटे डोसा, तळलेलं icecream हम्म आपण भारतीय देखील कमी नाहीत अन्नाची चित्र विचित्र सरमिसळ करण्यात).
कदाचित हेच कारण असेल आशियायी रेस्टोरंटस मध्ये अमेरिकन फुटफॉल जास्त असतो. अतिशय दुर्मिळ असलेले शाकाहारी अमेरिकन भारतीय हॉटेल मध्ये आवडीने आलुगोबी खातात. मांसाहारी वर्ग बिर्याणी आणि करी चोपतो .
समाज आपल्याला जास्तीत जास्त उत्तम पर्याय उपलब्ध करून देत असेल तर नक्कीच निवड उत्तम केली जाईल. साधे ,ताजे आणि कमीत कमी प्रोसेस झालेले अन्नपदार्थ ह्याची प्रचंड मोठी बाजारपेठ अमेरिका आहे त्या दृष्टीने गुंतवणूक मात्र खूपच कमी असावी. का ते कोडे आहेच. इथल्या लोकांना भारतीय अन्नपदार्थांचे आकर्षण आहे माहिती मात्र दुर्दैवाने खूपच कमी मिळते. मुलीच्या अमेरिकन मैत्रिणी राहायला आल्यावर केलेली पावभाजी ,ब्रेड-डीप नावाने त्यांनी हिट केली. पोह्याचा चिवडा आवडीने स्नॅक म्हणून खाल्ला. (सेफ डिश म्हणून केलेला पास्ता मात्र उरला )आयांनी भाजीची रेसिपी मागितली. त्यांना फक्त चिकन करी च इंडियन फूड म्हणून माहित होते. पावभाजी मसाला घेण्याचे निमित्ताने चार अमेरिकन पावले इंडियन ग्रोसरी स्टोर मध्ये नक्की वळतील.
प्रत्येक देश तिथल्या संस्कृती नुसार खाद्यपदार्थ खात असतो. फक्त काळजीचा मुद्दा नको तितके प्रोसेस केलेलं आणि गोठवलेले पदार्थ आहेत.


या सगळ्याचा आरोग्यावर होणार परिणाम आता सर्व जगमान्य आहेच त्याचा विस्तार नको.
या सगळ्यात काही गोष्टी सकारात्मक दिसतात. भारतीयांच्या मानाने अमेरिकन खरोखर सयंत प्रमाणात खातात. त्यांच्या रात्रीच्या जेवणाची वेळ अगदी आदर्श वाटते. अर्थात काही अपवाद सोडले तर अमेरिकन्स हे 7.३० च्या आत जेवतात. जेवढी लोक कोच पोटॅटो म्हणून कुप्रसिद्ध आहेत त्या पेक्षा मोठा समाज व्यायामाला महत्व देतो आणि करतो. आपला ताणतणाव आणि इथला ताणतणाव याचे स्वरूप खूप वेगळे आहे. दैनंदिन ताणतणाव इथे कमी पाहावयास मिळतो.वैतागलेले चेहरे इथे दुर्मिळच. आपण त्या दैनंदिन तणावात बरेचदा दिवसभर वावरतो आणि त्याव्यरिक्तचा तणाव वेगळा . त्यामुळे परत आहार आणि जीवनशैलीच्या तराजूत आपण थोडे फार सारखेच येतो.
त्यामुळे भारताने आहाराच्या बाबतीत जे उत्तम शिल्लक आहे ते वाचवणे आणि वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ज्या प्रकारे ज्या वेगाने आपण वेस्ट ट्रेंड कॉपी करतोय आणि चांगल्या गोष्टी वगळून सोयीस्कर व घातक च गोष्टी समाजात रुजवतोय त्या वेगाने अशा मनाला गोठवणाऱ्या फ्रोझन अन्नपदार्थांच्या गल्ल्या लवकर च पाहायला मिळतील यात शंका नाही.

Share this :

3 thoughts on “Frozen walk in aisles !”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart