एका वाचकांनी सुचविल्यामुळे हे लिहितेय.
कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा
स्वतःच्या काळजी बद्दल तर बोलूच परंतु हे नक्की करा.
सुदैवाने आज या क्षणाला घरात गारव्यात सावलीत बसून उन्हाचे बाहेर पडू नये असे डोस देणे विरोधाभास वाटतोय कारण, मला तुम्हाला कदाचित शक्य होईल बाहेर उन्हात जाणे टाळणे. परंतु जे लोक उन्हातच काम करतात उदा.बिल्डिंग मधील वॉचमन, साफसफाई कामगार, रस्त्यावरील दुरुस्ती कामगार,रस्त्याच्या कडेला बसलेला चांभार, भर उन्हात नारळ पाणी घेऊन फिरणारा,या घरातून दूर दुसऱ्या घरात कामाला जाणारी घरकाम मावशी,कुरिअर बॉय,इत्यादी त्यांचे काय?
आपले काही सुती कपडे, scarf ,गॉगल, छत्री सढळ हाताने त्यांना द्यायला लाजू नका. सरबत,पाणी पुणेरी पणाने विचारू नका.न विचारता आग्रहानं त्यांना अवश्य द्या.
ज्या लोंकाच्या हाताखाली हे कामगार काम करतात त्यांच्या कामाच्या वेळांची थोडी फेरफार त्यांच्या मालकांनी करणे गरजेचे आहे.
पक्ष्यांसाठी भरपूर पाणी ठेवा.
आता वैयत्तिक काळजी बघू.
१.उन्हाशी खूप काळ संपर्क टाळा. टाळणे अशक्य असेल तर, डोकं,डोळे, याना उन्हापासून वाचवा.सफेद सुती,सैल वस्त्रे घाला.
२.बंद AC , कूलर , खोलीतून अचानक उन्हात बाहेर जाऊ नका. विशेषतः कार मध्ये खूप वेळ थंडगार वातावरणातून एकदम बाहेर पडल्यास शरीर अचानक झालेल्या तापमानातील बदलाला सहन करू शकत नाही. चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळ, खूप क्वचित चक्कर येऊन पडणे, मूत्रप्रवूत्तीस त्रास होणे, इतपत त्रास होऊ शकतो.
३.हातापायावर,डोळ्यावर गार पाण्याचे हबके मधून मधून मारावे.
४. अर्थातच पाणी आणि पातळ पदार्थ अथवा पेये प्यावीत. कोल्ड्रिंक म्हणजे पेप्सी,कोक इत्यादी अजिबात पिऊ नये कारण त्याने शरीराची जलीय अंशाची गरज अजिबात भागत नाही उलट अपायच होतात.
५. ताक,जलजिरा, कॊकम सरबत, कैरीचे पन्हे,नारळाचे पाणी, नीरा,ताजे संत्रा मोसंबी रस प्यावा.
६. मसालेदार ,तिखट, गरम, तेलकट पदार्थ ,शिळे, रस्त्यावरील उघडे, पदार्थ खाणे टाळावे.
६. भरपूर फळे खावी.
७.शारीरिक अति व्यायाम अथवा काम ह्या उन्हात धोकादायक होऊ शकते. मध्ये मध्ये सावलीत आराम आणि शरीरातील जलीय अंशाची हानी भरून काढणारी वर सांगितलेली पेये प्यावीत.
८. भूक अर्थातच कमी होते त्यामुळे पचायला हलके आणि साधे जेवण असावे,
९. उष्णतेचा त्रास होतोय असे वाटल्यावर साळीच्या लाह्यांचे पाणी ,वाळा भिजवून पाणी, नारळ पाणी, उंबर जल,मनुकांचे सरबत, असे घ्यावे आणि अर्थातच आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
१०. खूपच लहान बाळ आणि खूप वयस्कर व्यक्ती यांचे मूत्र प्रवृत्तीचे प्रमाणावर लक्ष ठेवावे.लघवीला कमी होतेय असे वाटले तर शरीरात पाणी कमी असल्याचे ते पहिले लक्षण होय. तेंव्हा दुर्लक्ष करू नये.
११. शरीराची स्वछता हि आवश्यक आहे. अथवा घामोळ्या आणि इतर त्वचेच्या तक्रारी होतात.
१२. शरीरातील पित्त रक्त असंतुलनाने होणाऱ्या डोळे येणे, डोळ्याला होणाऱ्या पुळ्या, नागीण या व्याधींवर घरगुती उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा.
१३. उन्हाच्या काहिलीने हैराण होऊन खाल्ले गेलेले बर्फ गोळा, icecream ,सोडा हे घशाची निश्चित वाट लावतात तेंव्हा भर उन्हात खाणे टाळा.तसेच ते तापमानाच्या दृष्टीने विरुद्ध अन्न होय.तेंव्हा निश्चित टाळा.
आपल्याच प्रतापांनी आपल्यावर चिडलेली धरती माय आणि तिचा लाडका सूर्य लवकरच शांत होवो !
वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८
drrupalipanse.wordpress.com
(कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल.धन्यवाद )