skip to content

बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी!

बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी!

राष्ट्रीय पोषण सप्ताह
लेख ४.
दिनांक ४/९/१८
मागील लेखात आपण बाळंतिणीच्या आहाराविषयी पहिले. बाळंतिणीचं विशेष आहार स्तन्याची देखील काळजी घेत असतोच. परंतु बाळंतिणीची शारीरिक मानसिक स्थिती जीवन शैली देखील उत्तम असणे तितकेच आवश्यक होय.
बाळंतिणीला नुसते खायला दिले कि जबाबदारी संपते असे मुळीच नव्हे.उत्तम खायला दिले तरी त्या पोषक आहाराचे नीट पचन होणे खूप गरजेचे आहे.नीट पचन होऊन त्यातून हवा तो पोषकांश स्तन्यात यावा आणि अनावश्यक भाग वगळला जाणे अपेक्षित असते.परंतु जर बाळंतिणीची झोप अजिबात होत नसेल,पचनशक्ती बिघडली असेल,पोट साफ होत नसेल,तब्येतीच्या इतर काही तक्रारी असतील, मानसिक स्थिती चिंता,शोक,क्रोध,शोक अशी असेल,अतिआराम अथवा अजिबातच आराम मिळत नसेल तर अशा सर्व गोष्टींचा स्तन्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
वरील सर्व कारणांमुळे वात पित्त आणि कफ दोषांचे असंतुलन होऊन त्या त्या दोषाने युक्त गूण दुधात देखील उतरतात.

आईच्या दुधाकडे प्रोटीन १०%,ग्लुकोज २.८%,लवण ५.१% आणि जलांश ८९.८६% असे केवळ एक केमिकल फॉर्मुला म्हणून बघितले गेले तर स्तन्यदोष ह्या आयुर्वेदिक शास्त्रातील खूप महत्वपूर्ण संकल्पनेला आज वैद्यक शास्त्र मुकेल.

पुष्टी आरोग्य वाढ करणारे स्तन्य हे विनासायास आईला त्रास न होता बाहेर येणारे असे असते. स्तन्याचे काही थेम्ब स्थिर पाण्यात टाकले असता ते पाण्याबरोबर त्वरित समानपणे मिसळते.असे स्तन्य पांढरे शुभ्र असून चिकट,अतिपातळ अथवा खूप घट्ट नसते. स्तन्य स्वभावतः मधुर म्हणजे गोडसर असते .स्तन्य जर खूप गडद पिवळसर, हिरवटसर काळसर रंगाचे असेल तर याकरिता बऱ्याच बाबी जसे काही बाळंतीण घेत असलेली विविध औषधे, कृत्रिम रंग घातलेले अन्न, किंवा काही वेळा रक्त पूय मिश्रित असण्याची शक्यता असते. घाबरून न जाता वेळीच या बाबी डॉक्टरांकडून तपासून घेणे गरजेचे असते.

दुधामध्ये पांढरटसर गाठी असणे,दुधाचा दर्प येणे, तंतुयुक्त दूध, फेसाळ दूध, खूप प्रयत्नाने बाहेर पडणारे दूध,खूप उष्ण स्पर्श असणारे दूध हे सर्व स्तन्यदुष्टी लक्षणे आहेत.योग्य वेळी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
बरेचदा बाळास होणाऱ्या काही त्रासांचे निदान होत नाही. उदा.अंगावर आलेली रॅश,मधून मधून होणारी मोठी उलटी, बाळाचे अस्वस्थ होऊन रडणे, किरकिर करणे,छातीत कफ इत्यादी अशा वेळेस स्तन्यदुष्टीची उपाययोजना केली कि अनुकूल परिणाम मिळतात. बाळंतपणात दिले जाणारे बाळंतकाढे,दशमूलारिष्ट,सौभाग्यशुंठी पाक, प्रतापलंकेश्वर हि आयुर्वेदिक औषधी अशा विविध स्तन्यदूष्टीवर योजली जातात.ती केवळ वैद्यांच्या सल्ल्यानेच वापरावी.
पाठा/ नागरमोथा /अनंतमूळ/ कुटकी /कडू चिराईत/ गुळवेल/ वाळा/सुंठ,दारुहळद, अशी वनस्पती भरड वापरून त्यांचा काढा दिल्यास स्तन्य दुष्टी कमी होऊन स्तन्यदुष्टिने झालेले बाळाचे आजार देखील कमी होताना दिसतात.अर्थात वैद्याचा सल्ला आवश्यक.
साठे साळीचे तांदूळ,साळीच्या लाह्या ,वाळा, कुश काश दर्भ, खडीसाखर, ऊस, दूध,तूप काळे जिरे, शतावरी या द्रव्यांचा उपयोग स्तन्यजनन म्हणजे स्तन्याची निर्मिती वाढवण्यास उत्तम होतो.
मागील लेखात उल्लेख केलेला आहार देखील स्तन्य प्राकृत ठेवण्यास मदत करतो.याखेरीज बाळाकडे असलेली स्वाभाविक ओढ लळा प्रेम ह्या देखील स्तन्यजनन म्हणून उल्लेखिलेल्या आहेत. \”दर्शनात स्पर्शनात संस्मरणात \”…..म्हणजे बाळाच्या केवळ दिसण्याने,बाळाच्या केवळ स्पर्शाने एवढेच नव्हे तर बाळाच्या आठवणिनीने देखील आई ला पान्हा फुटतो . निसर्गाने समजूतदार पण आधीच दाखवलाय . गरज आहे ती आपण अजून थोडे समजून घेऊन सुयोग्य सूतिकाआचरणाची !
असे स्तन्य पुढील सहा महिने बाळाची उत्तम वाढ करते. पुढील लेखात सहा महिन्यानंतर बाळाच्या पोषणासंबंधी जाणून घेऊ .उद्याचा लेख जरूर वाचा.

लेखिका: डॉ.रुपाली पानसे
आद्यं आयुर्वेद क्लीनिक,पुणे
९६२३४४८७९८

(लेख लेखिकेच्या नावासकट तसेच लेखात फेरफार न करता जरूर शेअर करा.)

Share this :

1 thought on “बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी!”

  1. Pingback: बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी! – SwamiAyurved

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart