Herbal Birbal…!


हर्बल म्हणजे काय रे भाऊ?
आज हर्बल हा शब्द बाजारात अक्षरशः धुमाकूळ घालतोय.
एका मोठ्या प्रदर्शनात आमचे क्रीम वापरून पहाच म्हणून एक विक्रेता आग्रह करत होता.”हर्बल आहे बघा तर खरे”. हर्बल शब्द ऐकून मी चमकले आणि थांबले.
बघू तर म्हणून क्रीम ची मागील बाजू तपासू लागले .”Glyceryl Stearate,Cetyl Alcohol, Stearic Acid, Glycerin, Emulsifying Wax,Isopropyl Palmitate. ” हे हर्बल आहे??? “अहो त्यात चंदन तेल,जोजोबा तेल,गव्हांकुर आहे कि”.”अच्छा तरी ते हर्बल नाही रे, ” म्हणून मी स्टॉल समोरून निघून गेले.
लिंग, वर्ण, जात, देश आणि शिक्षण ह्याचा काहीच संबंध नसलेली ग्राहक मनोवृत्ती मात्र थोड्याफार प्रमाणात सगळीकडे सारखीच असते. हर्बल म्हंटले कि सेफ , आयुर्वेदिक म्हंटले कि नो साईड इफेक्ट. अहो पण ते आयुर्वेदिक आहे का …हर्बल म्हणजे तरी काय?
आयुर्वेदाला सोनेरी दिवस आलेत ,हर्बल परत आलेय असे एक छान चित्र आज समाजात जाणूनबुजून तयार केले जातेय. चकचकीत, सुटसुटीत रूपात ते आज सादरही केले जातेय हर्बल या रॅपर मध्ये!

आहार,जीवनशैली,आरोग्य आणि औषधी क्षेत्रात आयुर्वेदावाचून पर्याय नाही. आज आयुर्वेदाची निश्चित गरज आहे.खरी गरज आहे ती आयुर्वेदातील तत्वे, मूलभूत सिद्धांत आणि औषधी हि आयुर्वेदिक शास्त्रातील कसोटींना खरे उतरून शास्त्रीय पद्धतीने तयार होऊन आपल्यापर्यंत पोचण्याची. बुद्धी आणि पैसा यांची खरी गुंतवणूक ह्या गोष्टींकरता निर्मिती क्षेत्रातील दिग्गजांकडून होणे अपेक्षित आहे.पण ती हर्बल प्रोडक्टवरच मर्यादित आहे हि खेदाची गोष्ट. लाखो करोडो ची उलाढाल असलेल्या हर्बल, कॉस्मेटिक व इतर उत्पादकांकडून संपूर्ण आयुर्वेदिक (हर्बल नाही)उत्पादने निर्मितीच्या बाबतीत निराशेचाच सूर दिसतो. यात दुर्दैवाने ग्राहकाची पर्वा केली जात नाही.
हर्बल मार्केट वर एक नजर टाकुयात

बाजारात आज जवळजवळ प्रत्येक गोष्ट तुम्हाला हर्बल मिळू शकते.यावर विनोद हि बरेच होतात. शेविंग क्रीम, चहा,शाम्पू,साबण, टूथपेस्ट,फेस वॉश,डिश वॉश,कपड्याचा साबण,सौंदर्य उत्पादने, केसांचे जेल ,तेल ,केसांचे रंग, मेंदी ,डाय आणि अजून काय काय! अहो मग चांगलंय कि कंपन्या हर्बल होताहेत चांगली गोष्ट आहेकी ! नाही ना इतके साधे नाहीये हे.
वरील लिस्ट मधील जवळजवळ सगळेच पदार्थ तयार करताना मूळ घटक म्हणून रसायनेच वापरावी लागतात. त्याशिवाय मूळ पदार्थ तयार होतच नाही.त्यात मग काही हर्बल घटकद्रव्ये वरून टाकले कि झाली वस्तू हर्बल किंवा आयुर्वेदिक असे आहे हे.
एक उदाहरण बघू कपड्याची पावडर यात खालील घटक द्रव्ये हि कमी अधिक प्रमाणात वापरावी लागतातच जसे Alcohol Ethoxylate (AE) Non-ionic surfactant ,Alkyl (or Alcohol) Ethoxy Sulphate (AES) Alkyl Sulphate (AS) Anionic surfactant.
Amine Oxide
Carboxymethyl Cellulose (CMC)
Citric Acid
Cyclodextrin
Diethyl Ester Dimethyl Ammonium Chloride
Ethanol.
हे घटक द्रव्ये वापरून तयार झालेली पावडर वरून थोडे लिंबू, चंदन तेल,सुगंधी तेल न काय काय टाकून आयुर्वेदिक किंवा हर्बल कशी होणार?
सगळ्यात मोठी उलाढाल आज केसांच्या कृत्रिम रंगात होतेय.हर्बल या नावाखाली अनेक मोठं मोठ्या देशी आणि विदेशी कंपन्या खूप प्रकारचे उत्पादने घेऊन बाजारात उतरल्या आहेत. यातील एकही, हो अगदी एकही उत्पादन पूर्णपणे रसायन विरहित नाही. जाहिरातीत मात्र पूर्णपणे हर्बल, आयुर्वेदिक, हे तेल ती वनस्पती अशी दिशाभूल केली जाते. प्रत्यक्षात त्याचे घटकद्रव्य तपासा. केसांच्या कृत्रिम रंगांकरता पुढील एक किंवा अधिक किंवा सर्व रसायने हि वापरली जातातच, उदा.Ammonia / Ammonium Hydroxide
Resorcinol:
PPD (para-phenylenediamine)
Ethanol Alcohol (isopropyl alcohol)
Parabens .

यातली रसायनांची allergy हि खूप गंभीर बाब आहे. केसांच्या कृत्रिम रंगानी येणार allergy हि भयानक असते आणि त्याचे गंभीर उपद्रव दृष्टी जाण्याइतपत नोंदवलेले आहेत. allergy व्यतिरिक्तही ह्या रसायनांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात ते वेगळेच.अगदी कॅन्सर होतील इतके गंभीर उपद्रवी रसायने वापरली जातात.मग आता काही कंपन्या आमचे उत्पादन PPD नसलेले अमोनिया नसलेले हर्बल म्हणून बाजारात आणताय. परंतु उरलेल्या घटकद्रयांचे उपद्रव त्याने कमी होत नाही कारण ते वापरले तर जातातच. इथे हर्बल ची वरुनवरून मलमपट्टी कशी चालेल ?काही स्थानिक ब्रॅण्ड्स तर पाकिटावर घटकद्रयव्ये छापण्याची हि तसदी घेत नाही. होय ,असे उत्पादन मी पाहिलेय हातात घेऊन. परवानगी कशी मिळते अश्या उत्पादनांना हि खूप खेदाची आणि गंभीर बाब आहे.असो. आता अश्या रसायनांनी ओतप्रोत उत्पादनात जर जासवंदी तेल,माका आणि आवळा जरी टाकला तरी याला हर्बल किंवा आयुर्वेदिक म्हणता येईल का?निश्चितच नाही.
अजून सोपे करून सांगते. मोठ्या पातेल्यात केलेल्या शेवयाच्या खिरी मध्ये मी चिमूटभर जायफळ टाकले तर ती जायफळ खीर होईल का?नाही ती शेवयाचीच खीर राहणार ना?अगदी तसे आहे हर्बल कॉस्मेटिकस ,हर्बल हर्बल म्हंटले तरी ते आयुर्वेदिक हि नसते आणि हर्बल हि!
सुरुवातीला दिलेल्या यादीतील बाकीच्या उत्पादनांचे पण असेच आहे तेंव्हा प्रत्येक उत्पादनांचे सविस्तर वर्णन टाळते.मुख्य उद्देश आणि कळकळ पोचली असे समजते.
कमीत कमी रसायनांनी युक्त अथवा पूर्ण रसायनविरहित उत्पादने हा खूप महत्वाचा विषय होय.
ग्राहक म्हणून मी काय करावे?
1.कुठल्याही जाहिरातींच्या आहारी जाऊ नका , भुलू नका.
2.कुठल्याही उत्पादनांचे घटकद्रव्ये तपासण्याची सवय लावून घ्या
3.त्या घटकद्रव्यांची अधिक माहिती मिळवा
4.कुठलेही सो कॉल्ड हर्बल कॉस्मेटिक किंवा इतरही वापरताना allergy टेस्ट नक्की करा.
5.जागरूक राहून समजून उमजून निवडणे आणि वापरणे अशी सवय लावा.
6.आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या
7.रसायन विरहित अथवा अतिशय कमी प्रमाणात अपायकारक असे उत्पादन निवड आणि वापरा.
वापरणं अथवा न वापरणे हा वेगळा मुद्दा.परंतु आंधळेपणाने हर्बल आहे म्हणून काहीही घेऊन आरोग्याशी खेळणे हे कारण आहे आज ब्लॉग करता हा विषय निवडण्याचे!
मॅचिंग ओढणी मिळेस्तोवर तासभर हुज्जत घालतो आपण बायका,”भैया और दिखाव” करत.कुठलेही गॅजेट विकत घेण्याआधी महिनाभर रिसर्च करतात पुरुष त्यावर. मग आरोग्याशी खेळ का?
एक गमतीदार खेळ : आज तुमच्या कुटुंबातील सर्व जण टेबलंवर जमा. बरोबर एक हर्बल आणि एक कुठलेही कॉस्मेटिक उत्पादन घ्या आणि त्यातील घटक द्रव्यांची तुलना करा.अगदी काहीही साबण, क्रीम, पावडर, शाम्पू. त्यातील घटक द्रव्ये आणि आरोग्यावरील परिणाम गुगल करा. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.

Share this :

1 thought on “Herbal Birbal…!”

  1. मी कुठल्याही मोठ्या काॅर्पोरेशनचे उत्पादन बाद समजते. साधं खोबरेल किंवा परवडल्यास लाकडी घाणा सारख्या कंपनीचे बदाम तेल ऊत्कृष्ट. आज सत्तरीला पोचलेय. माझी त्वचा चांगली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart