उदरस्थ :
काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ?
(जन्म ते मृत्यू प्रवासातील शाश्वत तेज /भूक)
आयुष्याच्या अनेक अलंकारिक व्याख्या आहेत. मला सगळ्यात विचित्र वाटलेली आणि तरीही पटलेली एक व्याख्या अशी होय.
“आयुष्य म्हणजे काय असते? आयुष्य म्हणजे नाळ कापल्यानंतरचे अर्भकाचे वजन आणि कालांतराने त्याच्या मृत्यूनंतर शिल्लक राहिलेल्या राखेचे वजन यामध्ये खाल्ल्या गेलेल्या अन्नाचे वजन असते.”
मोठी गमतीशीर तरीही भिडणारी व्याख्या होय.
नाळ जोडली जाणे किती सुंदर वाक्प्रचार आहे. नाळ हा शब्दच मुळी जीवनाची सुरुवात दर्शवितो.
जन्माला येऊ घातलेल्या ,नऊ महिन्यानंतर संपूर्ण शरीरात विकसित होणाऱ्या मनुष्य देहाला पोसण्याची पहिली शक्यता म्हणजे नाळ होय.पहिला जीवनाचा स्रोत देणारी ती नाळ !
हि नाळ पोटालाच का जोडली असावी? पाठीला,छातीला हृदयाजवळ किंवा मेंदूला का नाही? ती उदरस्थ च का?
कारण गर्भावस्थेत गर्भाच्या पोषणाचे ,प्राणधारणाचे जे काम शरीराबाहेर राहून नाळ करते अगदी तेच काम म्हणजे शरीर धारण,वाढ आणि पोषण नाळ कापली गेल्यानंतर उदरातील अग्नी, उदरस्थ अवयव करणार असतात.
जन्माच्या क्षणापासून अखंड पेटलेला हा उदरस्थ अग्नी/पाचकाग्नि /भूक अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करणार असते. नाळ आणि उदर हे जोडले असतात.
आहार,पोषण,डाएट, खाद्यशैली,विविध व्यंजने या सर्व विषयांना जिवंत ठेवणारी एकच गोष्ट या सगळ्याच्या मुळाशी आहे ती म्हणजे सदैव धगधगणारी भूक जी उदरस्थ आहे म्हणून मनुष्य जिवंत आहे.
आहार हा प्राण धारण करणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये अग्रगण्य होय असे वेद,पुराण आणि अर्थातच आयुर्वेद शास्त्र यांमध्ये उल्लेख आहे.
शरीरातील प्रत्येक अणु रेणू चे पोषण ,वाढ हि अन्नाद्वारेच होऊ शकते.शरीर जिवंत ठेवणारे मेंदू हृदय आणि फुफुस देखील आहारामुळेच जिवंत असतात.एवढी आहाराची महती.
काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ?
संपर्कात आलेल्या प्रत्येक गोष्टीला पचवतो किंवा दहन करतो तो अग्नी अशी सोपी व्याख्या अग्नीची करता येते.या वन्हीच्या सानिध्यामुळे पोटात जी संवेदना येते ती भूक!
जगातील प्रत्येक गोष्ट हि पांचभौतिक आहे. पृथी(घन तत्व),जल(तरलता) ,वायू(गती),तेज(ऊर्जा/फायर एलिमेंट) आणि आकाश(अवकाश/स्पेस) अशा मूळ भावांचा कमीअधिक प्रमाणात सर्व पदार्थात सहभाग होय.तसेच मानवी शरीरात याच पंचमहाभूतांच्या मिश्रणातून तीन प्रमुख कार्यकारी भाव शरीरात प्रत्येक पेशीत कार्यरत असतात.याना त्रिदोष असे म्हणतात.दोष असे जरी नाव असले तरी ते दोषी नसतात. उलट शरीरातील पेशींची उत्पत्ती,स्थिती ,परिणती,गती आणि कालातंराने नाश असे सूक्ष्म ते स्थूल कितीतरी शरीरक्रिया या दोषांच्या अधिपत्याखाली आजन्म होत असतात.
अग्नी हा तेज महाभूताच्या आश्रित असतो आणि हे तेज उदरस्थ पित्त दोषाच्या आश्रित असते.
थोडक्यात पोटात असलेल्या एका विशिष्ट पित्ताच्या सानिध्यामुळे,ऊर्जा तेज आदी तीक्ष्ण गुणांमुळे खाल्लेल्या आहाराचे,अन्नाचे पचन करवून त्याचे रूपांतर शरीराला हव्या असणाऱ्या ऊर्जेत किंवा वेगवेळ्या शरीरभावात करणारी अदृश्य परंतु गम्य शक्ती म्हणजे अग्नी होय.
उदरस्थ असणाऱ्या ह्या अग्नीला पाचकाग्नि किंवा कोष्ठग्नि असे म्हणतात.
आपण जे अन्न सेवन करतो त्या अन्नाचे परिवर्तन शरीराचे पोषण होऊ शकेल अशा स्वरूपातील पदार्थात रूपांतर करण्याचे काम पाचकाग्नि करतो.
पहिल्या पायरीतील ह्या पदार्थाला आहार रस किंवा रस धातू असे म्हणतात.हा रस धातू सर्व शरीरभर रक्ताद्वारे फिरून त्या त्या पेशींचे पोषण किंवा त्या पेशींची निर्मिती करतो.
वेगवगेळ्या पेशी समूहाला आयुर्वेदात धातू म्हणतात.रस ,रक्त,मांस ,मेद,अस्थी ,मज्जा आणि शुक्र असे सात प्रकारचे पेशीसमूह किंवा धातू शरीरात असतात.
ह्यातील रस हा प्राथमिक लसीका स्वरूपातील पेशी द्रव होय. रक्त म्हणजे रक्तातील विविध लाल पांढऱ्या पेशी,मांसधातू म्हणजे मांस पेश किंवा मसल्स , मेद म्हणजे लिपिड किंवा चरबी होय ,मज्जा म्हणजे चेतापेशी किंवा न्यूरॉन्स होय आणि शुक्र म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज होय.
प्राथमिक आहाररसापासून त्या त्या पेशींच्या स्वरूपात रूपांतर होण्या करता सूक्ष्म पचनाची आवश्यकता असते.हे करण्याकरता त्या त्या पेशींच्या उत्त्पत्तीस्थानात एक विशिष्ट प्रकारचा पाचकाग्नि असतो ज्याला आयुर्वेदात धात्वग्नी असे म्हणतात.
सोपे उदाहरण द्यायचे झाले तर रक्तनिर्मिती होताना प्राथमिक आहाररसाचे रूपांतर लसिकेत झाल्यानंतर रक्तातील पातळ जलसदृश भागाची निर्मिती यकृतातून तो रस जाताना यकृतात केली जाते. यकृतामध्ये रक्त धात्वग्नी हि क्रिया घडवून आणतो आणि रक्तातील पांढऱ्या आणि लाल पेशींची निर्मिती ह्याच रस धातूपासून पुढे हाडातील आतील भाग ज्याला अस्थी मज्जा म्हणतात त्यात केली जाते.असेच पुढे पुढे रक्तानंतर मांस धातू ,मेद अशी शरीरातील वेगवगेळ्या पेशी निर्मिती होत जाऊन शेवटी शुक्र म्हणजे स्त्री व पुरुष बीजाची निर्मिती होत असते.
त्यामुळे आपण पोटातील अन्न पचले असे म्हंटले तरी खरी पचनक्रिया पुढेही अव्याहत सुरु असते.पेशींची निर्मिती वाढ आणि पोषण याला चय असे म्हणतात.विघटन ,नाश आणि निचरा याला अपचय म्हणतात.
वर वर्णन केलेल्या एकंदरीत क्रियांना एकत्रपणे चयापचय किंवा मेटाबोलिसम म्हणतात.
आहारातील पोषक आवश्यक भाग रस धातूत रूपांतरित झाल्यावर उरलेला नको असलेला भाग हा मल मूत्राद्वारे बाहेर टाकला जातो. अगदी असेच जेंव्हा पेशींची निर्मिती होते तेंव्हा देखील प्रत्येक पेशीनिर्मितीत काही मलभाग तयार होतो उदा. स्वेद(घाम),नाकात,डोळ्यात,कानात जमा होणारा मळ,वाढणारी नखे केस इत्यादी . मलनिर्मिती आणि त्याचा निचरा हा देखील चयापचयातील महत्वाचा भाग होय. या मळ निर्मितीवरून आम्ही वैद्य लोक बऱ्याच रोगांचे निदान करतो . जसे केस गळायला लागले कि मनानेच लोक कॅल्शिअम का घेतात ,कारण हाडे कमजोर झाले कि केस गळतात हे माहित असते. केस हा अस्थी धातूचा मळ होय. म्हणून आम्ही मग अस्थी धातूंखेरीज त्या आधीच रक्त आणि रस धातूंची देखील काळजी घेतो म्हणजे सूक्ष्म पचनावर औषधी देतो. तसेच जास्त प्रमाणात डोळ्यात कानात येणारी घाण हि मेद म्हणजे चरबीचे मेटाबोलिसम बिघडल्याचे आमच्या लगेच लक्षात आणून देते. असो खोलात जाऊ तेवढा हा विषय रोचक आहे. विषयाची मर्यादा लक्षात ठेवुयात.
एखाद्या देशाची दळणवळण यंत्रणेचा जसा त्या देशाचा कारभार सुरळीत असण्यात वाटा असतो तेवढाच महत्वाचा भाग हा चयापचय क्रियेचा शरीरात असतो. रस्ते बंद, खराब ,अडथळे तर कारभार ठप्प.
आणि ह्या सगळ्या लाईफलाईन चा उगम असतो तो पोटातील अग्नी ,भूक आणि पचनशक्तीत . ती उत्तम तर सगळे आलबेल. ती बिघडली कि पुढील एक एक धातूंचे पचन,निर्मिती बिघडणार अन एकदंरीतच शरीराचा कारभार ठप्प होणार
ठराविक काळानंतर अन्न पचल्यावर परत पोटात तेज युक्त पित्ताचे म्हणजे पाचक रस स्रवला जाणार आणि भूक लागणार.
काही कारणांमुळे ठराविक वेळेस भूक न लागणे ,खाल्ले तरी सारखी भूक लागत राहणे,उत्तम भूक लागून आहार करूनही पचन नीट न होणे अश्या वेळेस पोटातील अग्नी बिघडल्याचे लक्षणे असतात.हि अग्नी विकृती फक्त पोटापुरती न राहता पुढील धांतूंच्या म्हणजे पेशींच्या निर्मितीवरही परिणाम करणार, कारण पेशींच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे पचवलेल्या अन्नाचा रसच जर उत्तम नसेल,अपाचित असेल तर पुढची इमारत हि कच्य्या मालाप्रमाणेच निकृष्ट दर्जाची होणार.सुदृढ पेशींची निर्मिती होऊ शकणार नाही. कारण पाचकाग्नि बिघडला कि पुढील धात्वग्नी पण बिघडणार. मग रक्ताल्पता असो, अस्थिसुषिरता (ऑस्टिओपोरोसिस) असो, अति चरबी साठणे असो कि वीर्याची दुष्टी असे साधे ते गंभीर आजार हे सर्व कमी,निकृष्ट किंवा फाजील वाढलेल्या पेशींमुळेच होत असतात.त्यामुळे पाचकाग्नि आणि धात्वग्नी दोन्ही महत्वाचे आहेत.
“साधे अपचन तर झालेय “असे वारंवार म्हणणाऱ्या व्यक्तींना ह्याचे गांभीर्य आता निश्चित वाटेल.
असा हा उदरस्थ अग्नी कायम जपावा.
जसे सर्व देवतांमध्ये गणेश आराध्य आद्य देव आहे ,जसे कुठल्याही व्रत वैकल्यात पूजेत आधी गणपतीची बाप्पाची कहाणी वाचतात.तसेच आहाराशी,भुकेशी,चवीशी, व्यंजनाशी संबंधित श्रावण ऋतूतील लिखाणाची सुरुवात या सर्वांच्या मुळाशी असलेल्या उदरस्थ अग्नीच्या छोट्या पण आवश्यक कहाणीने होणे हे क्रमप्राप्तच होय.त्या शिवाय उदरभरण यज्ञकर्माच्या लिखाणाचा शुभारंभ होणेच नाही. अशी हि साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपुर्णम!
खूप छान माहित दिली..Thanks