मनुष्याचे अंतरंग,मन हा एक अजब कॅलिडोस्कोप च आहे.विविध भावना रूप यांचे एक अजब रसायन च जणू!
तहान भूक ,स्वसंरक्षण,भीती,आक्रमकता ह्या संवेदना आणि त्या व्यक्त करणे या क्रिया प्रत्येक सजीवात म्हणजे प्राणी आणि मनुष्य प्राणी सगळ्यात दिसतात. परंतु मनुष्यप्राण्यात याखेरीज प्रेम,आश्वासन,अधिकार,राग,चीड, अपमान, विरोध,न्यूनगंड,आत्मविश्वास,किळस,दबाव,असुरक्षितता,अपराधीपणा हे आणि असे अनेक सहजभाव कमी अधिक प्रमाणात निर्माण होत असतात. हे मनातील भाव प्रकट होणे अथवा कृतीद्वारे व्यक्त केले जाणे खूप आवश्यक असते. त्यांचा वेळोवेळी निचरा झाला नाही तर हे भाव त्या त्या प्रसंगासकटच्या आठवणी आणि व्यक्तीची त्यावेळेची मानसिक स्थिती यासकट मनात साठवल्या जातात. यालाच भावनिक बंध किंवा इमोशनल ब्लॉक म्हणतात.
हे भावनिक बंध किंवा गुंता व्यक्ती ला ते ते प्रसंग अथवा त्या विशिष्ट परिरिस्थितीच बांधून ठेवतात ज्याचे परिणाम त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर, त्याबरोबरच शरीरावरहि दिसतात.वेगवेगळ्या प्रसंगाना व्यक्त होतांनाच्या प्रतिक्रिया आणि निर्णय हे बरेचदा त्या भावनिक बंधाच्या आधारे घेतले जातात. उदा.भीती, दबाव , न्यूनगंड या भावनिक बंधामुळे व्यक्ती हि बुजरी होत जाते आणि कुठलीही जबाबदारी घेण्यास हि व्यक्ती घाबरते. नवीन काम , नवीन नातेसंबंध,नवीन नोकरी यासारख्या जीवनातील बदलांना सामोरे जाणे टाळते अथवा त्यात अयशस्वी होते. आक्रमकपणा, दुसऱ्यावर हुकूमत गाजवणे हे हि कुठल्याश्या भावनिक बंधामुळे केलेले मनाचे बंड च असते बरेचदा. बराच काळ मनात ठिय्या देऊन बसलेले हे भावनिक बंध व्यक्ती मध्ये विविध वर्तन दोष निर्माण करतात ज्यामुळे वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जाणे, दुसऱ्याला शारीरिक अथवा मानसिक नुकसान पोचवणे ,क्वचित गुन्हेगारी कडे वळणे असे अधिकाधिक गंभीर परिणाम होत जातात.
हे असे भावनिक बंध वर्षानुवर्षे निचरा न होता राहिले आणि कृतीतूनही व्यक्त नाही झाले तर शरीरातील त्रिदोषांवर त्यांचा दुष्परिणाम दिसतो. मुख्यतः पित्त दोष ,वातदोष असंतुलन होऊन रक्तधातूवर परिणाम होतो. असंतुलित त्रिदोष हे आचार विचार नियंत्रण करणाऱ्या धी, धृती आणि स्मृती या तीन प्रकारच्या बुध्दीलाही विपरीत बनवतात .असे असंतुलित बुद्धी,मन आणि त्रिदोष शरीरात व्याधी निर्माण करावयास लागतात.
त्याचे कारण शरीर,मेंदू आणि मन यांचा असलेला परस्पर संबंध होय ,जो आपण मागील लेखात पहिला होता. काहीही कौटुंबिक इतिहास नसलेले , विशेष कारण न सापडणारे अनेक दम्याचे, त्वचारोग,ऍलर्जी,मायग्रिन(अर्धशिशी) व कोलायटिसचे रुग्ण असतात कि ज्यांच्या मध्ये असे एक अथवा अनेक भावनिक बंध आढळतात. अर्थात पहिल्या ३ ते ४ भेटीत रुग्णही काही सांगत नाही तसेच वैद्यालाही निदान करायला अवधी आणि संभाषण आवश्यक असते. परंतु योग्य ती मदत घेऊन रुग्णाच्या मनाची तपासणी केली असता मन बोलू लागते .समुदेशन,आयुर्वेदिक औषधी ,गरज पडल्यास मानसोपचारतज्ञाचा सल्ला, वर्तनचिकित्सा या सगळ्यांचा उत्तम परिणाम मनावर तसेच शारीरिक व्याधींवरही दिसून येतो.
रुग्णाला फक्त एक शरीर म्हणून न बघता अथांग मनाच्या हजारो लहरी लाटा लीलया पेलण्याचा प्रयत्न करणारी एक व्यक्ती म्हणून पहिले तरच वैद्याच्या चे कसब पणाला लागून योग्य निदान आणि अचूक चिकित्सा होऊ शकते.आपल्या भावना दाबून न ठेवता योग्य पद्धीतीने त्या व्यक्त करणे अथवा त्यांचा मनातून निचरा करणे हेही महत्वाचे होय . याविषयी अधिक पुढील लेखात पाहूच.
Thank you Dr