skip to content

‘ए .ए . ‘एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख 

‘ए ..ए ‘एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख

माझ्या ‘A’ for addiction: The Curtain Raiser!’या इंग्रजी ब्लॉग चा हा मराठी अनुवादित ब्लॉग होय.असे म्हणतात छंद हवा, व्यसन नको. आवड हवी नाद नको!खरेच व्यसन कुठलेही असो व्यसनी व्यक्तीच्या अगदी जवळच्या माणसाच्या  तोंडचे पाणी पुरवायला ते समर्थ असते.व्यसनात फक्त ती व्यसनी व्यक्ती नव्हे तर पूर्ण कुटुंब आणि जवळचे मित्र मंडळी हि भरडले जातात.अरेच्चा अचानक एकदम व्यसन या विषयावर लेख का?आहारावरील लेख  बंद केलेत कि काय ?हो हो  मला अनेक उंचावलेल्या भुवया आणि प्रश्नयुक्त चेहरे अपेक्षित होतेच.

जवळ जवळ दिड दोन  वर्षांपासून एक दोन जवळच्या मैत्रिणी आणि काही सुहृद वाचक अक्षरशः न कंटाळता ‘व्यसन विषयावर विस्तृत आणि सोप्या भाषेत लिहा’ असे सुचवत होते नव्हे दटावतच होते.परंतु मी यावर लिहायला योग्य व्यक्ती आहे कि नाही?या विषयाला न्याय देऊ शकीन, एव्हढे किमान मला व्यसनाबद्दल माहिती आहे कि नाही या संभ्रमात तो विषय कायम पुढे ढकलत राहिले.परंतु दवाखान्यात स्वतः हाताळलेल्या व्यसनजन्य मानसिक आणि अगदी उलट मानसिक व्याधीतून व्यसनाधीनता अशा ३ ते ४ केसेस ह्या माझ्या साठी आयओपनर ठरल्या. ह्या विषयावर सामान्य लोकांकरिता लिहण्याची तातडीची निकड अगदी खरोखरीच मलाही जाणवली.

नाही नाही मी व्यसनमुक्ती साठी औषधे वैगेरे अजिबात देत नाही .कृपया गैरसमज करून घेऊ नका. हे पेशंट्स कौन्सिलिंग आणि मानसिक व्याधींवर आयुर्वेदिक उपचाराकरता इतर डॉक्टरांनी रेफर केलेले होते.ऍडिक्शन बद्दल सर्व काही पुढील लेखमालेतून सरळ भाषेत आपल्यापर्यंत पोचवण्याचा मानस आहे.या विषयातील तद्न्य,तसेच अनुभवी,किंवा बघितलेल्या केसेस इत्यादी विषयी माहिती देऊन आपणंही लेखमालेत सामील होऊ शकता.

हा ब्लॉग किशोरवयीन तसेच किशोरवयीन,तरुण वर्गापर्यंत जास्तीत जास्त पोचावा अशी खूप कळकळ आहे.या लेखात ऍडिक्शन चा चेहरामोहरा पडताळूयात.

ऍडिक्शन(व्यसन) म्हणजे नक्की काय असते?एखाद्या पदार्थाविषयीची अथवा आचरण इत्यादींची  हानिकारक,सततची आणि न टाळता येणारी आणि सहजासहजी उपचाराशिवाय न सुटणारी सवय म्हणजे ऍडिक्शन होय.मराठीत व्यसन असा शब्द होय.बरेचदा व्यसन शब्द वाचला, ऐकलं कि दारू तंबाखू,सिगारेट,गुटखा असेच डोळ्यासमोर येते.परंतु दुर्दैवाने व्यसनाची व्याप्ती फारच मोठी आणि या गोष्टींच्या पलीकडे देखील भरपूर होय.

ऍडिक्शन बद्दल सर्व काही पुढील लेखमालेतून सरळ भाषेत आपल्यापर्यंत पोचवण्याचा मानस आहे.या विषयातील तद्न्य,तसेच अनुभवी,किंवा बघितलेल्या केसेस इत्यादी विषयी माहिती देऊन आपणंही लेखमालेत सामील होऊ शकता.हा ब्लॉग किशोरवयीन तसेच तरुण वर्गापर्यंत जास्तीत पोचावा अशी खूप कळकळ आहे.मग अजून कुठल्या प्रकारची व्यसने असू शकतात?व्यसनाला कुठला अमली पदार्थ लागतोच असे नव्हे. बरीच व्यसने हि अमली पदार्थाशिवायही लागू शकतात

व्यसनाचे काही प्रकार:

१.अमली पदार्थांचे व्यसन (दारू,तंबाखू,गुटखा,ड्रग्स,गांजा चरस इत्यादी आणि बरेच काही)

२. जुगार

३.इंटरनेट चे व्यसन

४.गेमिंग (विडिओ गेम चे व्यसन)

५. अन्नाचे व्यसन (फूड ऍडिक्शन )

६. सेक्स ऍडिक्शन

७. शॉपिंग (सतत खरेदीचे )व्यसन

८.पॉर्न ऍडिक्शन

९. लव्ह ऍडिक्शन

१०.आर्ट (कलेचे )व्यसन

११. व्यायाम व्यसन

अक्षरशः चकरावून टाकतील असे काही प्रकार आहेत नाही.छे हे व्यसने कसे असू शकतील असाही प्रश्न पडणे साहजिक होय.अर्थातच अशा गोष्टींची व्यसने देखील कशी घटक असतात ते सविस्तर एका एका लेखात बघूच.

व्यसनाबद्दलचे मिथके (गैरसमज)

समाजात व्यसनाबद्दल अज्ञान तर आहेच परंतु गैरसमजही तेवढेच किंबहुना अधिकच अडचणीचे ठरतात.काही सामान्य गैरसमज नमूद करीत आहे

.१.हवे तेंव्हा व्यसन सोडता येते.हा अतिशय मोठा गैरसमज होय.व्यसन शब्दच सांगतो कि सहजासहजी न सोडता येणारी घातक  सवय म्हणजे व्यसन होय.

२. व्यसनी व्यक्ती गुन्हेगार,चारित्र्यहीन,किंवा अनैतिक कृत्ये करणारी असतात किंवा अशाच व्यक्तीस व्यसन लागते. हाही एक मोठा गैरसमज होय.लिंग,वय,धर्म.जात,देश,आर्थिक,शैक्षणिक,व्यावसायिक,कौटुंबिक किंवा इतर कुठलीही पार्श्वभूमी व्यसन असण्याला किंवा नसण्याला जबाबदार ठरू शकत नाही.व्यसन हे वरीलपैकी कुठ्ल्याहि  प्रकारच्या व्यक्तीस केंव्हाही लागू शकते.परंतु जर वेळीच व्यसनाला आळा घातला नाही तर दुर्दैवाने व्यसनापायी गुन्हे,चारित्र्यहनन इत्यादी होण्याचा धोका वाढतो.

३.दिसण्यावरून वागण्यावरून हा/हि  व्यसनी असे ओळखता येते.अजिबात नाही. उलट व्यक्तीचे बाह्यरूप हे बरेचदा फसवे ठरते आणि व्यसनी व्यक्ती ओळखता येत नाही.अगदी सोज्वळ वाटणारे,उत्तम कपडे घालणारे नीटनेटके राहणारे व्यक्ती देखील व्यसनाधीन असू शकतात.आणि याच्या उलट देखील खरे होय.त्यामुळे बाह्यरुपावरून व्यसनाची कल्पना येत नाही हे सत्य होय.

४. व्यसनी लोक बेकार ,बेरोजगार रिकामटेकडे असतात.अगदी चूक !अगदी उत्तम पदावर असणारे नोकरी करणारे आणि अतिशय मानाच्या आदराच्या व्यवसायातील व्यक्ती देखील व्यसनाला बळी पडू शकतात नव्हे  पडलेल्या दिसतात.

५.कुटुंब आणि मित्रमैत्रिणी व्यसन सोडवण्यास काहीच मदत करू शकत नाही.हा अतिशय धोकादायक गैरसमज होय.उलट मित्र मैत्रिणी कुटुंब यांच्या सकारात्मक अथवा नकारात्मक वागण्यावर व्यसनी माणसाचे व्यसन सुटू शकणे अथवा परिस्थिती गंभीर होणे हे दोन्हीही अवलंबून असते.यांची मदत सर्वस्वी महत्वाची होय.

६.जर रिलॅप्स झाला,म्हणजे व्यसन  सोडून परत सुरु केले तर असा मनुष्य कधीच व्यसन सोडू शकत नाही. हा गैरसमज होय.व्यसन सोडताना एक अथवा अधिक वेळा अपयश येणे बरेचदा स्वाभाविक आहे.याचा अर्थ प्रयत्न करणे सोडावे असे मुळीच नाही.उलट सकारात्मकतेने अशा व्यक्तीस व्यसन सोडण्यास परत प्रवूत्त करावे.

७.व्यसन हा रोग होय.रोगाप्रमाणे याची चिकित्सा करावी लागत असली तरी व्यसन म्हणजे रोग अशी पळवाट सांगणे योग्य नव्हे असे मला वाटते.चुकलेले निर्णय,मनाच्या कमकुवत परिस्थितीत घेतलेला व्यसनाचा आधार, तसेच संगत आणि इतर बरेच वर्तन संबंधित कारणे व्यसनाधीनतेची देता येतील.मात्र व्यसन सोडवताना योग्य प्रकारे चिकित्सेसारखीच उपाययोजना करावी लागते.आणि व्यसनामुळे मात्र इतर बऱ्याच शारीरिक आणि मानसिक रोग, व्याधी निश्चित जडतात.

८. आणि सगळ्यात घातक आणि सर्वसामान्य गैरसमज म्हणजे छे आपल्या सारख्याना ,माझ्या /आपल्या मुलांना अशा सवयी लागणे शक्यच नाही! असा असलेला निरागस भोळा फसवा विश्वास.अशा चुकीच्या अवाजवी विश्वासामुळे व्यसनी व्यक्ती ओळखण्यास अजून उशीर होतो.माझ्या घरात माझ्या नात्यात एखादी व्यक्ती असू शकते हे पचवणेच मुळी अवघड जाते.मान्य केल्यावर बरेचदा खूप उशीर झालेला असतो.

लक्षात असू द्या व्यसनाचा (कुठल्याही प्रकारच्या व्यसनाचा )धोका अगदी माझ्या ,तुमच्या, आपल्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे.अज्ञानात सुख असे टाळा.कोंबडा झाकला तरी सूर्य उगवणार. तेंव्हा जाणून घ्या आणि सजग राहा.ह्या लेखात व्यसनाविषयीची हि सामान्य माहिती पुरेशी होय.

पुढील लेखात विविध व्यसनांविषयी खोलात जाणून घेऊन. लेख जरूर जास्तीत जास्त पुढे पाठवा.विद्यार्थी आणि तरुण वर्गापर्यंत लेख जास्तीत जास्त पोचला तर अर्थातच लिखाण सार्थकी लागेल.आपला फीडबॅक,मत माझ्यापर्यंत जरूर पोचवा.

Share this :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart