बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया !

बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया !

राष्ट्रीय पोषण सप्ताह
लेख ३.

बाळाचा जन्म झाल्यावर नाळेद्वारे मिळणारे पोषण पुढे आईच्या स्तन्यातून मिळते. स्तन्य निर्मिती हि नैसर्गिक क्रिया असली तरी मातेचा आहार, जीवनशैली तिची शारीरिक आणि मानसिक काळजी या गोष्टी स्तन्य निर्मिती वाढविण्यास उपकारक ठरतात.आजच्या लेखात थोड्यक्यात मातेचा आहार ,विहार कसा असावा ते बघू.
सूतिकापरिचर्या म्हणजे बाळंत बाई ची घेतली जाणारी विशेष काळजी हा अत्यंत महत्वाचा विषय आयुर्वेदात खूप विस्तृतपणे आला आहे.विद्यार्थी दशेत आयुर्वेदिक हॉस्पिटल्स मधून सूतिकापरिचर्या उत्तमपणे जवळून बघितलीही आहे.त्यामुळे त्याचे महत्व आणि उपयोग हे कायमचे मनावर ठसले गेले.
बाळंतपणात स्त्रीचे शरीर अतिशय पीडेतून जाते. प्रचंड थकवा आणि एकंदर प्रतिकारशक्ती खूप कमी झालेली असते.अशा नाजूक स्त्रीची विशेष काळजी हि ओघाने आलीच.
नैसर्गिक बाळंतपणानंतर(सीझर नव्हे) सुरुवातीचे २ दिवस बाळंतिणीला तांदूळ किंवा मूग यांचे पातळ कढण भरपूर तूप आणि सुंठ,मिरे पिंपळी ,अगदी कमी सैंधव टाकून ती गरम गरम पिण्यास द्यावी. हल्ली दवाखान्यात, \”सगळे खायला द्या हो उपासमार करू नका\” असे म्हणून अगदी पहिल्याच दिवशी कोरडे पोहे ,उपमा इडली असा नाश्ता कॅन्टीन मधून येतो. तो सरळ नातेवाईकांनी खाऊन टाकावा. पचनशक्ती कमी झालेल्या बाळंतिणीस सुरुवातीला पचायला हलके, पातळ आणि गरम गरम ताजे पदार्थ द्यावे.
सुरुवातीचे तीन दिवस पंचकोळ चूर्ण (पिंपळी ,पिंपळी मूळ, चवक,चित्रक आणि सुंठ) गुळाबरोबर छोट्या गोळ्या करून दिवसातून दोनदा द्यावे याने गर्भाशय आकुंचन होण्यास मदत होते.गर्भाशयातील रक्ताच्या गाठी योनीद्वारे पडून जाण्यास सुकर जाते.हीखूप महत्वाची गोष्ट होय.
सुंठ हा बाळंतिणीच्या आहारात मस्ट असा पदार्थ आहे म्हंटल्यास वावगे ठरू नये.वात कमी करणे ,फाजील पित्त कफ वाढू न देणे,पचनशक्ती वाढवणे, वेदनानाशक, कृमिघ्न, ज्वरनाशक, स्तन्यदोष दूर करणारा पदार्थ होय. सुंठ गरम पाणी , सुंठ+तूप+खडीसाखर असे बाळंतिणीच्या खाण्यात असणे उत्तम.
गुळ +तूप+हळद यांच्या गोळ्या देखील गर्भाशय शुद्धी आणि किरकोळ इन्फेकशन्स वर उत्तम परिणाम करतात.

३ ऱ्या दिवसापासून पचनशक्तीचा अंदाज घेऊन मऊ भात ,मुगाचे कढण, भाकरी, लसणाची चटणी, सैंधव आणि पिंपळमूळ घातलेले ताक द्यावे. वरण भाज्या याना साजूक तूप,हिंग, शहाजिरे यांची फोडणी द्यावी.
पाचवी पूजनाचा दिवशीचा बाळंतिणीचा बाजरी भाकरी,पातळ मेथीची भाजी, लसूण खोबरे चटणी, कढी हा आहार देखील किती आदर्श होय. आज मेथीचा गॅलॅक्टोगॉग म्हणजे स्तन्य निर्मिती करणारी म्हणून जगभर उदो उदो होतो आहे. तोच पारंपरिक आहारातून उत्तम पद्धतीने मिळतो. बाजरी देखील स्तन्यनिर्मिती आणि वाढीस उपयुक्त होय.
बारीक कुस्करलेल्या भाकरीत पातळ मेथीची भाजी/पातळ गिलक्याची(घोसाळे) भाजी, मूग मसूर वरण आणि भरपूर तूप असे नियमित द्यावे.
खमंग तुपावर भाजलेल्या बाजरी पिठाचा गुळ,जायफळ ,तूप घालून गोड घाटा (घट्ट खीर) किंवा तिखट मिठाचा घाटा नाश्त्यात अथवा सायंकाळच्या खाण्यात असावा.असेच नागली पिठापासून देखील घाटा/खीर/उकड देता येते.

डिंक, खारीक,खोबरे,मेथ्या,काजू ,बदाम,गोडंबी,शतावरी,सुंठ,अश्वगंधा टाकून केलेले भरपूर साजूक तूप आणि गुळाचे लाडू बाळंतिणीस अवश्य द्यावे.कॅलसियम,लोह,आणि इतर पोषणमूल्यांचीही उत्तम काळजी घेतली जाते.
हळीव देखील स्तन्यजनन करणारे उत्कृष्ट द्रव्य म्हणून आज स्वीकारले गेलेय.ओल्या नारळाचे हळिवाचे लाडू हे स्तन्य वाढवतात.याखेरीज शतावरी कल्प आणि सुंठ घालून गरम दूध देखील बाळंतिणीस द्यावे.
खसखस हे देखील आहारात समाविष्ट करावे.भाज्यांमध्ये खसखशीची पूड अथवा खसखशीची पातळ तिखटमीठ घालून केलेली पेज अथवा सार,किंवा खसखस खोबऱ्याची खीर असे पदार्थ आवर्जून द्यावे.

भरपूर तुपातील रवाळ कणकेचा शिरा तर बाळंतपणातील पर्वणीच असते.मधून मधून तो देखील आवर्जून द्यावा. मांसाहारी बाळंतिणींमध्ये विड्याचे पान,जिरे,मिरे,लवंग,दालचिनी घालून उकळवलेले मांसाहारी सूप अवश्य द्यावे.
हे सगळे खाऊन बाळंतिणीस अपचन, मलबद्धता याचा त्रास होऊ नये म्हणून ओवा,शेप,शहाजिरे सैंधव घातलेली मुखशुद्धीची बडीशेप जरूर द्यावी.तसेच पिण्याचे पाणी देखील कायम कोमट अथवा गरम च असावे.
स्वतःच्या पचनशक्तीचा,भुकेचा विचार करून आहाराची मात्र ठरवावी. केवळ भरपूर खाल्ले पाहिजे म्हणून अतिप्रमाणात चुकीच्या पद्धतीने खाणे जेवढे चूक तेवढेच फिगर,कॅलरी,साखर यांचा नको तेवढा विचार करून वरील उत्तम पोषणास मुकणे हेही नकोच.
आहारातील शंका योग्य त्या व्यक्तीकडून समजावून घ्या व सकारात्मक बदल देखील घडवा.
अशा आहारापासून बनणारे स्तन्य देखील उत्तम गुणांचे बनते.जसे खाल तसे निपजेल असे उगाच नाही म्हणत.
बाळंतिणीने शिळे,कोरडे,अतिशय गार,खूप मसालेदार,तिखट, वातूळ पदार्थ खाणे टाळावे.जेवणाच्या वेळा नियमित पाळाव्या .पोट साफ राहील यावर विशेष लक्ष द्यावे. शक्यतो हॉटेल मधले,बाहेरचे पदार्थ टाळावे.
जंक फूड फास्ट फूड पासून पूर्ण पणे दूर पळावे. ह्या काळात मद्यपान आणि धूम्रपान पूर्ण वर्ज्य करावे. गोड खव्याच्या मिठाया व इतर पचायला जड मिष्टांन अगदी कमी खावे अथवा खाणे टाळावे.
पाणी भरपूर प्यावे.
आहाराखेरीज बाळंतिणीचा तेल लावून मसाज,धूप ,शेक यागोष्टी देखील शारीरिक मानसिक श्रम कमी करून स्तन्यनिर्मितीस चालना देतात.त्या अवश्य कराव्यात.
बाळाला हव्या त्या पोषणाचा स्रोत असलेल्या स्तन्याची आहाराद्वारे अशी काळजी घेणे खरेतर खूप सोपे आहे. दुर्दैवाने पारंपरिक बाळंतपणातले पथ्य हा विषय दुर्लक्षिला जातो, त्याचा उपहास केला जातो परंतु ह्याच पथ्य पदार्थांवर आज संशोधन होऊन ह्यातील च मेथ्या,शतावरी ,हळीव सारखे पदरात आज गॅलॅक्टोगॉग नावाखाली करोडो चे मार्केट जगभरात कॅप्टचर करताय.तेंव्हा ते दूध कमी येते म्हणून औषधी पावडर च्या स्वरूपात घायचे कि आहारातून उत्तम चवीच्या स्वरूपात हे सद्सद्विवेक बुद्धी वापरून ठरवावे.
उद्याच्या लेखात स्तन्यदुष्टी आणि त्यामुळे होणारे बाळाचे आजार आणि उपाय याबाबत वाचू.
उद्याचा लेख देखील नक्की वाचा.

Share this :

6 thoughts on “बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया !”

  1. Pingback: बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया ! – SwamiAyurved

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart