”मैनू शॉपिंग करांदे …”
दर पंधरा दिवसांनी रविवारी एक ब्लॉग ह्या सिरीज मध्ये आपण सद्या वेगवगेळ्या व्यसनांबद्दल जाणून घेत आहोत.माझा मागील ब्लॉग ‘सेल,शॉप स्वाईप’ हा खरेदीचे व्यसन ह्या खूप वेगळ्या आणि आवश्यक विषयावर होता.त्याच ब्लॉग चे मराठी भाषांतर आज देत आहे.मूळ इंग्रजी ब्लॉग देखील वर्डप्रेस वर अवश्य वाचा.
“मनुष्य गर्दीने फुलून जाणारे विविध मॉल, दुकाने, खरेदी साठी प्रसिद्ध रस्ते, घरून व्यवसाय चालवणाऱ्या महिलांकडून महिलांसाठीच्या वस्तू कपडे दागिन्यांची होणारी प्रचंड उलाढाल आणि अजब फोफावलेले महाकाय ऑनलाईन इंटरनेट खरेदी विक्री चे मार्केट हे पदोपदी पुरावा देताय कि बाबारे, माणसा ,तुझ्या मध्ये नवीन च जनुक विकसित झालेत बरे का! खरेदी चे वेड असलेले जनुके! डार्विन काकाही चक्रावतील ह्या जनुकांचा कार्यकारण भाव लावताना इतके खरेदीची मोहमाया आज जगाला व्यापून उरलीये.
जगणे म्हणजे खरेदी,आनंद म्हणजे खरेदी ,सुट्टी म्हणजे खरेदी,सणवार म्हणजे खरेदी,प्रेम म्हणजे शॉपिंग,डेटिंग म्हणजे शॉपिंग,वाढदिवस म्हणजे शॉपिंग,अहो इथे मृत्यूच्या तयारीची हि लोक शॉपिंग करतात. अरे एक चांगला नवीन पांढरा कुर्ता हवा होता असे कुणाच्या मृत्यूनंतर आप्तेष्टाना भेटायला जाताना मनात विचार आला तर वावगं न वाटण्याइतपत आपण आज पुढे गेलोत.
खरेतर आज ‘गरज आहे म्हणून खरेदी’ असे समीकरण न राहता खरेदी हीच मनुष्याची एक गरज बनून राहिलीये.
नको तितक्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू कपडेलत्ते, व्यावसायिक स्पर्धेतून केल्या जाणाऱ्या आकर्षक जाहिराती,दिल्या जाणाऱ्या भव्य सवलती आणि मुख्य म्हणजे समाजाची ,आपली खर्च करण्याची मानसिकता आणि ऐपत ह्या सर्वातून आज जगणे म्हणजे शॉपिंग मौज मस्ती असा साचा झालाय.
आणि असे काही होतेय झालेय हे लक्षातही न येणे किंवा यात काही वावगे आहे असे न वाटणे हि खरी चिंतेची बाब होय.
खरेदीचे व्यसन आपला खरे जीवन जगण्याचा आनंद कसा हिरावून घेतोय हेही आपल्या गावी नाही. आणि सगळ्यात महत्वाचे याही पुढे जाऊन पुढची पिढी हे सगळे कसे स्वीकारेल आणि ह्या सर्वांचा त्यांच्या मानसिकतेवर आणि एकंदरीतच आयुष्याच्या गुणवत्तेवर काय परिणाम होईल हि अजूनच भयानक काळ्जीप्रद बाब होय.
खरेदी चे व्यसन ? काहीतरी काय ?असे कुठे असते का? आणि असली एखादि एखाद्याची ऐपत तर करू देत ना खरेदी काय बिघडले?
चला बघूया खरेदी चे व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम.
सर्वप्रथम एखादीला /एखाद्याला /स्वतःला हे व्यसन जडलेय हे कसे ओळखावे?
गरज नसलेल्या वस्तू केवळ आपल्याकडे हव्या किंवा केवळ आवडल्या म्हणून आपण वारंवार घेता का?
खरेदी करताना केल्यावर प्रचंड प्रमाणात उत्साह आणि निव्वळ त्या खरेदी मुळे मनात आनंदाची लहर, असे होते का?
नाराज असताना, मूड नसताना किंवा टेन्शन मध्ये असताना शॉपिंग करावीशी वाटणे अथवा खरेदी केली जाणे आणि त्यानंतर बरे वाटणे असे आपल्याबाबतीत होते का?
केवळ सेल आहे, वस्तू स्वस्त आहेत किंवा कधी कधी अक्षरशः उगाचच खरेदी केले जाणे असे आपल्या बाबतीत वारंवार होते
परवडत नसताना पैसे नसताना क्रेडिट किंवा उधारी करून आपण खरेदी करता का?
खरेदी केल्यांनतर काही काळानंतर अपराधीपणाची भावना येणे परंतु कालांतराने परत खरेदीची तीव्र इच्छा होते
खरेदी बद्दल घरात किंवा मित्र मैत्रिणींमध्ये लपवणे अथवा खोटे बोलणे.
भविष्यात खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी आधीच तयार असणे आणि त्याबाबत सतत विचार करणे आणि अस्वस्थ होणे.
ऑनलाईन शॉपिंग साईट्स वर खूप वेळ घालवणे आणि सतत वस्तू(फारश्या आवश्यक नसणाऱ्या) मागवणे.
खरेदीमुळे खर्चाचा ताळमेळ खूप बिघडणे.
वरील पैकी ३ किंवा जास्त लक्षणे वारंवार आपल्या बाबतीत होत असतील तर होय आपणास खरेदीचे व्यसन आहे. कमी प्रमाणात असेल तर गंभीरतेकडे कधीही जाऊ शकते.
ह्या व्यसनाचे पण प्रकार असतात ?अरे बापरे !
होय खरेदीचे व्यसन असणाऱ्या वेगवगेळ्या प्रकारच्या व्यक्ती बघुयात.
‘कंम्पल्सिव्ह शॉपोहोलिक’ म्हणजे सततच्या खरेदीतून भावनिक स्थैर्य मिळवणाऱ्या व्यक्ती होय.त्या शिवाय त्यांना चैन पडत नाही.
‘ट्रॉफी शॉपोहोलिक्स’ व्यक्ती ह्या परफेक्ट,महागड्या वस्तू खरेदी करून ट्रॉफी सारख्या त्या मिरवण्यात सौख्य मानतात.स्वतःला बक्षीस म्हणून खरेदी करणारेही ह्याच वर्गात मोडतात.
‘बार्गेन सीकर ‘ म्हणजे वस्तूंच्या भावात घासाघीस करून कमी किमतीत मिळ्वण्यापायी व्यर्थ खरेदीच्या आहारी जाणाऱ्या व्यक्ती होत.
‘बुलिम्रिक शॉपर’ म्हणजे खरेदी केलेली वस्तू परत करून त्या बदल्यात अजून खरेदी असे कायम सतत करणाऱ्या व्यक्ती होत.
‘कलेक्टर शॉपोहोलिक’ व्यक्ती म्हणजे वेगवगेळ्या रंगाच्या मॅचिंग,किंवा एकाच प्रकारातील सर्व नमुने अशा तर्हेने वस्तूंचा संग्रह करणारे म्हणजे कलेक्टर शॉपर होत.
ह्या व्यसनाने खरेच नुकसान होत असेल का? होते तर काय स्वरूपाचे?
सततच्या खरेदीने आर्थिक नुकसान हे तर क्रमप्राप्त होयच. त्याखेरीज कर्जबाजारीपणा उधार उसनवाऱ्या,खोटेपणा आणि त्या पायी नको त्या अजून वाईट गोष्टी केल्या जातात.
भावनिक समाधानाकरिता केलेली खरेदी त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन ,भावनिक उलाढाल अजून तीव्र करू शकते आणि हे व्यसन अजूनच बळावते.
ह्या सर्वातून अपराधीपणाची भावना बळावून व्यक्ती इतर भावनिक असंतुलनाला बळी पडण्याचा धोका वाढतो.खरेदी आणि नातेसंबंध हाही नाजूक संबंध होय.खरेदीच्या प्रेमापोटी आणि अवास्तव अपेक्षांपायी नातेसंबंध तुटू शकतात अथवा ताणतणाव निर्माण होऊ शकतो.
सतत खरेदीच्या विचारांमुळे वेळ, गरजेच्या गोष्टी ,काम यांचा ताळमेळ बसवण्यात अशा व्यक्ती अपयशी ठरतात.विनाकारणाच्या वस्तुसंचयापायी पर्यावरणाचे अपरिमित नुकसानही आपण करत असतो.भरभरून वाहणारी घरातील कपाटे आपल्या अंतरंगाचा एक विद्रुप आरसाच जणू दाखवतात.
खरेदीचे व्यसन कसे हाताळावे?
सर्वप्रथम असे व्यसन असते, मला लागू शकते आहे हे मान्य करणे हि एक पहिली आणि सर्वात मोठी पायरी आहे.ती चढली कि बऱ्याच गोष्टी आटोक्यात येऊ शकतात .परदेशात तर ‘शॉपिंग डीऍडिक्शन’ असे स्वतंत्र काउंसिलिंग सेन्टर कार्यरत आहेत.अति तीव्र स्वरूपात व्यसन लागलेल्या काही जणांना औषधी उपचार आवश्यक ठरतात.
मित्र, घरातील व्यक्ती यांची खंबीर भूमिका आणि आधार महतवाचा ठरतो.
योग्य व्यक्तीकडून समुपदेशन आणि वर्तन संबंधी उपचार पद्धतींचा खूप उपयोग अशा प्रकारच्या व्यसनांमध्ये होताना दिसतो.
सगळ्यात महत्वाचे असे व्यसन असलेल्या व्यक्तीने सत्याचा स्वीकार करून त्यावर उपायजोना करणे आवश्यक आहे.
समाजातील किंबहुना तुमच्या आमच्यातील अशा अनेक व्यसनांविषयी पुढील लेख मालेत अधिक माहिती घेऊच.
व्यसनांबाबतचे आधीचे लेख माझ्या वर्डप्रेस साईट वर जरूर वाचा
ह्या लेखमालेतील लेखांमुळे कुणा एका व्यक्तीस अल्प फायदा देखील झाला तरी लिखाणाचा उद्देष सफल होईल.
लेखिका: वैद्य रुपाली पानसे,
आद्यं आयुर्वेद पुणे,
drrupalipanse.wordpress.com,
rupali.panse@gmail.com,
962344898
(लेख लेखिकेच्या नावं व माहितीसह तसेच मूळ लेखात बदल न करता शेअर अथवा पोस्ट करावा. आपल्या या कृतीने लिखाणासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागेल.)