skip to content

Tasty tales !

चवीचे सहा रस
आहारीय विज्ञान या क्षेत्रातील अतिशय मूलभूत आणि अद्वितीय सिद्धांतांपैकी आयुर्वेदातील एक सिद्धांत म्हणजे षड्रस म्हणजेच \’सहा चवी\’ होत.
जशी रसायन आणि भौतिक शास्त्रात केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीस वर ती शाखा सर्वस्वी अवलंबून असते अगदी तसेच आहारीय आणि औषधी पदार्थांची कार्मुकता म्हणजे शरीरावरील कार्य हे सहा रस किंवा चवी ठरवत असतात.

प्रत्येक पदार्थ हे पंचमहाभूतांच्या कॉम्बिनेशन पासून बनलेले संयुग असते. पृथी ,जल,वायू, अग्नी आणि अवकाश (स्पेस) यांच्या वेगवेगळ्या बंधनांमुळे(बॉण्ड्स) मुळे त्या पदार्थांचे तरल,घन(सॉलिड,लिक्विड) इत्यादी भौतिक स्वरूप हि ठरत असते.सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तरल म्हणजे पातळ पदार्थांमध्ये जल महाभूत अधिक असते.जसे रसदार फळे.सच्छिद्र पदार्थ जसे प्रवाळ,त्यात अवकाश किंवा स्पेस म्हणजे आकाश महाभूताचे अधिक्य अधिक असते.
भौतिक रचनेप्रमाणे प्रत्येक पदार्थाला त्याच्यातील पंचमहाभूतांच्या न्यूनाधिक्यामुळे एक प्रधान किंवा मुख्य चव हि मिळते याच चवीला आयुर्वेदात \’रस\’असे म्हणतात.
फळाचा रस किंवा \”आमच्या ह्यांना बाई मुळी कशातच रस नाही \” किंवा \’शृंगार,बीभत्स,वीर इत्यादी अभिनयाचे नऊ रस या पेक्षा हा रस वेगळा होय.
रसना म्हणजे जीभ आणि त्या रसनेला तात्काळ होणारी त्या पदार्थाची अनुभूती म्हणजे रस अथवा त्या पदार्थाची चव होय.
पृथीवरील प्रत्येक वनस्पतिज,प्राणिज,खनिज पदार्थाला असे रस प्राप्त झालेले असतात.
एक किंवा अधिक महाभूतांच्या त्या पदार्थातील कमी अधिक असण्यामुळे एकूण सहा रस असतात. एक पदार्थामध्ये एकापेक्षा जास्त चवी अथवा रस हि असतात.परंतु कुठल्यातरी एक चवीचे आधक्य आणि कार्य प्रकर्षाने होत असते.

मधुर(गोड़),आम्ल(आंबट), लवण (खारट) कटू(तिखट),तिक्त(कडू) आणि कषाय(तुरट) हे ते सहा रस होत.
या वेगवगेळ्या चवी त्या पदार्थांच्या गुणधर्मास कशा कारणीभूत असतात आणि पदार्थातील चवीमुळे त्यांचा शरीरावर काय परिणाम होतो ते सोप्या भाषेत बघू.प्रत्येक रस अतिप्रमाणात खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामही बघू.

आहारात सर्व चवींचा समावेश असावा. कुठलाही एक प्रकारचा रस सातत्याने तोच तोच किंवा कुठला एखादा रस अतिशय कमी प्रमाणात शरीराला मिळाला तर आरोग्य बेचव होण्याची शक्यता असते.अगदी व्हिटॅमिन कमतरता अशीच हि कन्सेप्ट होय.

१.मधुर रस (गोड़ चव):
इथे मधुर रस म्हणजे गोड़ चव म्हणजे गोड पदार्थ मिठाया असे नक्कीच नाही. जल आणि पृथी महाभूतांच्या कॉम्बिनेशन मुळे हि चव बनते.खाल्ल्या खाल्ल्या एक एक प्रसन्न भावना ,तोंडाला आतून लेप दिल्यासारखी भावना आणि मनास आनंद ,मधुर चवीमुळे तात्काळ मिळतो.

या रसाचे किंवा चवीचे शरीरात कार्य होते. म्हणजे मधुर रसाचे पदार्थ खाल्ले असता ते शरीरात नक्की काय करते?
मधुर चव अगदी लहानपणापासून सात्म्य असते.
शरीराचे पोषण वाढ करणे,सप्तधातूंची वाढ मधुर रसामुळे होते.
पित्ताचे शमन करणारी हि चव आहे.
केस ,अस्थी,त्वचेकरता उत्तम रस होय.
तृष्णा ,जळजळ कमी करण्याचा गुण मधुर चवीला लाभलाय.
संधान म्हणजे शरीरातले कुठलेही हीलिंग होण्यास मधुर चव मदत करते.
नाक.तोंड,ओठ,गळा इत्यादींच्या आतील आवारणास मऊ ठेवणे ,निरोगी ठेवण्यास मदत.

हाच रस अतिप्रमाणात खाल्ल्या गेल्यास मात्र शरीरात त्रासही उत्पन्न करू शकतो.
उदा.
सतत फक्त गोड़ चवीचे पदार्थच खात राहिल्यास शरीराचे फाजील वजन वाढणे, अग्नी मंद होणे,अंग जड वाटणे, अतिनाजुकपणा ,आळस,अवास्तव झोप येणे असे लक्षणे दिसतात. सतत सर्दी खोकला, घशातील गाठी(टॉन्सिल) चा त्रासही होताना दिसतो. अति गोड़ रसाने धमनींचे म्हणजे रक्तवाहिन्यांचे रोग होऊ शकतात असाही स्पष्ट उल्लेख होय.

मधुर रसाचे काही पदार्थ :गायीचे दूध, तूप, खडीसाखर, ऊस ,मध, ज्येष्ठमध, मुगाची डाळ,आंबा,डाळिंब, मनुका, गहू, साठे साळीचे तांदूळ,लोणी, उडीद,चणा डाळ,मसूर,भोपळा ,ओले नारळ,अंजीर,मांसवर्गात बोकड तसेच म्ह्णशीचे मांस मधुर रस प्रधान असते.मासे देखील मधुर रसाचे असतात.

२. आम्ल रस (आंबट चव):
पृथ्वी अग्नी आणि अल्प प्रमाणात जल असे कॉम्बिनेशन ने आंबट चवीची उत्पत्ती पदार्थात होते.
खाल्ल्या खाल्ल्या जिभेवर बाकी कुठल्या चवीचे ज्ञान होत नाही, लाळ सुटणे, हिरड्या तसेच दातांवर शिरशिरी येणे हि आंबट चवीची म्हणजेच आम्ल रसाची ओळख होय.
आंबट रस भोजनामध्ये रुची उत्पन्न करतो, चवीला वाढवतो,शरीर बल हि वाढवतो.
तोंडामध्ये लालास्राव करवून आणतो .
भोजनाला पचनासाठी आवश्यक असणारा ओलावा आंबट रसामुळे वाढतो.
जठराग्नी प्रदीप्त होतो.
मन आणि इंद्रियांना आंबट रसाने तजेला येतो.
हृदयाला बल देतो, वाताला अनुलोम म्हणजे मोठ्या आतड्यातून नैसर्गिक रित्या बाहेर काढण्यास मदत करतो.

आम्ल रस अधिक किंवा अवास्तव प्रमाणात खाण्यात आल्यास सर्व इंद्रिय अतिसंवेदशील होतात.
घशामध्ये शोष, अवयांमध्ये अति ओलसरपणा ,प्रमाणापेक्षा अधिक स्त्राव घडवून आणला जातो.
तृष्णा वाढवतो,
पित्ताला वाढवतो आणि रक्त दूषित करतो.
अग्नी गुण असल्यामुळे सर्व प्रकारच्या जखमा आम्ल रस पिकवतो.
संधी बंध शिथिल होतात.
मांसपेशीत दाह होतो.
कंठ छाती आणि हृदयात अस्वस्थपणा अति आंबट रसाने निर्माण होते.

आंबट चवीच्या पदार्थांची काही उदाहरणे:
ताक,दही,आंबाडी,आंबटचुका,चिंच,आमसूल,कैरी व इतर सर्व आंबट फळे.
सर्व प्रकारचे मद्य प्रायह: आम्ल चवीचे असतात..

३.लवण रस (खारट चव):
अग्नी जल आकाश प्रधान महाभूतांपासून हा रस बनतो.
खाल्यावर लगेच तोंडात लाळ निर्माण होते, तसेच गळ्यात आणि टाळूला किंचित दाह होतो ज्यामुळे होतो तो लवण रस म्हणजे खारट चव होय.
या रसाशिवाय आहाराची कल्पना हि करवत नाही.
भोजनामध्ये रुची उत्पन्न करणारा, लालास्राव निर्माण करवून खाल्लेल्या अन्नाचे पचनाकरिता नीट विघटन करणारा हा रस होय.
जठराग्नी ला प्रदीप्त करवून वाताला बाहेर काढतो
बद्ध मलास (शौचास ) मोकळे करणारा असाही एक गुण लवण रसाचा होय.
जिथे जिथे अवरोध अडथळे आहे तिथले संघात दूर करणे हा एक महत्वाचा गुण लवण रसाचा होय.

अतिप्रमाणात किंवा सारखे सारखे फक्त खारट चवीचे सेवन केले असता पित्त आणि रक्ताची दुष्टी होते
अतिप्रमाणात तहान लागणे,दाह होणे हि लक्षणे दिसू शकतात.
त्वचेवर भेगा पडणे ,त्वचा कोमल न राहणे असे लक्षणे दिसून येतात.
अकाली केस पांढरे होणे,गळणे,त्वचेवर सुरकुत्या हि लक्षणे कमी वयात हि दिसू शकतात.
आम्लपित्त वाढवते,विशीष्ट अवयवास सूज येणे, जखमा चिघळणे हे अति खारट पदार्थांचे सेवन कायम केल्यास होताना दिसते.
पुंस्त्व कमी होते. पुरुषबीजावर परिणाम होतो.

लवण रसाच्या पदार्थांचे उदाहरण: सैंधव,काळे मीठ,समुद्री मीठ, उंटिणीचे दूध,

४.कटू रस (तिखट चव):
येथे परत तिखट म्हणजे चमचमीत, मसालेदार पदार्थ नव्हे तर तिखट हि पदार्थाची अंगभूत प्रधान चव म्हणून घ्यावी.
जिभेला स्पर्श होताच जळजळ, तसेच नाक डोळ्यांची आग होऊन त्यातून पाणी येणे हि लक्षणे कटू म्हणजे तिखट रसाची असतात. थोडक्यता झणझणीत मिसळ खाल्यानंतरची सगळी लक्षणे कटू रस दाखवतो. शब्द कटू असला तरी चव कडू नव्हे तर तिखट घ्यावी.
वायू आणि अग्नीचे संयोगाने तिखट चवीची निर्मिती होते.

कटू रसामुळे अग्नी प्रदीप्त होतो ,भोजनास रुची प्राप्त होते.
तोंडाचा आतील फाजील चिकटपणा दूर होतो
अन्नरसाचे शोषण होण्यास मदत होते.
सर्व इंद्रियांना उत्तेजन मिळते,
अवास्तव कफ, मल, शरीरातील अवयवांच्या आतील चिकटपणा, दोष नष्ट करतो.
शरीराची अवास्तव जाडी कमी करताना कटू रसाची औषधे ,वनस्पती आणि अन्न वापरले जाते.
रक्तातील संघात म्हणजे अडथळे दूर करणे हा विशेष गुण कटू रसाचा असतो.
अतिप्रमाणात वाढलेले मांस मेद यांचे लेखन करून सामान्य अवस्थेत आणण्याकरिता युक्तीने कटू रसाची औषधे आणि अन्नपदार्थ वापरली जातात.

अतीप्रमाणात तिखट चवीचे सेवन केले असता,
शरीर शिथिल होणे,शरीरात जखडल्याची भावना म्हणजे स्टीफनेस निर्माण होणे,
पुंस्त्व कमी होणे, धातूंची शक्ती कमी होणे,दाह ,जळजळ होते.
खूप काळ अति तिखट खाल्ल्याने शरीरात कोरडेपणा निर्माण होऊन वाताचे व्याधी होण्याची शक्यता वाढते.
जठराग्नी बिघडून अम्लपिताचे विकार हि बळावतात.
कटू रसाचे काही पदार्थ: मिरे, मिरची, आले, दालचिनी,लसूण,ओवा,कांदा,लवंग,तुळस,

५.तिक्त रस (कडू रस):
जिभेला अजिबात प्रिय नसलेला आणि जिभेला स्पर्श होताच बाकी चव ओळखता न येणार रस म्हणजे तिक्त किंवा कडू रस होय. तोंडात शोष निर्माण करणे हाही एक गुण कडू चवीचा होय.
वायू आणि आकाश महाभूतांच्या एकत्र येण्याने हि चव तयार होते.

स्वतः चवीला बेचव असला तरी योग्य रीतीने या चवीचे सेवन केले गेले असता हा रस पदार्थांची चव वाढवतो.फोडणीत टाकलेल्या कडू मेथ्यांचे ४ दाणे हि सांबार किंवा दही बुत्तीची चव किती वाढवते हे सांगायला नको.
अरुची दूर करणे, विष प्रभाव म्हणजे येथे आपण अपचनातून तयार झालेले टॉक्सिन असे घेऊ , ते कमी करतो,
पोटातील जंत कृमींचा नाश कडू चवीमुळे होतो,
शरीरातील फाजील मेद, चिकटपणा, त्वचारोग, कुष्ठ यासारख्या व्याधींचे नियोजन करताना कडू रसाची औषधी आणि आहारावर आम्ही वैद्य लोक भर देतो.
अति प्रमाणातील घाम,मूत्र ,मल असे शरीरमल सामान्य स्थितीत आणण्यास मदत होते. सामान्यतः आरोग्य टिकविण्यास याची मदत होते.
चवीला अप्रिय कडू रस आम्हा वैद्यांचा लाडका असतो तो यामुळेच.
मला वाटते आयुर्वेदिक कडू काढ्याची, कडू चूर्णांची महती आता नक्की कळेल.

अतीप्रमाणात शक्यतो कोणी कडू खात नाहीच .परंतु कडू रसाचे जर अतिसेवन झाले तर
शरीरातील रुक्षता वाढते,वाताचे व्याधी होण्याची शकयता असते.
शरीरातील रस ,रक्त, मांस, मेद,अस्थी, मज्जा आणि शुक्र या शरीर धातूंचे कुपोषण होऊन दुर्बलता येते.
यावयाचे आतील स्तर हे कोरडे पडून अवयांमधील रुक्षता वाढते आणि कार्यातील सुरळितपणा कमी होतो.

तिक्त रस असलेले काही पदार्थ:
मेथ्या,मोहरी,ओवा,पिंपळी,हिंग,जिरे, अहळीव,हळद,तुलसी,विड्याचे पान,मेथी,शेपू,चहाची पाने,कॉफी बिया,कोकाच्या बिया,काही बिअर सारखे मद्यप्रकार कडू रसप्रधान असतात. सर्व तेल प्रकार साधारपणे कडू रसात्मक च असतात. अपवाद खोबरेल तेल.

६. कषाय रस(तुरट चव):
जिभेला स्पर्श होताच जीभ आकुंचन पाऊन जड होते अशी चव म्हणजे कषाय अथवा तुरट चव होय.
कषाय रस हा स्तंभक असतो. वेगवगळ्या अवयवांमध्ये आकुंचन गुणामुळे अवयवाची स्थिरता अबाधित ठेवण्याचे काम तुरट चवी मुळे होत असते.
शरीरात निर्माण झालेला चिकटपणा,दोषांची शिथिलता, या रसाने कमी होते.
वात पित्त कफाची भौतिक रचना सामान्यतः या चवीने स्थिर राहते.
संधान म्हणजे जखमा भरून काढणे , झीज भरून काढणे यासारख्या क्रिया तुरट रसाने होतात.
वाहते रक्त थांबवणे या क्रियेला तुरट रस मदत करत असतो.

अती तुरट रसाच्या सेवनाने
तोंड, आणि जिभेला जडत्व येते, बोबडेपणा येतो,
हृदयात जखडून ठेवल्यासारखे वाटणे ,गळ्याला शोष पडणे अशी लक्षणे दिसतात.
ग्लानी, तृष्णा वाढवतो,
वातरोग होण्याची शक्यता बळावते,
शरीराचा वर्ण काळवंडतो.पुंस्त्व कमी करतो.

कषाय रस असलेलेपदार्थ: सुपारी,जांभूळ,आवळा,पेरू,बेहडा,उंबर ,वडाचे साल, खजुराची ओली फळे,मुगाची डाळ,कुळीथ,कमळाच्या बिया,नीलकमळाची पाने,बकरीचे दूध,बेलफळ,अर्जुन सादडा साल.

लसूणामध्ये लवण म्हणजे खारट रस सोडून बाकी पाचही रस कार्यरत असतात.
मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय हे सहाही रस एकत्र एकवटलेला आवळा हा आयुर्वेदाच्या गळ्यातील जादुई ताईतच आहे.

चुकीच्या आहारशैलीने आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय असे वैद्यक शास्त्रात वारंवार सांगितले जातंय.डायबेटीस,हृद्रोग,स्थौल्य या सारखे व्याधी वेगाने फोफावताय.एक रसाधिक्य किंवा चवींचा अतिरेक हाही चुकीच्या आहारशैलीचा एक पैलू होय आणि हे प्रकरण म्हणजे त्याला पुष्टी देणारा मुद्दा होय. त्यामुळेच आहारासंदर्भात असलेल्या या पुस्तकामध्ये या सहा चवींचा धावता का होईना परंतु आढावा घेणे आवश्यक वाटले.
सामान्य माणसांना माहित नसलेल्या काही मूलभूत गोष्टी सोप्या भाषेत पोचणे हा उद्देश .वाचकांचा आहाराकडे आणि पदार्थांच्या चवींकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या प्रकरणामुळे नक्कीच सकारात्मक बदलेल.

Share this :

1 thought on “Tasty tales !”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart