Umm …I love pasta !

रविवारी ब्लॉग पब्लिश झाला कि त्यावर प्रश्न शंका आणि त्याबरोबर च एखादा विषय वाचक कायम सुचवत असतात.सुचवलेल्या विषयांवर मी लिहिण्याचा प्रयत्न करीतच असते. परंतु खूप विषय जमल्यामुळे हळू हळू एक एक विषय ब्लॉग साठी घेतेय. काही वाचक दरवेळेस आवर्जून आठवण करून देतात,कधी सहज तर कधी तक्रारीच्या स्वरात विचारतात.माझी कोलकात्याची एक महिला वाचक तर चक्क रुसली आहे.विषय लेखन करण्यास उशीर होतोय पण प्रत्येक सुचवलेला टॉपिक नक्की लिहिला जाईल हि खात्री देते.
आज असाच एक छोटासा वेगळा विषय.

एका वाचक आईला प्रश्न पडतो कि लेकीला पास्ता खूप आवडतो. त्यातील चुकीच्या गोष्टी टाळून तो अधिक आरोग्यदायी कसा होईल.मुख्य म्हणजे व्हाईट सॉस ला काय पर्याय आहे?
चला आज यावरच बोलूयात.

मुख्यतः पास्ता वाईट नाही हे आधी मला सांगू देत. पारंपरिक पास्त्याचीं रेसिपी सोयीसाठी बदलली गेली आणि मग तो थोडा टाळावा पदार्थात जाऊन बसला कसा ते बघू.
पास्ता मुख्यतः इटली देशातील डेलिकसी होय.जशा आपल्याकडे शेवया कुरडया बनवल्या जातात तसे तिथे पास्ता बनवून ठेवतात. किंबहुना मी म्हणीन कि तिकडे बरेचदा ताजा पास्ता शिट बनवण्याचा प्रघात आहे अथवा होता.

आता बघू आपण खातो तो पास्ता का त्रास देऊ शकतो.
१. फक्त मैदा वापरून प्रिझर्वेटिव्ह टाकून शेल्फ लाईफ वाढवून तो आज आपल्याला डिपार्टमेंटल स्टोरे मध्ये मिळतो.कडक पटकन न शिजणारा आणि एकमेकांना न चिकटणारा! पारंपरिक ताजा पास्ता बनवण्याची पद्धत नक्की गुगल करून बघा.
२. ताजे टोमॅटो कांदे वापरून रेड सॉस आपण सहसा करत नाही तो असेल तर काळजीच नसती. परंतु आपण तो रेडिमेड आणतो.त्यात भरपूर रंग, कृत्रिम चवी,प्रिझर्वेटिव्ह ,साखर व इतर रसायने असतात.टोमॅटो व इतर कच्च्या मालाची खात्री कुणीच देत नाही.हा सॉस भयंकर खारट आंबट असतो.कधीतरी नुसता चाखून बघा. एरवी तोंडी लावायला म्हणूनटोमॅटो सॉस थोडासा कधीतरी खाणे वेगळे आणि मुख्य घटकद्रव्य म्हणून तो भरपूर प्रमाणात आणि कायम खाण्यात असणे वेगळे. हा मुद्दा अधोरेखित आहे.
३. व्हाईट सॉस करताना परत मैदा बटर दूध मीठ cheese लसूण मिरची मिरे असे थोडे विरुद्धान्न गटात मोडणारी द्रव्ये आपण एकत्र करत असतो.दुधाचा सॉस त्यात आंबट टोमॅटो सॉस चीज आणि भाज्या हे मिश्रण थोडेसे विरुद्ध अन्न होऊ शकते.
असा पास्ता कधीतरी खाल्ला, उत्तम पचवला गेला तर काही अपाय नाही परंतु जर वारंवार भरपूर प्रमाणात खाल्ला गेला, लहान मुले, पचनशक्ती कमी असलेल्या व्यक्ती किंवा पित्त प्रकृती याना तो लगेच त्रासदायक ठरू शकतो. यात असा पास्ता नीट न पचणे, पित्त वाढणे क्वचित उलटी होणे असे त्रास होऊ शकतात.
अति खारट अति आंबट अशा तीव्र चवींमुळे हे होत असते. मैद्याने मलबद्धता होऊ शकते किंवा चीज चे किसलेले डोंगर पचायला अवघस्ड जाते ते अजून वेगळेच.
आता यावर उपाय बघू .
१.पास्ता वारंवार खाण्यात असेल तर रेड सॉस ताजा करणे कधीही चांगले .तो सोपा असतो. पूर्वतयारी व नियोजन केले तर अजून सोपा जातो.
२. चीज चा वापर थोडा आखडता घ्यावा.
३.शक्यतो पूर्ण गव्हाचा विश्वासातील पास्ता निवडावा.माझी खूप इच्छा आहे जसे घरगुती शेवया कुरडया करून मिळतात तसाच जर घरगुती पास्ता शीट्स मिळाल्या तर किती छान होईल.
४.उत्तम ताज्या भाज्या भरपूर वापरा. बॉटल बंद व्हिनेगर मधले ऑलिव्ह,बीन्स,फिश मीट, इत्यादी ना बाद करा.
५.मी व्हाईट सॉस ला माझ्या पद्धतीने ट्विस्ट दिला आहे आणि दर वेळेस घरात पास्ता करते तेंव्हा असाच व्हाईट सॉस बनवते.
मैदा न घेता किंचित तांदूळ पीठ घेऊन बटर ऐवजी साजूक तुपात किंचित भाजून घेते त्यात मग नेहमीप्रमाणे भरपूर बारीक केलेला लसूण मिरे पाउडर मीठ इत्यादी घालते आणि दूध किंवा क्रिम ऐवजी चक्क पाणी ओतते. नीट ढवळून एकजीव मऊ पातळसर मिश्रणात किसलेले चीज टाकून परत नीट हलवते .उकळी आणून वरून पास्ता हर्ब्स टाकले कि व्हाईट सॉस तयार. चव म्हणाल तर उत्तम लागते. आणि अगदी सॉफ्ट स्मूद चिजी व्हाईट सॉस बिनधास्त भरपूर वापरता येतो.
६.पास्ता शक्यतो परत परत वारंवार मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून नये. बंद डब्यात कुकर मध्ये देखील गरम करता येतो. अशा युक्त्या क्लुप्त्या आपण च काढत हळू हळू चुकीच्या गोष्टी बदलवू शकतो.
आता एक सांगते सगळ्या कॉंटिनेंटल फूड मध्ये पास्ता माझा सगळ्यात लाडका आहे.आणि हा ब्लॉग लिहताना आधीच चतुर्थीचा उपवास त्यात पास्त्याचीं अशक्य आठवण.असो.
छोट्या टिप्स चा नक्की उपयोग करा आणि पास्ता एन्जॉय करा ( आपली भूक, पचनशक्ती, प्रकृती, हवामान,स्वास्थ्य याचा पण अन्दाज असू द्या)

Share this :

2 thoughts on “Umm …I love pasta !”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart