एक केस , एक विचार :शरीराच्या वेदना मनाचा आरसा

पेशंट खूप जास्त काळाने येणे हि डॉक्टरच्या यशाची पावती असते . याउलट पेशंट वारंवार आला कि डॉक्टरलाच असुरक्षित वाटणे स्वाभाविक आहे किंबहुना वाटायलाच हवे . पेशंट चे हित हेच आम्हा वैद्यकीय व्यवसायाचे ध्येय आहे . योग्य औषधी , हवे ते जीवनशैलीत ले बदल , योग्य आहार असे सगळे उपाययोजना योजूनही एका स्त्री रुग्णास बरे वाटत नव्हते. उच्च विद्याविभूषित , अतिशय जबाबदारीच्या लठ्ठ पगाराच्या जागेवरील एक देखणी अविवाहित पस्तिशीतील स्त्री सांधेदुखी ,अनियमित पाळी, अनिद्रा आणि वारंवार होणारी सर्दी ,अचानक श्वास घेण्यास त्रास अश्या तक्रारींकरिता माझ्याकडे चिकित्सा घेत होती.

फॉलोअप ला होणाऱ्या गप्पांमधून तिचा स्वभाव ,मानस भाव आदी गोष्टी लक्षात येत होत्या परंतु पेशंट अजून हि मोकळी होऊन बोलत नव्हती ,लपवत होती.एका ठराविक पातळीपेक्षा मीही तिच्याशी वैयत्तिक होऊ शकत नव्हते. तिची आई सुद्धा माझी पेशंट असल्याने एकदा अतिशय काळजीच्या स्वरात त्यांनी तिच्यासमोरच तिच्याबद्दल सविस्तर सांगितले . गेल्या 3 वर्षांपासून माझी ती रुग्ण वैयक्तिक पातळीवरील नातेसंबंधांमध्ये अतिशय तणावाच्या परिस्थितीतून जात होती.
मला कोड्यातला हरवलेला भाग सापडला होता. आता गरज होती ती योग्य पद्धतीने तिला तिच्या स्थितीची जाणीव करून देण्याची.
पुढील फॉलोअप ला औषधींमध्ये मनावर काम करणारी वनस्पती चूर्णे ,सिद्ध तूप , शिरोधारा ,नस्य , इतर पंचकर्म असे बदल केलेत . तिला तिच्या मनातले वादळ आणि त्यामुळे शरीरावर होणारे परिणाम यांची नीट कल्पना दिली.
काही महिने समुपदेशका कडून तिचे समुपदेशन करवून घेतले. सुदैवाने अँटिडिप्रेसंट किंवा तत्सम औषधे घ्यावे लागतील एवढी परिस्थिती हाताबाहेर गेली नव्हती . समुपदेशन , आयुर्वेदिक औषधी , पंचकर्म , योग आणि तिचे छंद जोपासना अशी उपाययोजना आखली होती. आणि तिचा खूप छान परिणाम 3 च महिन्यात दिसून आला. सोबतच तणावाचे जे कारण होते त्या कारणाचा कायमचा तोडगा काढणे याला प्राधान्य देण्याकरताही रुगणेस तयार करावे लागले .जे खूप महत्वाचे होते. आज 6 -7 महिन्यातून एकदा फॉलोअप ज्यात मनमोकळ्या गप्पा जास्त आणि औषधी नाही , अशी वेळ आहे. शारीरिक तक्रारी कमी आहेत आणि जीवनात स्वतःला नवीन संधी देण्याचा आत्मविश्वास हि तिला आलाय .
फॅमिली डॉक्टर हा म्हणून खूप महत्वाचा दुवा असतो .आपल्या व्यस्त वेळातून पेशंट कडे एक पूर्ण व्यक्ती म्हणून बघणे खूप आवश्यक आहे.
मन , शरीर आणि आत्मा हि त्रयी परस्पपूरक असते हे आज वैद्यकीय शास्त्रमान्य आहे .
मनातील असंतुलन मेंदूतील रासायनिक तसेच वर्तनातील बदलांना कारणीभूत होतात. शरीरातील सर्वच अवयव मेंदूच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे कालांतराने विविध अवयवांवर विपरीत परिणाम हा होणारच . दुर्दैवाने शरीराच्या व्याधी आपण लक्षात घेतो , भरमसाट औषधे हि घेतो पण आपल्या मनावर हळुवार फुंकर घालायचेही आपल्या गावी नसते तर मनासाठी उपाययोजना करायला हवी हा विचार कोसो दूरच राहतो.
व्यवसाय , नातेसंबंध , यश अपयश, वाईट घटना इतकेच काय अगदी लहानपणात घडलेले काही प्रसंग आणि घटना यामुळे होणारे मनावरील परिणाम हे अनेक वर्षे मेंदू आणि मन साचवतो याला भावनिक बंधनं म्हणतात
भावनिक बंधनं ज्याला इंग्रजी मध्ये इमोशनल ब्लॉक म्हणतात ,त्यांचा मनावर परिणाम आणि पर्यायाने विविध व्याधीत परिणती हे लेखाच्या पुढील भागात पाहू.

(This write up belongs to Dr.Rupali Panse. Image source internet. )

Share this :

1 thought on “एक केस , एक विचार :शरीराच्या वेदना मनाचा आरसा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart